पुणे : ‘भर पावसाळ्यात आणि कोरोनासारखी आपत्ती असताना अंबिल ओढ्यावरील कारवाई करताना महापौर आणि अधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे होती, अशा तिखट शब्दात महापालिकेच्या कारभारावर टिका करून नागपूरात अशी कारवाई झाली असती, तर मी बुलडोझर खाली झोपलो असतो, असे सूचक वक्तव्य मंगळवारी उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले.

महापालिकेकडून कारवाई करण्यात आलेल्या अंबिल ओढ्याच्या परिसरातला राऊत यांनी भेट दिली. तेथील नागरीकांशी संवाद साधल्यानंतर यांनी या प्रकरणी महापालिकेत जाऊन आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. या प्रकरणाची चौकशी झाली करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली. तसेच राज्य सरकारला देखील या प्रकरणाची चौकशी करण्याबाबत आपण विनंती करणार असल्याचे सांगून ते म्हणाले,‘ या कारवाई मागे महापालिकेतील सत्ताधारीच आहेत.’ असेही ते म्हणाले.
महापालिकेकडून भर पावसात अंबिल ओढ्याच्या परिसरात राक्षसी वृत्तीने आणि दंडेलशाहीने घरे उद्धस्त करण्यात आली. स्त्रियांना हात लावण्यात आले. त्याचा मी निषेध करतो, असे सांगून राउत म्हणाले, ‘पावसाळ्यात अशी करवाई करता येत नाही. कोरोनाच्या काळात नियम पाळयाचे असताना शेकडोंच्या संख्येने ही कारवाई करण्यात आली. नाला सरळीकरणाचे काम करण्यासाठी बिल्डर्सची गरज होती. दलितांवर अन्याय झाला आहे. ती गप्प बसणार नाही. मी लढणार आहे. पालकमंत्री मी सुध्दा आहे. अशा पद्धतीने नागपूरात कारवाई झाली असती, तर मी बुलडोझर खाली झोपलो असतो.’ या कारवाईमागे पालकंमत्री अजित पवार यांच्या हात असल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘पुण्याच्या पालकमंत्र्यांनी हे केले आहे, असा कुठेही दाखल नाही, असे सांगून त्यांनी अधिक बोलणे टाळले. यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, मोहन जोशी, अभय छाजेड, दिप्ती चवधरी, अजित दरेकर, गोपाळ तिवारी, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Also Read: प्रदुषित भागात कोरोनाचे अधिक रुग्ण; पुणे, मुंबई संवेदनशील शहरे
Esakal