पुणे – देशातील सर्वाधिक उद्यानांचे (Garden) शहर म्हणून लौकिक असलेल्या बंगळुरूच्या तुलनेत पुण्यातील (Pune) उद्यानांनी क्षेत्रफळाच्या बाबतीत बाजी मारल्याचे उद्यान विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते आहे. बंगळुरूच्या तुलनेत केवळ २० टक्के उद्याने असलेल्या पुण्यातील उद्यानांचे एकूण क्षेत्रफळ मात्र बंगळुरुतील उद्यानांच्या एकूण क्षेत्रफळाच्या ६० टक्क्यांहून अधिक असल्याचे समोर आले आहे. (Municipal Administration Emphasizes on Development Improvement and Monitoring of Pune Parks)

‘बृहत् बंगळुरू महापालिके’च्या आकडेवारीनुसार, एकूण ७०६ चौरस किलोमीटरवर पसरलेल्या बंगळुरू शहरात जवळपास ४० लाख चौरस मीटर क्षेत्रफळावर १,०२० उद्याने आहेत. तर पुणे महापालिकेच्या ३३२ चौरस किलोमीटर हद्दीत (नव्याने समाविष्ट २३ गावे वगळता) जवळपास २५ लाख चौरस मीटर क्षेत्रफळावर २०४ उद्याने आहेत. शहरातील हरित क्षेत्र कोणत्याही परिस्थितीत कमी होऊ न देता त्यात वाढच होईल, या पद्धतीने विकासकामांचे नियोजन केले जात असल्याचे हे दृश्य परिणाम आहेत, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले.

Also Read: वजन कमी करण्यासाठी महिलांमध्ये झुंबाची क्रेझ

कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय वगळता तीन क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश असलेल्या प्रत्येक परिमंडळात सरासरी साडेतीन लाख चौरस मीटरहून अधिक क्षेत्रावर उद्यानांची आजवर निर्मिती केली आहे. सध्या शहरात १५ हून अधिक संकल्पनाधारित उद्याने (थीम पार्क्स) असून, गेल्या चार वर्षांत सहा नव्या उद्यानांसह विविध प्रकल्प राबवून उद्याने अधिक आकर्षक करण्याचे महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.

नव्या उपक्रमांतर्गत कात्रजच्या प्राणिसंग्रहालयात हत्तींसाठी पोहण्याचा तलाव बांधला आहे. येथील मांजर-हायना-सिंह-जिराफ खंदक व रेप्टाईल पार्कचे काम प्रगतिपथावर असून मत्स्यालय, इंटरप्रिटेशन सेंटर, सभागृह व टॉय ट्रेनचे काम प्रस्तावित आहे. या प्रकल्पांमुळे राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाचे आकर्षण आणखी वाढणार आहे. सारसबाग व पेशवे उद्यानाचा एकात्मिक विकास आराखडा तयार करून येथील ३२ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय बोटॅनिकल गार्डन विकसित करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. ते पूर्ण झाल्यानंतर शहरातील चौथे बोटॅनिकल गार्डन असेल.

Also Read: पुण्याचा जावई होण्यासाठी दोन पैकी एक गोष्ट हवीच! मुलींच्या अपेक्षा

सर्वसामान्य नागरिकांमध्ये दिव्यांगांविषयी ममत्वाची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने ‘संवेदना पार्क’ उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. स्पर्श, वास आणि श्रवण या माध्यमातून या ठिकाणी वनस्पतींचे ज्ञान होईल. या उद्यानामध्ये लावण्यात येणाऱ्या ४२ प्रकारच्या झाडांची विस्तृत माहिती ब्रेल लिपीत, तसेच मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध असेल. वडगाव शेरी येथे दिव्यांगांना कोणत्याही अडथळ्याविना उद्यानाचा आनंद घेता यावा, यासाठी ‘बॅरियर फ्री ॲक्सेस या संकल्पनेवर उद्यान विकसित करण्यात येत आहे.

नेदरलँडमधील हेगस्थित ‘बर्नार्ड वॅन लिअर फाउंडेशन’ने लहान मुलांच्या दृष्टिकोनातून नगररचनेत बदल करण्याच्या हेतूने मांडलेल्या ‘अर्बन ९५’ या संकल्पनेवर आधारित उद्यान खराडीत उभारणार आहे. तीन वर्षांचे मूल अंदाजे ९५ सेंटिमीटर उंचीचे असते. नगरनियोजन करणाऱ्यांमध्ये या उंचीवरून शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन तयार व्हावा आणि त्यानुसार सुविधा विकसित व्हाव्यात, हा ‘अर्बन ९५’ या संकल्पनेचा मुख्य उद्देश. या संकल्पनेचा स्वीकार करणाऱ्या जगातील १३ निवडक शहरांमध्ये पुण्याचा समावेश आहे.

शहरातील पर्यावरण संवर्धनाचा उत्तम मार्ग उद्यानातून जातो. उद्याने शहरातील नागरिकांच्या आरोग्याचे आणि आनंदाचेही कारण असतात. गेल्या काही वर्षांत वाढलेल्या उद्यानांनी पुण्याची उद्यानश्रीमंती वाढवून शहराचे नाव उंचावले आहे.

– गणेश बिडकर, सभागृह नेता

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here