पुणे : वजन कमी करण्यासाठी योगा, जिमबरोबरच महिलांचा कल आता झुंबा या व्यायाम प्रकाराकडे वाढत चालला आहे. त्यातून सहजपणे वजनही कमी होत असल्यामुळे ‘झुंबा’ लोकप्रिय होत असून त्याच्या ऑनलाईन वर्गांनाही उदंड प्रतिसाद मिळत आहे.

झुंबा या प्रकारात एकामागोमाग एक गाणी लावून त्यावर ठरावीक नृत्यासारख्या ‘स्टेप्स’ केल्या जातात. यातील संगीत व गाणी ठरलेली असतात. संगीत हेच झुंबाच्या आकर्षणाचे केंद्र आहे. संगीताच्या तालावर ४५ ते ६० मिनिटे वेगवेगळ्या स्टेप्स करायच्या. या नृत्य प्रकारात वेग असतो. त्यामुळे सलग हा नृत्यप्रकार करताना होणाऱ्या व्यायामामुळे आपोआपची वजन कमी होते. या प्रकारात नृत्य आणि व्यायाम, या दोन्हीचा अंतर्भाव असल्यामुळे महिलांमध्ये आणि विशेषतः युवतींमध्ये झुंबा लोकप्रिय आहे. त्यासाठीचे प्रशिक्षित प्रशिक्षकही आहेत.

काही ‘जिम’मध्ये तर काही नृत्याच्या वर्गांमध्ये झुंबा शिकविला जातो. त्यासाठी दरमहा एक हजार ते तीन हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. त्याच्या बॅचेस रोज असतात. झुंबामध्ये विशेष साधनांची आवश्यकता नसते. मोबाईल स्पिकरला कनेक्ट करून गाणी लावली जातात. त्यामुळे हा प्रकार सुटसुटीत समजला जातो.

झुंबाची लोकप्रियता वाढण्याचे कारण स्पष्ट करताना प्रशिक्षक सुकन्या कंदलकर म्हणाल्या, ‘‘झुंबा हा मुळात नृत्य आणि व्यायाम प्रकार आहे. संगीत सुरू असल्यामुळे तो करताना सलगता येते. ऑनलाईन क्लासेसमुळे महिला न्यूनगंड न ठेवता आपापल्या घरातही हा व्यायाम सहज आणि केव्हाही करू शकतात. ’’

ऋचा जोशी म्हणाली, ‘‘मला मुळात नृत्याची आवड आहे. त्यामुळे भरतनाट्यमचेही मी शिक्षण घेतले. वजन कमी करण्यासाठी झुंबा शिकण्याचे ठरविले. वर्षभर सलग हा प्रकार केल्यामुळे माझे वजन १३ किलोने कमी झाले.

लॉकडॉऊनमध्ये ऑनलाईन झुंबा क्लास मी लावला. हा नृत्य प्रकार व्यवस्थित शिकण्याचा प्रयत्न केला. त्यातून तीन महिन्यांत ४ किलो वजन घटल्याचे भूमिका देशमुखने सांगितले.

झुंबा प्रशिक्षक प्रज्ञा पापल म्हणाल्या, ‘‘लॉकडाऊनच्या कालावधीत झुंबाचे आम्ही ऑनलाईन क्लासेस घेतले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यात पुण्यातलेच नाही तर इतर जिल्ह्यांतील आणि राज्यातील महिलांचा समावेश होता.’’ –

झुंबा डान्सचे फायदे

  • झुंबा डान्समुळे तंदुरुस्ती वाढते

  • या डान्स प्रकारामुळे एका तासात ४०० ते ६०० कॅलरीज बर्न होतात.

  • झुंबा डान्समुळे शरीरातील प्रत्येक अवयवावर ताण येतो .

  • पचनसंस्था सुधारते, रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते

  • या डान्समुळे आपले शरीर संतुलित राहते, शरीर लवचिक होते

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here