पुणे : आंबिल ओढा परिसरातील कारवाईच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आज आंदोलन उभं करण्यात आलं होतं. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आंदोलकांची भेट दिली. मात्र या वेळेला वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली आणि त्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला. (Give evidence against Ajit Pawar I will complete the police Supriya Sule Ambil Odha case)
दरम्यान यावेळी ”बिल्डर देखील अजित पवारांच्या जवळ असल्याने तुम्हीच आम्हाला न्याय द्या” अशी मागणी आंदोलकांनी यावेळी सुप्रिया सुळें यांच्याकडे केली. याबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता सुप्रिया सुळें यांनी ”कशाच्या आधारावर हे आरोप करतायं, सगळे पुरावे द्या, मी त्यांची स्वतः पोलिस कंप्लेंट करेन” अशी प्रतिक्रिया दिली.

पुण्यात आंबिल ओढा परिसरातील स्थानिकांच्या घरावर महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात आली. दरम्यान, न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. १३० घरांवर कारवाई केली जाणार असल्यानं नागरिक आक्रमक झाले. या आंदोलनावेळी जवळच असलेल्या आंदोलनाच्या भेटीला आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील भेट दिली. मात्र या वेळेला वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना बघताच, ‘अजित पवार मुर्दाबाद, महाविकास आघाडी सरकार मुर्दाबाद” अशा घोषणा दिल्या आणि त्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, यावेळी सुप्रिया सुळे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. ”मला बाधित महिला तथा आंदोलक त्यांच्याशी बोलू द्या” अशी मागणी केली असता पदाधिकाऱ्यांनी आणखीनच गोंधळ वाढवला.
Also Read: कचरा प्रकल्पाच्या निधीची CBI-EDमार्फत चौकशी करा : सुप्रिया सुळे
दरम्यान, ”अजित पवारांनी आंबिल ओढा प्रकरणी कारवाई करण्याचे अधिकाऱ्यांना सांगितलं आणि त्यांनतर ही कारवाई करण्यात आली”, असा आरोप पदाधिकारी आणि आंदोलकांनी केला. ”बिल्डरदेखील अजित पवारांच्या जवळ असल्याने, आम्हाला न्याय द्या” अशी मागणी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे केली. तसेच, ”बहूजनांची मते चालतात मात्र, आमचे प्रश्न का सोडवता येत नाही” असा सवाल देखील अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित केला.
उपस्थित पत्रकारांनी सुप्रिया सुळेंवर प्रश्नांचा भडीमार केला. त्यावेळी उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ”तुम्ही कशाच्या आधारावर हे आरोप करतायं, अजित पवारांविरोधात पुरावे असतील तर द्या, मी त्यांची स्वतः पोलिस कंप्लेंट करेन.”
Esakal