यवतमाळ : जिल्ह्यातील झरी जामणी (zari jamani of yavatmal) तालुक्यातील वाघाचे हल्ले थांबण्याचे नावच घेत नाही. शुक्रवारी रात्री लघुशंकेला गेलेल्या मुलाला वाघाने उचलून नेल्याची घटना पिवरडोल गावात घडली असून आज सकाळी गावालगत असलेल्या शेतात त्याचा मृतदेह (tiger attack yavatmal) पडलेला आहे. (17 year old child died in tiger attack in zari of yavatmal)
Also Read: नाना पटोले, नितीन राऊत यांचा वाद पोहोचला दिल्ली दरबारी

अविनाश पवन लेनगुरे (१७), असे मृताचे नाव आहे. तो पिवरडोल येथील रहिवासी आहे. तो शुक्रवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास लघुशंकेला गेला. त्यावेळी दबा बसलेल्या वाघाने त्याला उचलून नेले. रात्रभर मुलगा घरी न आल्याने कुटुंबीयांनी गावात शोधले. मात्र, तो दिसून आला नाही. त्यानंतर ग्रामस्थांनी शेतशिवारात शोध सुरू केला. त्यावेळी गावालगतच्या शेतामध्ये त्याचा मृतदेहच आढळला. विशेष म्हणजे वाघ सकाळी देखील त्या मृतदेहाजवळ बसलेला होता. ग्रामस्थांनी त्याला हुसकावून लावण्याचे प्रयत्न केले. मात्र, वाघ त्याठिकाणी ठाण मांडून बसला होता. त्यानंतर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यानंतर वनविभागासह पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून वाघाला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, वाघामुळे परिसरात दहशत पसरली आहे. झरी तालुक्यातील ही एकच घटना नसून आतापर्यंत कितीतरी नागरिकांना वाघाच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला. मात्र, यावेळी ऐन तरुण मुलाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाच्या हलगर्जी धोरणाबाबत नाराजी व्यक्त केली. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात वाघाचे हल्ले वाढल्यामुळे नागरिकात भितीचे वातावरण आहे . त्यामुळे या प्रशासनाने वाघांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Esakal