पेंचचा काही भाग हा महाराष्ट्रात आहे व बाकी भाग मध्य प्रदेशमध्ये आहे. मी मध्य प्रदेशला जायचे ठरवले.

टाळेबंदी उठली आणि पर्यटनाला पुन्हा एकदा उफाळी मिळाली. टाळेबंदीमध्ये कंटाळलेले पर्यटक पुन्हा आपल्या मनपसंतीदार स्थळांकडे आकर्षित झाले असताना, मलाही पर्यटनाची उत्सुकता लागून राहिली. कोरोनाची काळजी घेत मी पुन्हा पर्यटन करायचे मनात निश्‍चित केले. रिमझिम पाऊस, जंगल, चहा आणि निसर्ग यांचा संगम असणारे मोगलीचे रान म्हणजेच पेंच मला बोलावत होते. ते एक खुणावून सांगत होते, की आता तुला शहरीकरणापासून थोडी विश्रांती घेण्याची गरज आहे. मी तत्काळ मध्य प्रदेशला जायचे ठरवले. पेंचचा काही भाग हा महाराष्ट्रात आहे व बाकी भाग मध्य प्रदेशमध्ये आहे. मी मध्य प्रदेशला जायचे ठरवले.

Also Read: राज्यात यावर्षी विक्रमी साखर उत्पादन! साखर आयुक्तालयाने वर्तवला अंदाज

कोरोनामुळे निर्बंध होते, परंतु निर्बंध शिथिल होताच मला पेंच जंगलाने स्वतःकडे आकर्षित केले. मी एका खासगी पर्यटक व्यवस्थापकाकडून रेल्वेचे बुकिंग केले. या वेळी माझा प्रवास रेल्वेने होणार होता, असे स्पष्ट होत होते. विमान प्रवास थोडा धोकादायक वाटत होता खरा; पण या वेळी मी रेल्वेचा अनुभव घेण्याचे पक्के केले होते. मी हा प्रवास सोलो म्हणजे एकट्याने करण्याचे ठरवले होते. कारण, कुटुंबीयांना होणारा धोका टाळण्याचा माझा प्रयत्न होता. ऑनलाइन वन्य प्रवेश पास काढण्यासाठी मी संकेतस्थळावर जाऊन दोन सकाळच्या सफारी बुक केल्या. योग्य ते दर व माहिती देत दोन व्याघ्र सफारी बुक केल्या. कोरोनाचा काळ असल्याने मला सहज पास म्हणजे परमीट मिळून गेले.

Also Read: सोलापूर जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे बंद

मी पर्यटक व्यवस्थापकाकडून रेल्वे तिकीट घेतले आणि प्रवासाचा योग पुन्हा सुरू झाला. राहण्याची व्यवस्था व तिथे फिरण्याची सोय तत्काळ तिथे जाऊन प्रत्यक्ष करण्याचे ठरले. सोलापूरहून रेल्वे ते पुणे गाठले. एक दिवस विश्रांती घेऊन सायंकाळी नागपूरची स्पेशल ट्रेन गाठली. हलक्‍या पावसाच्या सरी, रेल्वेचा प्रवास व खिडकीतून दिसणारे निसर्गरम्य देखावे मनाला आल्हाददायक वाटत होते सर्व. सकाळी मी नागपूरला पोचलो. सकाळचा चहा घेतला आणि मध्य प्रदेशाकडे निघण्याचा प्रवास एका खासगी गाडीने बुक केला व पेंच व्याघ्र प्रकल्पाकडे वाटचाल सुरू केली.

Also Read: सोलापूर विद्यापीठाची 5 जुलैपासून परीक्षा

ही माझी पेंचला जाण्याची दुसरी वेळ होती. रस्त्यात हलका पाऊस होता. रस्ता ओळखीचं वाटत असला तरी पुन:श्‍च नावीन्यपूर्ण प्रवास वाटत होता. टप टप पडणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या थेंबांची गर्दी होत होती. मी चहाला थांबलो. गरम चहा आणि कांदा भजीचा अनोखा मेळ अनुभवला. पुढे वनविभागाच्या चौकीवर माहिती देऊन पुढे सरकलो. मी एक सुंदर वन रिसॉर्टला पोचलो. तेथे चांगले तोलमोल करत, या वेळी तंबू ज्याला रॉयल तंबू म्हणतात त्यात राहण्याचे ठरवले.

