पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. 43 खासदारांनी बुधवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात 36 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलीये. यात सात महिला खासदरांचा समावेश आहे.
उत्तर प्रदेशच्या अनुप्रिया पटेल, कर्नाटकमधून शोभा करंदालाजे, गुजरातच्या दर्शना विक्रम जरदोश, दिल्लीहून मीनाक्षी लेखी, झारखंडच्या अन्नपूर्णा देवी, ओडिसा राज्यातून प्रतिमा भौमिक आणि महाराष्ट्राच्या भारती प्रविण पवार या 7 खासदरांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यापूर्वी मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, साध्वी निरंजन ज्योती आणि रेणुका देवी यांचा समावेश होता. या चार नावासंह नव्या 7 महिला खासदारांसह मोदींच्या मंत्रिमंडळातील महिला मंत्र्यांची संख्या आता 11 वर पोहचली आहे.
अनुप्रिया सिंग पटेल (40)
उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर मतदार संघातून दुसऱ्यांदा अनुप्रिया सिंग या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. MBA च शिक्षण घेतलेल्या अनुप्रिया राजकारणाच्या मैदानात उतरण्यापूर्वी Amity University मध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या.

शोभा करंदालाजे (54)
कर्नाटक विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य राहिलेल्या शोभा करदांलाजे कर्नाटकमधील Udupi, Chikmagalur मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. खासदारकीची त्यांची ही दुसरी टर्म आहे. त्या देखील उच्चशिक्षित आहेत.

दर्शना विक्रम जरदोश (60)
गुजरातमधील सुरत मतदार संघातून निवडून आलेल्या दर्शना यांची ही तिसरी टर्म आहे. यापूर्वी त्यांनी सुरत महानगर पालिकेत महापौर म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. गुजरातच्या सामाजिक कल्याण मंडळाच्या सदस्यही राहिल्या आहेत.

मिनाक्षी लेखी (54)
मिनाक्षी लेखी या पेशाने सुप्रीम कोर्टाच्या वकील असून खासदारकीची त्यांनी दुसरी टर्म आहे. नवी दिल्लीतून त्या लोकप्रतिनीधी म्हणून निवडून आल्या आहेत.

अनुपमा देवी (51)
झारखंडच्या अनुपमा देवींची खासदारकीची पहिलीच टर्म आहे. त्यांनी यापूर्वी चारवेळा आमदारकीही भूषवली आहे. झारंखंडच्या मंत्रिमंडळात त्यांनी पाणीपुरवठा, महिला आणि बालकल्याण विभागाचा पदभार सांभाळला आहे. वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी त्यांची बिहारच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली होती.

प्रतिमा भौमिक (52)
त्रिपूराच्या प्रतिमा भौमिक यांची खासदारकीची पहिली टर्म आहे. त्या शेतकरी कुटुंबियातून आल्या आहेत. त्रिपुरा युनिवर्सिटीतून त्यांनी बायो सायन्सची डिग्री घेतली आहे.

भारती प्रवीण पवार (42)
महाराष्ट्रातील दिंडोरी मतदार संघातून पहिल्यांदाच खासदार झालेल्या भारती पवार यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. नाशिक जिल्हा परिषदेच्या सदस्या राहिलेल्या भारती पवार आता मंत्री झाल्या आहेत. त्या पेशाना डॉक्टर आहेत.

Esakal