नवी दिल्ली – कोव्हॅक्सिन लस (Covaxin Vaccine) कोरोना विषाणूविरुद्ध (Coronavirus) लढण्यासाठी ७८ टक्के प्रभावी ठरते व घातक अशा डेल्टा व्हेरियंटच्या (Delta Varient) विरुद्ध ती ६५.२ टक्के प्रभावी ठरते,असे तिसऱ्या व अंतिम चाचणीतून आढळून आल्याची माहिती भारत बायोटेक (Bharat Biotech) कंपनीने दिली आहे. (Covaxin is Effective against Delta Bharat Biotech Information)

कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्यांचे अधिकृत निष्कर्ष भारत बायोटेकने जारी केले. जानेवारीत कोव्हॅक्सिनच्या तीन चाचण्या होण्यापूर्वीच केंद्राने या लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली होती. त्यानंतर भारत बायोटेकने तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्या पूर्ण केल्या आहेत. देशातील २५ केंद्रांवर १८ ते ९८ वयोगटातील २५ हजार ८०० जणांवर लसीच्या चाचण्या घेतल्या. यात सहभागी स्वयंसेवकांना लसीचे दोन्ही डोस दिल्यावर दोन आठवडे डॉक्टरांनी त्यांच्या आरोग्यावर देखरेख ठेवली. त्या निष्कर्षानुसार कोव्हॅक्सिन लस गंभीर संक्रमणाविरुद्ध तब्बल ९३.४ टक्के प्रभावी ठरते, असे चाचण्यांत आढळल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कोरोना रुग्णांवर विषाणूचा दुष्प्रभाव रोखण्यासाठी ती ७७.८ टक्के व लक्षणे न आढळणाऱ्या रुग्णांसाठी ती ६३ टक्के प्रभावी ठरते. केंद्र सरकारने यंदा जानेवारीत कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली होती. मात्र तिन्ही चाचण्या पूर्ण न होताच लसीला परवानगी दिल्याबद्दल सरकारवर टीकाही झाली होती. दिल्लीतील अनेक डॉक्टरांनीही ही लस टोचून घेण्यास नकार दिला होता. अनेक राज्यांनीही या लसीबाबत नकारार्थी सूर लावला होता. ही लस मेड इन इंडिया कोविड-१९ लस म्हणून ओळखली जाते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here