भाजप आमदार राम सातपुतेंचा अधिवेशन सुरू होण्याआधीच आक्रमक अंदाज
मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी नसल्यामुळे एका २४ वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास स्वप्निल सुनील लोणकर या तरूणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वप्निल याच्या आत्महत्येने सर्वत्र शोक व्यक्त केला जात असून विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ऐन तारूण्यात स्वप्निलने टोकाचं पाऊल उचलल्यामुळे पुन्हा एकदा सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली जात आहे. तशातच आज पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाची सुरूवात होण्याआधी आष्टीचे भाजप आमदार राम सातपुते या मुद्द्यावर आक्रमक झाले आणि त्यांनी घोषणाबाजी केली. (MPSC student Swapnil Lonkar Suicide BJP MLA Ram Satpute Aggressive says Govt only worries about Aaditya Thackeray Parth Pawar)
Also Read: राजधानी मुंबई – हतबल तरुणांचे नि:श्वास
“विद्यार्थी दिवसरात्र अभ्यास करतात आणि सरकार विद्यार्थ्यांना अशाप्रकारे वागवतं ही खूपच वाईट गोष्ट आहे. मी सरकारच्या तोंडावर MPSCचे पुस्तक फेकणार आहे. स्वप्निलने केलेली आत्महत्या ही सरकारच्या कुचकाम धोरणामुळे करण्यात आलेली हत्या आहे. स्वप्निलसारख्या ३००० मुलांच्या मुलाखती रखडल्या आहेत. सरकार काय करतंय? यांना फक्त आदित्य ठाकरे, पार्थ पवार आणि रोहित पवार यांच्याच भविष्याची चिंता आहे. स्वत:ची लेकरं-बाळं आमदार खासदार व्हायला हवीत इतकंच या नेत्यांचे धोरण आहे. पण कष्टकरी जनतेच्या पोरा-बाळांची त्यांना चिंता नाही”, अशा शब्दात राम सातपुते यांनी सरकारच्या कार्यपद्धतीबाबत निषेध नोंदवला.

Also Read: लसीचा डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास खुला करा, कर्नाटक पॅटर्न मुंबईत राबवा
“सत्ताधारी लोकांना मी दाखवण्यासाठी हे पुस्तक आणलं आहे की ही मुलं किती अभ्यास करतात ते बघा. या पुस्तकातली चार-दोन प्रश्नांची उत्तरं जरी त्यांना देता आली तरी खूप झालं. तेदेखील त्यांना माहिती नसेल. कारण यांना फक्त स्वत:च्या मुलांच्या भविष्याबाबत काळजी लागून राहिली आहे. हे सरकार निर्लज्जम सदासुखी असं आहे. त्यांना बोलून काही उपयोग नाही हे माहिती आहे पण तरीही आम्ही आवाज उठवणारच आहोत”, असेही सातपुते म्हणाले.
Esakal