23 वेळा महिला एकेरीत ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारी सेरेना विल्यम्स टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळताना दिसणार नाही. यापूर्वी राफेल नदालने ऑलिम्पिकमधून माघार घेतली होती. विम्बल्डन स्पर्धेपूर्वी सेरेना विल्यम्सने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी तिने ऑलम्पिक स्पर्धेत खेळणार नसल्याचे स्पष्ट केले. ती म्हणाली की, ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या खेळाडूंच्या यादीत नाव नाही. ऑलिम्पिकमध्ये सहभागी न होण्यामागे अनेक कारणे आहेत. वास्तविक मला या स्पर्धेत सहभागीच व्हायचे नाही. त्याबद्दल मी सर्वांची माफी मागते, असे सेरेनाने म्हटले आहे.
39 वर्षीय सेरेनाने अमेरिकेसाठी ऑलिम्पिकमध्ये चार सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये तिने एकेरी आणि दुहेरी दोन्ही प्रकारात सुवर्ण कामगिरी नोंदवली होती. 2000 मध्ये सिडनी आणि 2008 मध्ये बिजिंग ऑलिम्पिकमध्ये तिने दुहेरीत सुवर्ण पदक जिंकले होते.

Also Read: ENG W vs IND W: ODI डेब्यू मॅचमध्ये शफालीनं रचला इतिहास
रिओ ऑलिम्पिक (2016) मध्ये महिला एकेरीत सेरेनाला तिसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दुहेरीत तिला व्हिनससोबतच्या दुहेरीत पहिल्याच फेरीत तिच्यावर गाशा गुंडाळण्याची वेळ आली होती. कोरोनामुळे स्थगित झालेली ऑलिम्पिक स्पर्धा 23 जूलैपासून टोकियामध्ये पार पडणार आहे.
Also Read: तिरंदाजी वर्ल्ड कप: नवरा-बायकोचा ‘सुवर्ण’ वेध; भारताला तिसरे गोल्ड

राफेल नदाल आणि डॉमिनिक थिम या पुरुष गटातील आघाडीच्या टेनिस स्टारनी देखील टोकियो ऑलिम्पिकमधून माघार घेतली होती. रॉजर फेडररने शनिवारी ऑलिम्पिक स्पर्धेसंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे म्हटले होते. विम्बल्डन स्पर्धेवर ऑलिम्पिकचा निर्णय अवलंबून असेल, असेही फेडररने स्पष्ट केले होते.
Esakal