आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा कलाकार डॉ. निलेश साबळेचा आज वाढदिवस. ३० जून, १९८६ रोजी निलेशचा जन्म झाला. अभिनेता, निवेदक, डॉक्टर आणि दिग्दर्शक असलेल्या निलेशचा कोल्हापूर ते मुंबई हा प्रवास खडतर होता.निलेशने आयुर्वेदाची एम. एस ही पदवी घेतल्यानंतर कोल्हापूर जवळच्या एका गावातून एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी मुंबईमध्ये आला. तेथूनच त्याचा कला क्षेत्रामधील प्रवास सुरू झाला. ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या कार्यक्रमामधून निलेशला विशेष ओळख मिळाली. त्यानंतर ‘फू बाई फू’ या कॉमेडी शोमधून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. होम मिनिस्टर आणि एक मोहोर अबोल या कार्यक्रमातून निलेश प्रेक्षकांच्या भेटीस आला. 2013 मध्ये निलेश गौरी साबळेसोबत विवाहबद्ध झाला. निलेश साबळेची पत्नीसुद्धा डॉक्टर आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या प्रसिद्ध विनोदी कार्यक्रमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी निलेश सांभाळत आहे.