पुणे : लॉकडॉऊन… विविध प्रकारचे निर्बंध असले म्हणून काय झालं, पुण्यातील शिवकालीन कुंभारवाड्याने आता डिजीटल मार्केटिंग सुरू केलं आहे. त्यामुळे त्यांची उत्पादने अगदी सातासमुद्रापारही जाऊ लागली आहेत. चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे कुंभारवाड्याला उभारी आली असून त्यांना आत्मविश्वासाची नवी झळालीही आली आहे.
शहरातील कसबा पेठेत अगदी शिवकाळापासून असलेल्या कुंभारवाड्याचा हंगाम मार्च महिन्यात सुरू होता. मात्र, त्याच काळात लॉकडाउन सुरू झाला. त्याचा परिणाम विक्रीवर झाला. या परिस्थितीला हार न जाता आपल्याची उत्पादनांची विक्री करण्याचे दूसरे पर्याय या व्यावसायिकांनी शोधले. लॉकडाउनचे निर्बंध वाढतच राहिले. मात्र फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉटसअप ग्रूप आदींच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केल्याने या लॉकडाउनच्या काळातही त्यांच्या उत्पादनांचा चांगला खप झाला. त्यामधे विविध प्रकारची चित्र, कलाकुसर केलेले मडकी, दिवे, पणत्या, वारकरी, वारली पेंटिंगची चित्रं, स्वयंपाकाची भांडी, कुंड्या आदी उत्पादनांचा समावेश आहे, असे विक्रेते अब्बास गलवानी यांनी सांगितले. ऑनलाईनद्वारे वस्तू पाठविताना त्यांचे पॅकिंगही चांगल्या पद्धतीचे असावे, यावर आम्ही आता लक्ष देत आहोत, असे युसूफ कुंभार यांनी नमूद केले.

Also Read: भन्नाट! दारु पिल्यावर कारही तुमच्यावर रुसणार; स्टार्टच होणार नाही
विक्रेते सोमनाथ वाघोलीकर- कुंभार म्हणाले, ‘‘पूर्वी आम्ही कॅश स्वरुपात ग्राहकांकडून पैसे घेत असत. आता गूगल पे, फोन पे यांसारख्या ऑनलाइन पेमेंटमुळे पैसे थेट बँक खात्यात जमा होतात. त्यामुळे खरेदी- विक्रीच्या व्यवहारांना वेग आला आहे अन ते सोयीचेही पडत आहे. तसेच सोशल मीडियाचा वापर केल्यामुळे उत्पादनांची विक्रीही नेहमीच्या तुलनेत आता वाढू लागली आहे.’’
‘‘कोरोनाच्या भीतीमुळे लोक आता ऑनलाईनद्वारे खरेदी करण्यास पसंती देत आहेत. त्यामुळे ग्राहक आता इंटरनेटच्या सहाय्याने संपर्क करून कशाप्रकारे डिजाइन पाहिजे?त्यानुसार त्याची किंमत काय असेल?अशी सर्व विचारपुस करून मागणी नोंदवितात. पैसे फोन पे किंवा गूगल पे वरून पाठवितात. ग्राहकांच्या मागणीनुसार आवश्यक असणारी डिजाइन बनवून त्यांच्या पत्त्यावर वस्तुंची डिलीव्हरी करतो’’, असे विक्रेते प्रवीण बावधनकर यांनी सांगितले.
“नुकतेच नवीन घर घेतले. बाल्कनीत कुंडीमधे झाडे लावावीत,असा विचार होता. मात्र, लॉकडाउन असल्याकारणाने याची दुकाने बंद होती. मग ऑनलाइन मिळेल,या हेतुने फेसबुक, गूगल यांसारख्या सामजमाध्यमात शोधले असता संपर्क मिळाला. सर्व वस्तुंच्या किंमती जाणून घेऊन आवश्यक त्या डिजाइन सांगून आर्डर दिली.”
– रुपाली सोनवणे.(ग्राहक)
Esakal