कोल्हापूर : नुकतीच पेरणीची कामं संपली आणि मृग नक्षत्राच्या पावसाने दमदार एंट्री केली. पावसाचा जोर तुलनेत अधिक असल्याने आणि धरण क्षेत्रात पावसाच्या संततधारेने पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली. परिणामी पाणी पात्राबाहेर पडले आणि शेतशिवारात घुसले. परंतु दोन दिवसाच्या दमदार एंट्रीनंतर पावसाने उघडीप दिली. पेरणीनंतर लगचेच झालेल्या या पावसाचा भातशेतीला फायदा झाला आहे. भरली हिरवागार रानं तरुच्या (भाताच्या) रोपांनी डोलत आहेत. जिल्ह्याच्या चहुबाजूला पसरलेला हिरव्या रानात सध्या रोपांची धांदल सुरु झाली आहे. कोल्हापूर ग्रामीण भागात रोपलावणीने घाई घेतली असून शेतकरीवर्ग रोपांच्या गडबडीत आहे. कोल्हापूरपासून काही अंतरावर असलेल्या कोपार्डे गावातील शेतकऱ्यांची रोपलावणीची लगबग कॅमेरातून टिपली आहे, आमचे ‘सकाळ’चे छायाचित्रकार नितीन जाधव यांनी..

घरगुती कामांचा भार सावरत महिलांनी अगदी तंतोतंत वेळेचे नियोजन करत रोप लावणीसाठी रानात सकाळच्या निश्चित वेळी हजेरी लावली आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण आणि निमशहरी भागात बऱ्याच ठिकाणी आधुनिक म्हणजे यंत्रांच्या सहाय्याने रोप लावणीचा चिखल केला जातो. काही ठिकाणी पारंपारिक पद्धतीने बैलऔताचा वापर केला जातो.
सुरुवातीला रानात उगवून आलेले तरु काढले जाते. त्यानंतर चिखलाने वाफे तयार केले जातात. आणि मग हे तरुच्या (भातरोपे) पेंड्या रानात पसरल्या जातात. मग एकएक सरीने ही रोपे एका ओळीत लावली जातात.
जिल्ह्यातील काही ग्रामीण भागात बांधावर काही वेलवर्गीय बीया पेरल्या जातात. जसे पावटा, वाटाना इ. या बियांना काही दिवसांनी शेंगा लागतात. त्यामुळे काही ठिकाणी या बियांची पेरणी होते.
प्रामुख्याने पुरुष वर्गाकडे हे चिखल करण्याचे काम असते. या कामसाठी ट्रॅक्टरला बैलऔताच्या तुलनेत कमी वेळ लागतो. त्यामुळे वेळ वाचतो. शेतकरी यासाठी यालाच अधित पसंती देतात.
चिखल म्हंटला की कपडे अस्वच्छ होतात. शिवाय रोप लावणी करत असताना हातालाही चिखल लागलेला असतो. त्यामुळे अंगावरील कपडे काही प्रमाणात तरी स्वच्छ रहावीत यासाठी कागदी रंगाचे कागद अंगाभोवती लपेटले जातात.
चिखलाचे काम ओटोपल्यावर घरातील पुरुष मंडळी पुन्हा रोप लावणीच्या, तरु काढणीच्या मागे लागतात.
प्रामुख्याने पुरुष वर्गाकडे हे चिखल करण्याचे काम असते. या कामसाठी ट्रॅक्टरला बैलऔताच्या तुलनेत कमी वेळ लागतो. त्यामुळे वेळ वाचतो. शेतकरी यासाठी यालाच अधित पसंती देतात.
यादरम्यान दुपारच्या जेवणावेळी बांधावर बसून भाकरी, चटणी खाण्यात एक वेगळी मजा, आनंद आणि समाधान असते. वेळेचे भान नसतेच परंतु भाकरी एक-दोन अधिकच्या खाल्ल्या जातात असे काम करणारा शेतकरी महिलावर्ग सांगतो. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील बऱ्याच भागात ही रोप लावणीची लगबग सुरु आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here