भारत-पाकिस्तानातील (india vs pakistan) ऐतिहासिक दुश्मनीचा वणवा अधूनमधून भडकत असतो; पण खेळाच्या मैदानावरच्या उमद्या लढायांमधून पुन्हा दिल-दोस्ती-दुनियादारीचा सिलसिला सुरू होतो. अशाच दिलेर दोस्तीचा (friendship) उमदा इतिहास १९६० मध्ये लाहोरच्या स्टेडियमवर लिहिला गेला. भारताचे धावपटू मिल्खा सिंग (milkha singh) यांनी पाकिस्तानी धावपटू अब्दुल खालिक यांचा पराभव केला. इतिहास पराभूतांचा लिहिला जात नाही असं म्हणतात. तेच कटुसत्य त्यानंतर अब्दुल खालिक (abdul khaliq) यांच्या वाट्याला आलं; पण फ्लाईंग सिख मिल्खा सिंग यांनी आपल्या या शत्रूला शेवटपर्यंत दिलदारीनं वागवलं. त्यांच्या दिलेर दोस्तीची ही अनजानी कहाणी… (legend flying sikh milkha singh pakistans abdul khaliq famliy regreat about these things)
मिल्खा सिंग यांनी २००९ मध्ये खालिक यांचा मुलगा मोहम्मद इजाज यांना पहिल्यांदा फोन केला. मिल्खा सिंग पंजाबीत म्हणाले ‘पुत्त माझ्यावर चित्रपट बनतोय, त्यात तुझ्या वडिलाचा रोल आहे. तुझी परवानगी हवी आहे. इजाज यांनी मिल्खा साहब, माझ्याकडून पूर्ण परवानगी आहे, असं म्हणत लाहोरच्या त्या रेसची आठवण काढली. त्यावर मिल्खा सिंग म्हणाले ‘पूत्त तुझे वडील खूप मोठे खेळाडू होते. त्यांच्यामुळे हा सरदार मोठा झाला, फ्लाईंग सिख झाला.’’ त्यानंतर मिल्खा सिंग आणि खालिक यांच्या मुलामध्ये पाच ते सहा वेळा बोलणे झाले. प्रत्येक वेळी भारतात आल्यावर माझ्या घरी उतरावेस, आमचा पाहुणचार घ्यावा लागेल, असा आग्रह मिल्खा सिंग यांचा असायचा.
मिल्खा आणि खालिक
मिल्खा सिंग आणि अब्दुल खालिक दोघेही गरीब कुटुंबात जन्मले. लष्करी सेवेत गेले. टोकियो आणि लाहोरमधील दोन स्पर्धांदरम्याम दोघांची भेट झाली. दोघेही एकमेकांचे कट्टर स्पर्धक होते; मात्र खिलाडू वृत्तीमुळे दोघांच्या नात्यात कधीच कटुता आली नाही.
१९७१ मध्ये मेरठमध्ये युद्धकैदी म्हणून ठेवलेल्या खालिक यांना मिल्खा सिंग भेटायला गेले. यावरून दोघांमधील प्रेम, मैत्री दिसून येते. दोन्ही परिवार आजही एकमेकांशी घट्ट जुळलेले आहेत. भारतात स्पर्धेनिमित्त आलेले पाकिस्तानी खेळाडू मिल्खा सिंग यांना भेटायचे. त्या वेळी मिल्खा सिंग हे खालिक यांची आठवण काढत असत.
‘भाग मिल्खा भाग’मुळे कारकिर्दीला उजाळा
‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटामुळे अब्दुल खालिक यांच्या जीवनावरही प्रकाश पडला. या चित्रपटाने विस्मृतीत गेलेल्या अब्दुल खालिक यांना नव्याने जिवंत केले. नव्या पिढीला अब्दुल खालिक यांच्याबद्दल माहिती मिळाली, त्यांच्याविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा वाढली.
Also Read: मुंबईतील शाळेचा कौतुकास्पद निर्णय; हजार विद्यार्थ्यांची फी माफ

दुसरी बाजू समोर येणे आवश्यक
मिल्खा चित्रपटात दोन दृष्ये टाकली असती तर दोन्ही खेळांडूची दुसरी बाजूही समोर आली असती, अशी भावना खालिक कुटुंबीयांनी व्यक्त केली. १९६० मध्ये लाहोर स्टेडियमवर मिल्खा सिंग यांनी खालिक यांना पराभूत केले; मात्र अनेकांना हे माहिती नाही, की दुसऱ्या दिवशी रिले स्पर्धेत अब्दुल खालिक यांनी मिल्खा सिंग यांना हरवले होते.