Also Read: ‘या’ पंचसुत्रीमुळेच कमी झाली दुसरी लाट! सोलापूर कोरोनामुक्‍तीकडे

संध्याकाळी गरम गरम जेवणाचा आस्वाद घेतला. थंड हवा असल्याने आणि पोटभर जेवण झाल्याने मी दुसऱ्या दिवसाच्या सकाळची तयारी करत झोपी गेलो. दुसऱ्या दिवसाची व्याघ्र सफारीची तयारी केली. पहाटे लवकर उठून साहित्य घेऊन बॅग खांद्यावर घेत मी काळोख्या अंधारात रूममधून निघालो. जीप गाडी भल्या पहाटे येऊन थांबली होती. माझ्या सफारीची सुरवात तिथूनच झाली. मी तुरिया गेटला पोचलो. कागदपत्रे दाखवत आमची गाडी पुढे सरकली.

Also Read: ‘या’ पंचसुत्रीमुळेच कमी झाली दुसरी लाट! सोलापूर कोरोनामुक्‍तीकडे

प्रवेश करताच सुंदर जंगल, हिरवीगार झाडे, जी पावसाने न्हावून निघाली होती. वन्य प्राणी दिसत होते. डोळे दीपवणारी ही दृश्‍ये पाहून खूप आनंद झाला; पण वाट पाहात होतो ती वाघ दिसण्याचा योग जवळ येत होता. जंगलातले विविध आवाज ऐकू येत असताना गाईडला एक बिबट्या झाडावर बसलेला दिसला. तोऱ्यात बसलेला बिबट्या पाहून खूप आनंद झाला. त्याचे चित्रीकरण आणि छायाचित्र काढून घेण्याची मजा मी गमावणार नव्हतो.

Also Read: सोलापूर आगारातून केवळ तीन रातराणीच्या फे-या सुरु

पुढे चालत असताना जीप गाडी एका पाण्याच्या डबक्‍यापाशी येऊन थांबली. हा तोच क्षण होता जेव्हा मला वाघाचे दर्शन झाले. मी आधीही वाघ पाहिला होता; परंतु हा क्षण विविधतेत आनंद देणारा होता. तो वाघ ऐटीत बसलेला होता. या प्राण्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. त्याचा रुबाब त्याच्या नावाला शोभत होता. काही काळ डोळे भरून पाहिल्यानंतर मी व जीप गाडी तिथून निघाली. एकाच सफारीत बिबट्या व वाघ बघण्याचा दुर्मिळ क्षण मी अनुभवला. दुसऱ्या दिवशीच्या सफारीत मात्र इतर प्राणी पाहण्याचा आनंद व अनुभव घेतला. इतर प्राणी पाहणे, झाडे, पक्षी व वन्य प्राण्यांचा अभ्यास करण्यासाठी अनेक लोक येथे येतात. छायाचित्रकारांसाठी तर ही एक पर्वणीच असते.

Also Read: पुणे-सोलापूर मार्गाने प्रवास करताय? वाचा महत्त्वाची बातमी

दुसऱ्या दिवशीच्या जीप सफारीत हलका पाऊस अनुभवला. रिसॉर्टमध्ये परत आलो आणि काही काळ विरंगुळा घेऊन परतीचे वेध धरले. पुन्हा नागपूरला येऊन रेल्वे प्रवासाने पुणे गाठले. पुण्याहून सोलापूरला येताच सर्व अनुभव नातेवाईक व मित्र मंडळींना सांगितले. त्यांच्या डोळ्यांतही पेंच व्याघ्र प्रकल्पाला जाण्याचा उत्साह दिसून येत होता. खरंच, वन्य जीवसृष्टीमुळे शहरीकरणापासून दूर एक वेगळे जग आहे, हे अनुभवले पाहिजे, हे तेवढेच खरे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here