पिंपरी – शहरातील किती नागरिकांना कोरोना संसर्ग (Coronavirus) झाला असावा, याचे अनुमान काढण्यासाठी महापालिकेने (Municipal) सिरो सर्वे (Siro Survey) केला. त्यात सरासरी ८१.४० टक्के नागरिकांना संसर्ग होऊन गेल्याचे स्पष्ट झाले. मात्र, कोविड विषाणूच्या रचनेत बदल होत असल्याने त्याचे वेगवेगळे स्ट्रेन तयार होत आहेत. त्यामुळे एकदा संसर्ग होऊन गेल्यानंतर तो पुन्हा होणार नाही किंवा ‘मी लस घेतली आहे, मला काहीही होणार नाही,’ अशा अविर्भावात कोणी राहू नये, नियमांचे पालन करायलाच हवे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. (Dont Worry if You Get Vaccinated)
गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाने शहराला वेठीस धरले आहे. जवळपास १६ महिने झाली, संसर्ग झालेल्यांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. सहा महिन्यांपासून लसीकरण सुरू आहे. तरीही प्रतिदिन दोनशेपेक्षा अधिक व्यक्तींना संसर्ग झाल्याचे तपासणीत आढळत आहे. त्यामुळे किती नागरिकांना संसर्ग झाला असावा, यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार (आयसीएमआर) महापालिकेने सिरो सर्वे केला. त्यात ८१.४० टक्के नागरिकांमध्ये ॲंटिबॉडिज (प्रतिपिंडके) आढळून आल्या आहेत. म्हणजेच तितक्या लोकांना कोरोना होऊन गेल्याचे स्पष्ट झाले.

असा झाला सर्वे
शहराची २०० क्लस्टर्समध्ये विभागणी करून १६ ते २६ जूनदरम्यान सर्वे केला. विभाग, वय व लिंग यानुसार १० हजार नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेतले. त्यांतील अँटिबॉडीज तपासून संसर्गाबाबत निष्कर्ष काढण्यात आला.
उद्देश
-
लोकांच्या शरिरातील ॲंटिबॉडिजची पातळी तपासणे
-
संसर्गापूर्वी व संसर्गानंतरचे प्रमाण तपासणे
-
लसीकरणानंतर वाढलेली प्रतिकारशक्ती तपासणे
फायदा
-
किती नागरिकांना संसर्ग झाला, याचा अंदाज आला
-
संसर्गाच्या वाढत्या प्रसाराचे प्रमाण कळाले
-
केलेले उपचार व लसीकरणाची उपयुक्तता कळाली
Also Read: दिसेल त्या वाहनावर कोयते मारून माजवली दहशत
एखाद्या व्यक्तीला व्हायरसची लागण होते, तेव्हा त्याच्या शरिरात ॲंटिबॉडिज अर्थात प्रतिपिंडके तयार होतात. त्यांचे प्रमाण किती आहे, ते पाहण्यासाठी सिरो सर्वे केला. त्यात ४५ वर्षांवरील नागरिकांमध्ये ॲंटिबॉडिजचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा अधिक आढळून आले आहे. या सर्वेतून ॲंटिबॉडिजचे प्रमाण ठरवले गेले.
– डॉ. पवन साळवे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी, महापालिका
कोविड विषाणूची रचना बदलते आहे. त्याचे वेगवेगळे स्ट्रेन तयार होत आहेत. डेल्टा व्हायरस हा त्याचाच प्रकार आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी औषध उपलब्ध नसल्याने प्रतिकारशक्ती वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी लस घेणे हाच सध्या रामबाण उपाय आहे. सोशल डिस्टंसिग तसेच नियमांचे पालनही गरजेचे आहे.
– डॉ. श्रीकृष्ण जोशी, सहयोगी उपाध्यक्ष, लोकमान्य हॉस्पिटल
कोरोनाची सुरुवातीला खोकला, डोके दुखी, वास ने येणे अशी लक्षणे होती. त्यात आता बदल झाला आहे. नाक गळणे, घसा खवखवणे, ताप ही लक्षणे दिसू लागली आहेत. म्युकर मायकोसिस, व्हाइट फंगस, डेल्टा प्लस हे त्याचेच प्रकार आहेत. रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी होते. ती वाढवणे आवश्यक आहे.
– डॉ. संदीप पाटील, फिजिशियन, वायसीएम
Esakal