देहू : ज्ञानोबा-तुकाराम असा नामघोष, टाळ-मुदंगाच्या गजर…अमाप उत्साह…अशा भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने गुरुवारी (ता.१) दुपारी तीनच्या सुमारास पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षीही पायी वारी रद्द झाली आहे. सरकारच्या आदेशानुसार मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंरपरेप्रमाणे सोहळा झाला. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही सोहळ्यात दिंड्या सहभागी नाहीत. मात्र, प्रस्थान सोहळ्यानंतर देऊळवाड्यात प्रमुख दिंड्यांतील २५० भाविकांना दर्शनासाठी संस्थानने परवानगी दिली.
देहू मंदिरात संभाजीराजे छत्रपती यांनी सपत्निक पादुकांचे पुजन आणि आरती केली. वढू येथील वारकरी बहुमत शिवले यांना ही पुजेचे मान मिळाला. त्यानंतर संभाजी राजे छत्रपती वारकाऱ्यांसह टाळ-मृदुंगाच्या गजरात दंग झाले होते.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देहूतील प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू आहे. गावातील भाविक पहाटेपासून दर्शनासाठी देऊळवाड्याकडे येत होते. मात्र, सर्व मार्ग बंद होते. परंपरेनुसार पालखी प्रस्थान सोहळ्याचे पारंपरिक कार्यक्रम पहाटे चारपासून सुरू झाले. साडेचार वाजता संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात पालखी सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे, माणिक महाराज मोरे यांच्या हस्ते तर पहाटे पाच वाजता नितीन महाराज मोरे, अजित महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा झाली. वैकुंठस्थान येथील संत तुकाराम महाराज मंदिरात अजित महाराज मोरे यांच्या हस्ते पूजा झाली. सहा वाजता तपोनिधी नारायण महाराज मंदिरात संतोष महाराज मोरे, विशाल महाराज मोरे यांच्या हस्ते महापुजा झाली. भजनी मंडपात सकाळी दहा वाजता पुंडलिक महाराज देहूकर यांचे काल्याचे कीर्तन झाले.

दुपारी दोन वाजता म्हसलेकर दिंडीतील मानकऱ्यांच्यावतीने पादुका डोक्यावर घेऊन संबळ, टाळमृदंग गजर आणि तुतारीच्या निनादात भजनी मंडपात आगमन झाले. दुपारी अडीच वाजता प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली. पादुकांची पूजा संभाजीराजे छत्रपती यांनी सपत्नीक, युवराज शहाजीराजे तसेच पुजेचा मान मिळालेले वढू येथील वारकरी हनुमंत भोसले, बाळूमामांचे वंशज मनोहर मामा, खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार सुनील शेळके यांनी महापुजा केली. सुभाष टंकसाळे यांनी पौराहित्य केले. प्रांताधिकारी सचिन बारवकर, गीता गायकवाड, हेमलता काळोखे, रत्नमाला करंडे उपस्थित होते. फडकरी, मानकरी, दिंडीप्रमुखांचा संस्थानतर्फे सत्कार करण्यात आला. मंदिर प्रदक्षिणेसाठी फुलांनी सजविलेल्या पालखीत पादुका ठेवण्यात आल्या. मंदिर प्रदिक्षणा सुरू झाली. समवेत गरुडटक्के आणि चोपदार होते. प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर पालखी भजनी मंडपात मुक्कामी पोचली. चोपदार नामदेव गिराम, सेवेकरी नामदेव भिंगारदिवे, बाळू पांडे, दिनेश पांडे, उमेश पांडे, पिराजी पांडे, अनिल गायकवाड, गुंडाप्पा कांबळे, लक्ष्मण पवार, तान्हाजी कळमकर, दत्तात्रेय टिळेकर, बाळू चव्हाण यांनी सेवा दिली.
Also Read: देहू : संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान
शासनाने ठरवून दिलेल्या संख्येनुसार वारकऱ्यांच्या उपस्थितीत जेष्ठ वद्य सप्तमीला गुरूवारी (ता.१) देहू येथून जगतगुरू संत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान पैठण येथून झाले आहे. आळंदीतून जेष्ठ वद्य अष्टमीला शुक्रवारी (ता.२) संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पंढरीकडे प्रस्थान होईल. त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथ महाराज, संत मुक्ताबाई आणि माता रूक्मीणी मातेच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान यापूर्वीच झाले. आता सर्व पालख्या प्रस्थाननंतर गावातच राहतील आणि आषाढ शुद्ध दशमीला १९ जुलैला पंढरपूरला एसटीने आषाढी एकादशीसाठी मार्गस्थ होवून वाखरी येथे पोचतील.
देऊळवाडा दणाणला
प्रस्थान सोहळा सुरू होताच देउळवाड्यात उपस्थित वारकऱ्यांनी ज्ञानोबा-तुकारामांचा अखंड जयघोष सुरू होता. गेल्या अनेक महिन्यांनंतर देउळवाडा टाळमृदंगाच्या गजराने दुमदुमून गेला. उपस्थित वारकऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह होता. यंदा प्रथमच उपस्थित असलेल्या संभाजीराजे छत्रपती यांनीही टाळ हातात घेऊन ठेका धरला. देऊळवाड्याच्या परिसरातील उंच इमारतींवरून भाविक हा सोहळा पाहत होते.
Esakal