महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी असल्यामुळे मराठीचा कायमच आग्रह केला जातो. त्यामुळे अनेकदा मराठी भाषेवरुन काही वाददेखील पेटले आहेत. यामध्येच अनेकदा मराठी कलाकारांनादेखील ट्रोल केलं जातं. एखाद्या कलाकाराने हिंदी मालिका, चित्रपट किंवा जाहिरातीमध्ये काम केलं. तर लगेच त्यांना ट्रोल करण्यात येतं. असाच काहीसा प्रकार अभिनेत्री प्रिया बापटसोबत घडला आहे. मात्र, प्रियाने या ट्रोलर्सला सडेतोड शब्दांत उत्तर दिलं आहे.
अलिकडेच प्रियाने इन्स्टाग्रामवर तिच्या एका जाहिरातीचा व्हिडीओ शेअर केला होता. ही जाहिरात घरांच्या प्रोजेक्टची होती. विशेष म्हणजे या जाहिरातीमध्ये प्रियासोबत तिचा नवरा, अभिनेता उमेश कामतही झळकला आहे. मात्र, ही जाहिरात हिंदीमध्ये असल्यामुळे अनेकांनी प्रियाल ट्रोल करण्यास सुरुवात केली. यावर प्रियाचा संताप अनावर झाला असून तिने ट्रोलर्सला सडेतोड शब्दांत उत्तर दिलं आहे.
घर काय फक्त मराठी माणसंच घेतात का ?? माझी मातृभाषा मराठी आहे म्हणजे भारतात फक्त मराठीच बोलतात का ? मग तुम्ही हिंदी चित्रपट, English webs series का बघता? एकीकडे मराठी कलाकारांना सतत विचारायच की तुम्ही हिंदीत काम का करत नाही? आणि जर सर्वांना समजेल अशा भाषेत जाहिरात केली तर असे टोमणे मारायचे. तुमच्या दुटप्पीपणाचं दु:ख वाटतं, असं सडेतोड उत्तर प्रियाने दिलं आहे.

दरम्यान, गेल्या काही काळात मराठी कलाकारांना ट्रोल करण्याचं प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे. अनेकदा कलाकारांना या ट्रोलर्सचे वाईट अनुभवदेखील आले आहेत. त्यामुळे अनेक कलाकार सधअया सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. किंवा, सडेतोड शब्दांमध्ये ट्रोलर्सला उत्तर देत आहेत.
Esakal