केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने जारी केलेल्या नियमानुसार ड्रोन (Drone) विक्री आणि उडवण्याबाबत नियम (Rules) आणि कायदे निश्चित केले आहे. त्यानुसार वेगवेगळ्या श्रेणीनुसार ड्रोनबाबत स्वतंत्र नियमावली आहे. ड्रोनमुळे एखाद्या व्यक्तीचे किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्यास ड्रोन ऑपरेटर जबाबदार असतो. अनमॅन्ड एअरक्राफ्ट सिस्टीमनुसार (यूएएस) वेगवेगळ्या श्रेणींमध्ये ड्रोन उडवण्यास परवानगी मिळते. (Inside the Drone and Independent Rules)

ड्रोनचे प्रकार

नॅनो ड्रोन्स –

२५० ग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या ड्रोनसाठी कुठल्याही परवान्याची आवश्यकता नाही.

मायक्रो किंवा लहान ड्रोन –

व्यावसायिक किंवा करमणुकीच्या उद्देशाने २५० ग्रॅम ते २५ किलोग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या ड्रोन उड्डाणासाठी यूएएस ऑपरेटर परमिट- १ आय (यूएओपी-I) हा परवाना आवश्यक आहे. त्यानुसार मर्यादित उंची आणि क्षेत्रामध्ये ड्रोन उडवण्यास परवानगी दिली जाते; मात्र ड्रोनद्वारे कोणतीही धोकादायक वस्तू वाहून नेण्यास मनाई आहे.

मध्यम आणि मोठे ड्रोन –

वजनदार वस्तू किंवा ड्रोनद्वारे डिलिव्हरी करण्यासाठी २५ किलोपेक्षा अधिक वजनाच्या ड्रोनला यूएएस ऑपरेटर परमिट- २ (यूएओपी-II) हा परवाना आवश्यक आहे. यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) व हवाई वाहतूक व हवाई संरक्षण नियंत्रणाकडून पूर्वपरवानगी मिळवणे आवश्यक आहे. या प्रकारच्या ड्रोनद्वारे धोकादायक वस्तू वाहून नेणे, मर्यादित उंची आणि क्षेत्राबाहेर वस्तू वाहून नेणे (बीव्हीएलओएस ऑपरेशन्स) आणि ड्रोनद्वारे डिलिव्हरी करण्यासाठी डीजीसीएच्या मान्यतेने परवानगी दिली जाते.

मुंबईत ड्रोन उड्डाणास परवानगी आवश्यक

मुंबईसारख्या शहरांत पोलिस परवानगीशिवाय ड्रोन उडवता येत नाही. त्यासाठी रीतसर पोलिसांना अर्ज करावा लागतो. उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडून ड्रोन उड्डाणास परवानगी दिली जाते. अभियान याच्या अंतर्गत ही परवानगी दिली जाते. त्यासाठी संबंधित व्यक्तीची संपूर्ण माहिती, कोणत्या कारणासाठी ड्रोन उडवणार आहे, किती कालावधीसाठी उडवण्यात येणार आहे आदी सर्व माहिती पोलिसांना द्यावी लागते. त्यानुसार पोलिस परवानगी द्यायची की नाही ते ठरवतात.

ड्रोन परवान्यासाठी पात्रता

 • किमान पात्रता : ज्या व्यक्तीला ड्रोन उड्डाणासाठी परवाना हवा आहे, ती व्यक्ती दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. डीजीसीएच्या नियमानुसार वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 • वयोमर्यादा : विद्यार्थी आणि रिमोट पायलट परवान्यांसाठी अर्ज करण्याचे किमान वय १८ वर्षे आहे. व्यावसायिक वापरासाठी रिमोट पायलट परवान्याचा वापर करता येतो. त्यासाठी कमाल वयोमर्यादा ६५ वर्षे आहे.

देशातील नो-फ्लाय झोन

 • मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बेंगळूरु आणि हैदराबाद येथील आंतरराष्ट्रीय विमानतळांचा पाच किमी परिसर

 • कोणत्याही नागरी, खासगी किंवा संरक्षण विमानतळांचा तीन किमी परिसर

 • आंतरराष्ट्रीय सीमेपासूनचा २५ किमी परिसर; त्यात नियंत्रण रेषा (एलओसी), वास्तविक नियंत्रण रेखा (एलएसी) आणि वास्तविक ग्राऊंड पोझिशन लाईनचा (एजीपीएल) समावेश आहे.

