बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते दिलीपकुमार यांचं बुधवारी निधन झालं आहे. ते 98 वर्षांचे होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे खारच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर आज सकाळी साडेसात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या दमदार अभिनायने जवळपास सहा दशकं दिलीपकुमार यांनी चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. सामान्य माणसाच्या आयुष्यातील दुःख दिलीप कुमार यांनी त्यांच्या अभिनयातून उतरवलं होतं. त्यांना बॉलिवूडमधील ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून ओळखलं जातं. चित्रपटातील अनन्यसाधारण कामगिरीमुळे त्यांना अनेक पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. याच पद्मविभूषण पुरस्कारासंबंधी एक रंजक किस्सा आपण जाणून घेऊयात.
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना 60 वर्षाच्या चित्रपट सृष्टीतील कामगिरीसाठी 2015 मध्ये ‘पद्मविभूषण’ या देशातील दुस-या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले होतं. 13 डिसेंबर 2015 रोजी वयाच्या 93 व्या वर्षी दिलीपकुमार यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलीप कुमार यांच्या बांद्रयातील निवासस्थानी जाऊन पुरस्कार प्रदान केला होता. पदक, शाल आणि प्रमाणपत्र देऊन राजनाथ सिंह यांनी दिलीप कुमार यांना सन्मानित केले होते. या प्रसंगी दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानूही उपस्थित होत्या. त्या क्षणी भावुक झालेल्या सायरा बानू यांनी दिलीप कुमार यांच्या कपाळाचे चुंबन घेत त्यांचे अभिनंदन केले.
Also Read: ‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार काळाच्या पडद्याआड

Also Read: दिलीप कुमार यांचे टॉप-10 चित्रपट
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला २५ जानेवारी २०१५ रोजी केंद्र सरकारने पद्मविभूषण या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी दिलीप कुमार यांच्या नावाची घोषणा केली होती. वयोमान आणि प्रकृती अस्वास्थामुळे राष्ट्रपती भवनात झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते. त्यांचं कर्तुत्व आणि अनन्यसाधारण कामगिरीपाहून केंद्र सरकारमार्फत राजनाथ सिंह यांनी घरी जाऊन त्यांना पुरस्कार प्रदान केला होता. दिलीपकुमार यांनी चित्रपटसृष्टीला भरपूर योगदान दिले आहे. तेच लक्षात घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
Also Read: कारगिल युद्धात वाजपेयींनी घेतली होती दिलीप कुमारांची मदत
Esakal