१९७१ मध्ये पाकिस्तानी युद्धकैदी म्हणून अब्दुल खालिक मेरठच्या तुरुंगात होते. या काळात मिल्खा सिंग खालिक यांना भेटायला गेले. मिल्खाजींनी दोस्ती निभावली. ही दोन दृष्ये चित्रपटात असती, तर मिल्खा सिंग यांच्यासोबत खालिक यांचा मोठेपणा जगासमोर येऊ शकला असता.
Also Read: तिसर्या लाटेची भीती : प्रत्येक हाय रिस्क वॉर्डात एका रूग्णामागे 32 जणांच्या चाचण्या
मिल्खा सिंग यांच्याबद्दल खालिक यांच्या भावना
खालिक शांत स्वभावाचे होते. ट्रॅकवरून निवृत्त झाल्यावर त्यांनी कधीच खेळाबद्दल, रेकॉर्डबद्दल एक शब्द काढला नाही. ते म्हणायचे ‘मैने खेल लिया.’ त्यांना मिळालेल्या ट्राफी, पुरस्कार ते मित्रांमध्ये वाटून द्यायचे.
लाहोरमध्ये पहिल्या दिवशी मिल्खा सिंग यांनी खालिक यांना पराभूत केलं. दुसऱ्या दिवशी रिले स्पर्धा होती. त्यामध्ये खालिक यांच्याकडे बॅटन सर्वप्रथम आला, मिल्खा सिंग यांना उशीर झाला; मात्र मिल्खा सिंग यांच्याकडे बॅटन येईपर्यंत अब्दुल खालिक थांबले. बॅटन आल्यानंतर ते म्हणाले, ‘मिल्खाजी आप जरा जोर लगा के दौड लगाये…’
‘परिंदा ऐ एशिया’- ‘फ्लाईंग सिख’
१९५६ मध्ये मनिला इथे आशियाई स्पर्धा भरल्या होत्या. मख्खन सिंग, पिंटो हे त्या वेळचे उत्तम धावपटू होते. मख्खन सिंग एकदा म्हणाले होते, की ‘माझ्या पायाने उडालेल्या मातीलाही खालिक स्पर्श करू शकणार नाही.’ खालिक यांना हे शब्द लागले आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी १०० मीटर, २०० मीटरच्या स्पर्धा जिंकून एक नवा विक्रम रचला. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्या वेळी खालिक यांना ‘परिंदा ऐ आशिया’ असा मानाचा किताब दिला. तो त्यांनी आयुष्यभर जपला. त्याच पद्धतीने १९६० मध्ये लाहोर इथे जनरल अयूब खान यांनी मिल्खा सिंग यांना ‘फ्लाईंग सिख’ नावाची पदवी दिली. ते आयुष्यभर याच नावाने ओळखले गेले.
मिल्खाजींनी नाते जपले
मिल्खा सिंग यांनी खालिक यांचा मुलगा एजाजला मुलासारखी वागणूक दिली. त्या अर्थाने मिल्खा सिंग आणि अब्दुल खालिक एकमेकांचे कधीच मित्र नव्हते. आयुष्यात दोनदा ते भेटले; मात्र तरीही त्यांच्या मैत्रीची वीण घट्ट होती. मिल्खा सिंग यांनी अखेरपर्यंत मैत्री निभावली.
खालिक यांचा सन्मान जपता आला असता
मिल्खा सिंग यांना भारताने डोक्यावर घेतले, त्यांना प्रेम दिलं; मात्र त्या तुलनेत पाकिस्तानमध्ये खालिक यांच्या वाट्याला तेवढा सन्मान आला नाही. अब्दुल खालिक यांच्यामुळे त्यांचे जंद अवंद हे गाव पाकिस्तान नव्हे, जगाच्या नकाशावर आले; मात्र या गावाला जायला पक्का रस्ता नाही. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी साधे म्युझियम उभारले नाही. शालेय अभ्यासक्रमात खालिक यांच्यावर एक धडा नाही. या सर्व गोष्टीचे खालिक यांच्या कुटुंबीयाला दु:ख आहे.
Esakal