कृष्णा नदीच्या काठावर वसलेले दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे धार्मिक क्षेत्र वाई. साताऱ्यापासून ३२ किलोमीटर अंतरावर. येथील प्राचीन शिल्पकला व स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना असलेली मंदिरे आणि परिसरातील निसर्गरम्य सृष्टिसौंदर्य पर्यटकांना आकर्षित करतात.
वाईतील श्री महागणपती मंदिरासमाेर प्रश्स्त पार्किंगची सुविधा असल्याने येथे भाविकांबराेबरच पाचगणी, महाबळेश्वरला येणारे पर्यटकही या गणपतीचे दर्शन घेतात.कृष्णा नदी तीरावर काशी विश्वेश्वर, धुंडी विनायक, सिद्धेश्वर, परशुराम, चक्रेश्वर, काळेश्वर व शहरात विष्णू-लक्ष्मी, अंबाबाई, व्यंकटेश, समर्थ रामदास स्वामी स्थापित रोकडोबा अशी अनेक मंदिरे आहेत. या मंदिरातून प्राचीन वास्तू व शिल्पकलेचा नमुना पाहावयास मिळतो.गाभाऱ्यात एकाच दगडातून घडविलेली सहा फूट उंच, सात फूट लांब, पाच फूट रुंद अशी भव्य व बैठी गणपतीची मूर्ती आहे. मूर्तीच्या भव्यतेमुळे हे मंदिर महागणपती (ढोल्या) या नावाने प्रसिद्ध आहे. या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते.कृष्णा तीरावरील सात घाटांवर दरवर्षी माघ शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन वद्य द्वादशीपर्यंत एकामागून एक कृष्णोत्सव साजरे होत असतात. येथून दिसणारे नदीचे पात्र, समोरचा सोनजाई डोंगर, झाडांमध्ये लपलेल्या छोट्या वस्त्या असे सुंदर निसर्गरम्यदृश्य मनाला आनंद देणारे ठरते.गेल्या काही वर्षांत अतिवृष्टीमुळे कृष्णा नदीस पूर आला हाेता. त्यावेळी महागणपती मंदिरा-या गाभा-यात पाणी गेले हाेते. अनेक वेळा गणरायाच्या चरणास पाणी लागल्याचे सांगण्यात येते.वाईच्या दक्षिणेस सह्याद्री पर्वत रांगांमधील डोंगरावर सोनजाई देवीचे मंदिर आहे. सोनजाई डोंगरावर नवरात्रात
देवीच्या दर्शनासाठी लोक येतात. देवदर्शनाबरोबर गिरिविहार आणि वनभोजनाचा आनंदही या ठिकाणी घेता येतो.सोनजाई देवीसोनजाईचे दगडी मंदिर असून, आतमध्ये पिण्याच्या पाण्याचे कुंड आहे. मंदिरालगतच्या कुंडात वर्षभर पाणी असते.