इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाची कर्णधार मिताली राजने खास विक्रम आपल्या नावे केला. तिने मास्टर बास्टर सचिन तेंडुलकरच्या खास विक्रमाची बरोबरी केली. 22 वर्षे आंतरराष्ट्रीय वनडे खेळण्याचा पराक्रम मितालीने आपल्या नावे केलाय. यापूर्वी सचिनने हा पल्ला गाठला होता. दोन दशकाहून अधिक काळ क्रिकेटमध्ये योगदान देणारी ती सचिन तेंडुलकरनंतर दुसरी क्रिकेटर ठरलीये. (Mithali Raj Record 22 Years In-International Cricket After Sachin Tendulkar)

सचिन तेंडुलकरचे आंतराष्ट्रीय क्रिकेट करियर सर्वाधिक आहे. त्याने 22 वर्षे आणि 91 दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा विक्रम आपल्या नावे केलाय. मिताली राजने इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात टॉसला मैदानात उतरताच 22 वर्षे 1 दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा खास टप्पा गाठला. मिताली राजने आपल्यासाठी खास असलेल्या सामन्यात नावाला साजेसा खेळ केला. एका बाजूने विकेट पडत असताना तिने संघाचा डाव सावरला. 108 चेंडूत तिने 72 धावांची खेळी केली.

Also Read: ENG W vs IND W: ODI डेब्यू मॅचमध्ये शफालीनं रचला इतिहास

सचिन तेंडुलकरप्रमाणेच मिताली राजने कमी वयात क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती. 38 वर्षीय मितालीने 26 जून, 1999 मध्ये आयर्लंड विरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पदार्पण केले होते. त्यावेळी ती फक्त 16 वर्षांची होती.

Also Read: ‘स्नेहां’कित

मिताली राजच्या नावे असलेले खास रेकॉर्ड

22 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत मितालीने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. 214 वनडे सामन्यात 7 शतक आणि 55 अर्धशतकासह तिच्या खात्यात 7,098 धावा जमा आहेत. महिला क्रिकेटमध्ये वनडेत 6000 पेक्षा अधिक धावा करणारी ती एकमेव क्रिकेटर आहे. टी-20 मध्ये तिच्या नावे 2364 धावांची नोंद आहे.

इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात मितालीने पुनम राउतसोबत 56 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर दीप्ती शर्माच्या साथीने तिने भारतीय संघाचा डाव पुढे नेला. या दोघींनी 65 धावांची खेळी केली. खास पल्ला गाठल्यानंतर ती शतकी खेळी करेल, असे वाटत होते. पण इक्लेस्टोन हिने त्रिफळाचित करत तिच्या संयमी खेळीला ब्रेक लावला. मितालीने आपल्या खेळीत 7 चौकार खेचले. वनडे कारकिर्दीत तिचे 56 वे अर्धशतक साजरे केले. जर तिला इतर खेळाडूंची साथ लाभली असती तर भारतीय संघाने 250 धावांपर्यंत मजल मारली असती. उर्वरित दोन वनडेत तिच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here