कोरोना संसर्गाचे घटते प्रमाण लक्षात घेऊन उत्तराखंडमधील व्हॅली ऑफ फ्लॉवर खुले करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
कोरोना संसर्गाचे घटते प्रमाण लक्षात घेऊन उत्तराखंडमधील व्हॅली ऑफ फ्लॉवर (Valley of Flowers Uttarakhand) खुले करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 1 जुलैपासून फुलांचे हे पठार खुले झाली असून पर्यटकांना येथे प्रवेश मिळणार आहे. मात्र, या पठारात येणाऱ्या पर्यटकांना कोविड चाचणी बंधनकारक असणार आहे. गेल्या वर्षी कोविडमुळे हे पठार 1 ऑगस्ट रोजी खुले करण्यात आले होते, परंतु यावर्षी हे पठार महिन्याभरापूर्वी खुले करण्यात आलेय. नंदा देवी राष्ट्रीय उद्यानाचे वन संरक्षक नंदा शर्मा यांनी सांगितले, की काही दिवसांपूर्वी वनविभागाच्या उच्च अधिकाऱ्यांनी तीन दिवस या खोऱ्याला भेट देऊन इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर येथील रस्ते आणि पूलही दुरुस्त केले. यासह पॉलीगोनम गवत उपटण्याचे कामही या दिवसांत सुरू आहे. डीएफओ नंदा वल्लभ शर्मा म्हणाले, या खोऱ्यात येणाऱ्या पर्यटकांना कोविड नियम पाळणे बंधनकारक असून कोरोनाची निगेटिव्ह चाचणी आवश्यक आहे. शिवाय इतर राज्यांतील पर्यटकही कोविड नियमांचे पालन करून उत्तराखंडात येऊ शकतात. बर्फाच्छादित पर्वतांच्या मधोमध वसलेल्या फुलांच्या या खोऱ्यात रंगीबेरंगी फुले उमलण्यास सुरुवात झाली असून खोऱ्यात सर्वत्र हिरवळ पसरली आहे.सध्या या खोऱ्यात जवळपास 50 प्रजातींची फुले फुलली आहेत, तर जुलै आणि ऑगस्टच्या अखेरीस 300 हून अधिक प्रजातींची फुले या खोऱ्यात फुलत असतात. जपानचे राष्ट्रीय फुल ब्ल्यू पॉपी, फ्रीटिलारिया, हिमालयन स्लीपर यासह अन्य प्रजातींची फुले बहरण्यास सुरुवात झाली आहे. हे खोरे जवळ-जवळ 87.50 चौरस फूट क्षेत्रावर पसरली असून येथे भेट देण्याचा उत्तम काळ जुलै ते ऑगस्ट हा सर्वात उत्तम आहे.गेल्या वर्षी 1 ऑगस्ट रोजी पर्यटकांना खोऱ्यात येण्याची परवानगी होती. दरम्यान, 942 पर्यटक या खोऱ्यात दाखल झाले होते. त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्यात ही दरी बंद करण्यात आली होती. उत्तराखंडमधील ऋषिकेशपासून 271 कि.मी. अंतरावर बद्रीनाथ महामार्ग असून येथील गोविंदघाट गाठल्यानंतर येथून फुलांच्या खोऱ्यात जाणारा प्रवास सुरू होतो. मात्र, या खोऱ्यात जाण्यासाठी घांघरियातून पर्यटकांना 14 कि.मी. अंतर कापून चालत जावे लागते.घांघरियातून दोन पदपथ जातात. एक मार्ग फुलांच्या दरीकडे आणि दुसरा मार्ग हेमकुंड साहिबकडे जातो. फ्लॉवर व्हॅलीमध्ये प्रवेश करण्यासाठी नंदा देवी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाकडून परवानगी घेतली जाते व फी जमा केली जाते. सध्या दुपारपर्यंत घाटीत जाण्याची परवानगी असून खोऱ्यात मुक्काम करण्याची व्यवस्था नसल्याने दुपारी घंगारियाला परत येणे आवश्यक आहे.