आपल्याकडे दसऱ्याला सोनं लुटण्याची परंपरा आहे. खेळाडूंसाठी प्रतिष्ठेचं सोनं लुटण्याचा दसरा हा सण म्हणजे ऑलिंपिक! या स्पर्धेत जो सुवर्ण मिळवतो त्या यशाची झळाळी खऱ्याखुऱ्या सोन्यापेक्षाही निश्चितच अधिक… गळ्यातल्या त्या सुवर्णपदकाचं महत्त्व बावनकशीच असतं. आता हा ‘सण’, म्हणजेच टोकिओ ऑलिंपिक, अगदी तोंडावर आला आहे. तयारी सुरू होत असतानाच दीपिकाकुमारीनं एकाच दिवशी पॅरिस येथील विश्वकरंडक तीरंदाजी स्पर्धेत एक नव्हे तर, तब्बल तीन सुवर्णपदकं जिंकून केलेली विक्रमी कामगिरी ऑलिंपिकमधील आशांचा ‘दीप’ उजळणारी आहे.

आपल्या देशात खेळांची मोठी परंपरा आहे. कोणत्याही अंतिम परीक्षेअगोदरची पूर्वपरीक्षा अत्यंत महत्त्वाची असते. त्या परीक्षेत तुम्ही किती गुण मिळवता यापेक्षा तुमचा आत्मविश्वास किती बळकट होतो हे सर्वात महत्त्वाचं असतं. कारण, ऑलिंपिकसारख्या स्पर्धांमध्ये ‘उन्नीस-बीस’च्या फरकानं पदकांचा निर्णय होत असतो. तिथं सर्वच जण एकसारख्याच क्षमतेचे असतात, फरक असतो तो आत्मविश्वासाचा आणि त्याची पातळी आता दीपिकामध्ये योग्य वेळी उंचावली आहे.

गेल्या वर्षभराचा काळ सर्वांसाठीच फारच कठीण गेलाय. त्यातही खेळाडूंपुढं तर आव्हानांचे डोंगरच होते. मुळात अतिशय उच्चस्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंसाठी एकेक दिवस आणि प्रत्येक दिवसाच्या सराव-स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या असतात. थोडासा जरी खंड पडला तरी मोठी पीछेहाट होत असते. कोरोनाची पहिली लाट देशात आल्यावर, मुळात काय करायचं, हेच समजत नव्हतं. अशा वेळी सराव तर दूरच; पण तंदुरुस्ती आणि आत्मविश्वास किमान कायम ठेवण्यासाठी झगडावं लागत होतं. जगातील एकूणच कोरोनाची स्थिती पाहता भारताला त्याचा मोठा फटका बसला आणि त्यात ऑलिंपिक जवळ येत असताना खेळाडूंना मात्र शर्थीची लढाई लढावी लागली. अशा आव्हानात्मक स्थितीत दीपिककुमारी ऑलिंपिकसाठी पदकांच्या शर्यतीत येणं हे फारच कौतुकास्तपद आहे.

तीरंदाजीचे दाखले रामायण-महाभारतापासून मिळतात; पण या खेळात भारताला अद्याप एकही ऑलिंपिक पदक मिळालेलं नाही हे वास्तव आहे. अनेक वर्षांपूर्वी एक प्रयोग झाला होता. थेट आदिवासींमधून शोध घेण्यात आला आणि त्यातून लिम्बारामसारखा खेळाडू गवसला. वेगवेगळ्या स्पर्धांत त्यानं यशही मिळवलं; पण ऑलिंपिकपदक दूरच राहिलं. अनेक खेळाडू आले; पण दीपिकाकुमारीचा स्तर वेगळ्या उंचीचा आहे.

दीपिकाकुमारीनं हे यश ऑलिंपिकच्या उंबरठ्यावर मिळवलं असलं तरी ऑलिंपिकमधील आव्हान सोपं नसेल. कारण, ज्या विश्वकरंडक स्पर्धेत दीपिकाकुमारीनं गेल्या रविवारी पदक मिळवलं तीत कोरिया, जपान, चीन या देशांतील स्पर्धक नव्हत्या. तीरंदाजीतील सुवर्ण हमखास कोरियाच्या खेळाडूंना मिळत असतं. त्यामुळे दीपिकाकुमारीला अधिक कुशाग्रतेनं लक्ष्यभेद करावा लागणार आहे.

या यशानंतर दीपिककुमारी ‘रिकर्व्ह’ या प्रकारात जागतिक क्रमवारीत पुन्हा अव्वल झाली आहे. शेवटी, हे सर्व घटक आत्मविश्वास उंचावण्यासाठी खूपच उपयुक्त ठरत असतात. नेमबाजीप्रमाणे तिरंदाजीतही तुम्ही ‘बुल्स आय’एवढी अचूकता दाखवली तर प्रतिस्पर्धी काय करतोय याची चिंता करण्याचं कारण नसतं. म्हणूनच राही सरनौबतप्रमाणे दीपिकाकुमारीनंही सातत्य ठेवलं तर टोकिओत तिरंगा फडकणार यात शंका नाही.

महेंद्रसिंह धोनीनं खेळाच्या नकाशावर आणलेली रांची ही दीपिकाकुमाराची जन्मभूमी. रतुघाटी या गावात वडील रिक्षाचालक, तर आई परिचारिका अशा सामान्य कुटुंबात जन्मलेल्या दीपिकाकुमारीला दगडानं झाडावरील आंब्याचा अचूक वेध घेण्याची सवय आणि हीच अचूकता आता तीरंदाजी खेळात परिवर्तित झाली. लहानपणीच तीरंदाजीची ओळख झाली खरी; पण धनुष्य घेण्यासाठी पैसा हवाच. तो कसा मिळणार? त्यामुळे सुरुवातीला बांबूचा तीर-कमठा करून दीपिकाकुमारीनं श्रीगणेशा केला. याच रांचीत धोनीसुद्धा टेनिसबॉल क्रिकेट खेळून जगद्विख्यात क्रिकेटपटू झाला. प्रबळ इच्छाशक्ती आणि पराकोटीची मेहनत असेल तर मार्ग सापडतोच. तोच दीपिकाकुमारीला सापडला. सन २००५ मध्ये दीपिकाकुमारीनं प्रशिक्षणाला सुरुवात केली असली तरी २००६ मध्ये जमशेदपूर येथील ‘टाटा तीरंदाजी अकादमी’तून तिनं तंत्रशुद्ध प्रशिक्षणाचं पहिलं लक्ष्य साधलं. त्यानंतर ओढलेला बाण प्रशिक्षण आणि स्पर्धा अशा दोन्ही आघाड्यांवर अचूक लक्ष्यभेद करत राहिला. सन २००९ मध्ये ‘विश्व किशोर अजिंक्यपद स्पर्धे’त विजेतेपद मिळवल्यावर तीन वर्षांनंतर ती प्रथमच रतुघाटी येथील आपल्या घरी परतली. यावरूनच तिला जळी-स्थळी तीरंदाजीच दिसत होती हे स्पष्ट होतं आणि अशी मेहनत घेणारेच ऑलिंपिकपदकाची आशा निर्माण करत असतात…

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here