सासवड : अंजिराचे आगार पुरंदर तालुक्याच्या अंजीर पट्ट्यातील गाव नसूनही सोमुर्डीचे (ता. पुरंदर) शेतकरी अनंता भिवा उर्फ बाबा पवार यांनी अंजिरामध्ये आपल्या मेहनतीची व शेतीशास्त्राची जणू ‘पाॅवर’च दाखविली. माळपड क्षेत्र विकसीत करुन त्यातील केवळ 24 गुंठ्यात यंदाच्या सरत्या मीठा (उन्हाळी) हंगामाच्या साडेचार महिन्यात 14 टन उत्पादन काढून खर्च वजा जाता, तब्बल11 लाख रुपयांचा नफा कमविला !

भातपीक उत्पादनातील शासन पुरस्कारार्थी पवारांनी गोगलवाडीकडे अंजिरशेती पाहून व कृषीतज्ज्ञ स्व. डाॅ.विकास खैरेंकडून प्रेरणा घेऊन 1996 मध्ये प्रथम अंजीरबाग लावली. नंतर प्रादुर्भावाने बाग तोडून वर्षाने पुन्हा 2011 मध्ये 125 अंजीर रोपे लावली. अभ्यासपूर्वक हंगामाचा बहर धरताना खांदणी, निंबोळीपेंड, शेणखत, संजीवके आवश्यक तेवढेच रासायनिक खत वापरली. संतुलीत फवारण्या, ठिबक सिंचन, बागेची स्वच्छता, वेळेवर खुरपणीसह उत्तम नियोजनाने यंदा बागेत 90 टक्के फळे एक नंबर प्रतीची मिळवली.

मागील वर्ष लाॅकडाऊनमुळे जुजबी ठरले. मात्र यंदा जानेवारीअखेरपासून दिवसाआड फळे तोडणीला कुटुंबीयांसह स्वत: पहाटेपासून चार तास राबतात. मुलगा अमोलच्या मार्फत स्वतःची वाहतुक व्यवस्था, फिक्स आडते यामुळे कमी जागेत यंदा सर्वोच्च नफ्यातील बाग बनली आहे.

सोमुर्डी (ता. पुरंदर) ः येथे बागेलगत बाबा पवार व कुटुंबिय क्रेटमध्ये अंजीर भरताना.

बाबांचे अंजीर गणित

  • 24 गुंठ्यात अंजीर लागवड 2011, झाडे 125

  • तोडे 70 झाले, तोडानिहाय 200 किलो फळे

  • साडेचार महिन्यात झाडनिहाय 112 किलो उत्पादन

  • हंगामात एकुण उत्पादन 14 टन

  • यंदा निर्बंधातही दर किलोमागे रु.40 ते 160

  • 100 रु/कि. सरासरीने एकुण आर्थिक उत्पन्न 14 लाख रु.

  • हंगामाचा खर्च 3 लाख वजा, 11 लाख रु. हाती नफा

मुर्डी (ता. पुरंदर) ः येथे बागेलगत बाबा पवार व कुटुंबिय क्रेटमध्ये अंजीर भरताना.

रोपनिर्मितीतून 9.75 लाख

बाबा पवारांचा अंजीर पुना फिग प्रकारातील, पण निवड पध्दतीने चांगल्या बागेतील काड्या आणून रोपे निर्मितीद्वारेच गुणवत्तापूर्ण रोपे लावली. त्यातून अंजीर जम्बो म्हणजेच अधिक मोठा असल्याने व उत्पादनात उजवा ठरल्याने रोपांनाही मागणी होतेय. त्यामुळे पूर्वीपासून ते बागेतील छाटणीतील काड्या काढून रोपनिर्मिती करतात. केवळ दोन वर्षात रोपनिहाय 60 ते 100 रुपये दराद्वारे 13,000 रोपांची कमाई 9.75 लाख रुपयां पर्यंत झाली. अजून 1,100 रोपे शिल्लक असून पुढे या पावसाळ्यात पुन्हा 10,000 रोपांची निर्मिती ते करणार आहेत.

”भातशेती झाल्यावर थोडे धान्य, भाजीपाला व्हायचा, पण कुटुंबियांसह राबल्याने या अंजिराने आतापर्यंत जुन्या घरापुढे नवे घर, चारचाकी वाहन, वाहतूक टेंम्पो, आवश्यक गुंतवणुकीसह सुखाचे चार घास दिले. गावाचा पूर्वी उपसरपंचही होतो, आता घर ते शेत अन् पुन्हा घर. त्यामुळे तर मला एकदा पुरस्कार देताना मी माझी अंजिरपेटी दिल्यावर चित्रपट कलावंत कै. निळु फुले म्हणाले,’अहो, बाबा हा अंजीर आहे, का.. आंबा !’ अजून काय पाहिजे ?”

– बाबा पवार, अंजीर उत्पादक शेतकरी, सोमुर्डी, ता. पुरंदर.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here