जळगाव: कधीकाळी वैभव प्राप्त असलेला जळगाव एमआयडीसीतील (Jalgaon MIDC) चटई उद्योग (Mat industry) कमालीचा अडचणीत आला आहे. काही वर्षांपासून निर्माण झालेली स्थिती, दीड वर्षापासून बसलेला लॉकडाउनचा (Lockdown) फटका, कामगारांचा तुटवडा आणि कच्च्या मालातील मोठी दरवाढ ही यामागची कारणे मानली जात असून, सध्या जवळपास निम्मे युनिट बंद (Unit close)असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. ( jalgaon carpet industry is trouble due to lockdown)

Also Read: संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा रुग्णालय सज्ज

जळगावातील चटई उद्योग देशभरात प्रसिद्ध आहे. पाइप, ठिबकच्या उद्योगाप्रमाणेच या उद्योगाला कधीकाळी जळगावात मोठे वैभव होते. साधारण दशकापूर्वी येथील औद्योगिक वसाहत परिसरात चटई उत्पादन घेणारे दोनशेपेक्षा अधिक युनिट कार्यरत होते. देशांतर्गत नव्हे तर विदेशातही चटईची निर्यात व्हायची. मात्र, कालांतराने या उद्योगासमोर वारंवार येणाऱ्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर टप्प्याटप्प्याने हे युनिट बंद होत गेले.

दीडशेवर युनिट अस्तित्वात
सध्या एमआयडीसीत चटई उत्पादनाची दीडशेवर युनिट अस्तित्वात आहेत. त्यात स्थानिक व परप्रांतीय कामगार कामास आहेत. स्थानिकांचे प्रमाण ४० ते ५०, तर परप्रांतीय कामगारांचे प्रमाण ५० ते ६० टक्के आहे.

Mat

लॉकडाउनचा फटका
गेल्या वर्षी लॉकडाउनचा मोठा फटका या उद्योगाला बसला. परप्रांतीय कामगार लॉकडाउनमध्ये त्यांच्या गावी गेले, ते परतलेच नाहीत. त्यामुळे विशेषत: मशिन ऑपरेटर कामगारांचा तुटवडा निर्माण झाला. मध्यंतरी उद्योगाची गाडी रुळावर येत असताना पुन्हा संसर्ग वाढू लागल्याने लॉकडाउन लागले. या लॉकडाउनमध्ये उद्योग बंद नव्हते, मात्र त्यामुळे पुन्हा काही कामगार त्यांच्या गावी निघून गेले. त्याचाही परिणाम उद्योगावर झाला.

Also Read: एकनाथ खडसे, रोहिणी खडसेंना ट्विटरवरून शिवीगाळ

कच्च्या मालात दरवाढ
चटईसाठी लागणाऱ्या कच्च्या मालात गेल्या वर्ष-दोन वर्षांत मोठी दरवाढ झाली. त्यामुळेही उत्पादनावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. या उत्पादनात प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणात पुनर्वापर होतो. मात्र, पुनर्वापरात येणारा प्लॅस्टिकचा मालही उपलब्ध होत नसल्याचे दिसते.

४० टक्के युनिट बंद

या सर्व अडचणींमुळे सध्यातरी अस्तित्वात असलेल्या दीडशेवर युनिटपैकी ४० टक्के युनिट बंद आहेत. म्हणजे ७० ते ८० युनिटच सुरू आहेत आणि तीदेखील पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत.

Mat

बिलवसुलीचा त्रास
चटई उत्पादक युनिटसाठी वीजबिलही मोठ्या प्रमाणात असते. लॉकडाउनच्या काळात या बिलाच्या वसुलीसाठी टप्पे पाडून देण्यात आले होते; परंतु अनलॉकनंतर पुन्हा वीजबिलाची सक्तीने वसुली सुरू झाली असून, त्यात सवलत मिळायला हवी, तरच ही युनिट तग धरतील.

विविध कारणांमुळे चटई उद्योग अडचणीत आहे. सध्या मार्केटमधील मागणी वाढत असून, त्यादृष्टीने उत्पादनही वाढत आहे. कच्च्या मालच्या दरात मोठी वाढ झाल्याने त्याचाही उद्योगावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे.
-महेंद्र रायसोनी,
अध्यक्ष, जळगाव मॅट मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here