 • लष्करी आस्थापनेचा तीन किमी परिसर

 • वेळोवेळी निर्बंध घालण्यात आलेला परिसर

विनापरवाना ड्रोन उडवल्यास कारवाई

 • नॅनो श्रेणीतील ड्रोन वगळता वैध परवाना किंवा परवानगीशिवाय ड्रोन उडवणाऱ्यास २५ हजार रुपयांचा दंड

 • नो फ्लाईंग झोनमध्ये ड्रोन उडवल्यास ५० हजारांचा दंड

 • थर्ड पार्टी विम्याशिवाय ड्रोन उडवल्यास १० हजार रुपये दंड

 • पोलिस परवानगीशिवाय ड्रोन उडवल्यास गुन्हाही दाखल होऊ शकतो

ड्रोनबाबतचे विविध परवाने

 • विद्यार्थी रिमोट पायलट परवाना : हा परवाना अधिकृत प्रशिक्षण संस्थेद्वारे सशुल्क दिला जातो. हा परवाना कमाल पाच वर्षांसाठी वैध राहतो आणि दोन वर्षांच्या अतिरिक्त कालावधीसाठी नूतनीकरण करता येते.

 • रिमोट पायलट परवाना : अधिकृत प्रशिक्षण संस्थेकडून कौशल्य चाचणी अहवाल सादर केल्यानंतर डीजीसीएद्वारे सशुल्क दिला जातो. हा परवाना १० वर्षांसाठी वैध असतो आणि १० वर्षांसाठी नूतनीकरण करता येतो.

भारतातील ड्रोनबाबतची नियमावली

 • कोणताही मायक्रो ड्रोन जमिनीपासून (एजीएल-अबाव्ह ग्राऊंड लेव्हल) ६० मीटर उंचीपेक्षा अधिक आणि कमाल २५ मीटर प्रतिसेकंद वेगापेक्षा अधिक वेगाने उड्डाण करू शकत नाही.

 • कोणताही लहान ड्रोन १२० मीटर उंचीपेक्षा अधिक आणि कमाल २५ मीटर प्रतिसेकंद वेगापेक्षा अधिक वेगाने उड्डाण करण्यास मनाई.

 • डीजीसीएने जारी केलेल्या परवान्यामध्ये नमूद केलेल्या अटीनुसार मध्यम किंवा मोठे ड्रोन उड्डाण करू शकतात.

 • प्रतिबंधित भागात ड्रोन उड्डाणासाठी डीजीसीएकडून पूर्वपरवानगी आवश्यक

पोलिसांकडून कारवाई

ड्रोनबाबत अस्तित्वात असलेल्या नियमावलीनुसार, ड्रोन उड्डाणाासाठी प्रत्येक वेळी पोलिसांची परवानगी काढावी लागते. विनापरवाना ड्रोन उडवल्याचे लक्षात आल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाते. लॉकडाऊन काळात अशाप्रकारे तीन जणांवर कारवाई करण्यात आली, तर २०१५ सालापासून मुंबई पोलिसांनी ३३ जणांवर विनापरवाना ड्रोन उडवल्याबद्दल कारवाई करण्यात आली. दरम्यानच्या काळात मुंबई पोलिसांनी ६७ जणांना ड्रोन उड्डाणासाठी परवानगी दिली. त्यात बहुतांश चित्रपटाचे चित्रिकरण, प्रसारमाध्यमे, व्यावसायिक छायाचित्रकारांचा समावेश होता. अशाच प्रकारे ठाण्यात २१, तर नवी मुंबईत ४१ जणांना ड्रोन उड्डाणासाठी परवानगी दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आली.

ड्रोन उड्डाणाबाबत मुंबई पोलिसांकडून वेळोवेळी लेखी आदेश जारी केले जातात. त्यानुसार मुंबईत ड्रोन उडवण्यावर बंदी आहे. याशिवाय नागरी उड्डयन विभागाच्या परवानगीशिवाय ड्रोनची विक्री करणे बेकायदा आहे.

– एस. चैतन्य, पोलिस उपायुक्त तथा प्रवक्ते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here