रूग्णालये पूर्वपदावर, नियमित शस्त्रक्रियांना सुरूवात
मुंबई: कोरोनाची रुग्णसंख्या घटल्याने सुमारे 85 टक्के कोविड बेड रिक्त आहेत. त्यामुळे बर्याच रुग्णालयांनी गेल्या काही आठवड्यांत नियमित ओपीडी, नॉन कोविड रुग्ण उपचार आणि शस्त्रक्रिया अशा नियमित प्रक्रिया पुन्हा सुरू केल्या आहेत. सध्या कोविड पेक्षा नॉन कोविड रुग्ण जास्त प्रमाणात उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे नॉन कोविड बेडची मागणी जास्त आहेत. सध्या मुंबईतील 23,270 कोविड बेडपैकी 19,411 रिकामे आहेत. त्यापैकी 18,300 हून अधिक जंबो, खाजगी आणि शासकीय आणि पालिका रुग्णालयातील होते. (Good News for Mumbaikars as Number of Non Covid Patients increased)
Also Read: मुंबईत गर्भवती महिलांचे लसीकरण ‘या’ दिवसापासून होणार सुरू
सध्या सुमारे 85 टक्के आयसोलेशन बेड्स आणि 55 टक्के आयसीयू बेड्स रिक्त आहेत. तसेच सुमारे 47 टक्के व्हेंटिलेटर बेड रिक्त आहेत. परळच्या केईएम रुग्णालयात दाखल होणाऱ्या गंभीर रूग्णांचे होणारे मृत्यू देखील कमी झालेले आहेत. अनेक कोविड रुग्ण दाखल होणाऱ्या या रुग्णालयात सध्या 2 ते 3 दिवसांनी कोविड रुग्ण दाखल होण्यासाठी येऊ लागले आहेत. त्यावरून कोविड रुग्ण संख्या कमी होत असल्याचे समोर येत आहे.

नॉन कोविड रुग्णालय असतानाची नियमित कामे पुन्हा सुरू झाली आहेत. सध्या केईएम रुग्णालयात 500 नॉन कोविड रूग्ण उपचार घेत आहेत. वॉर्ड नंबर 6 हा केईएमचा एकमेव कोविड वार्ड असून सोबत 35 बेड कोविड रुग्णांसाठी ठेवण्यात आले आहेत. यावर शनिवारी केवळ 16 रुग्ण उपचार घेत होते. कोविड रुग्णसंख्या वाढल्यास रुग्णालयातील कोविड बेड आणि वॉर्ड वाढविण्यात येतील असे केईएम चे मुख्य वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी प्रवीण बांगर यांनी सांगितले.
Also Read: दिव्यांगांना लोकल प्रवासाची परवानगी असूनही नाकारलं जातंय तिकीट
एप्रिलमध्ये, शहरात दररोज सरासरी 9,000 रुग्णांची नोंद होत असताना, राज्य कोविड टास्क फोर्सने रुग्णालयांना कोविड रूग्णांसाठी लागणारा ऑक्सिजन आणि कोविड रुग्णांना लागणारी बेड संख्या पाहुन पालिकेने नियमित शस्त्रक्रिया थांबविण्याचा सल्ला दिला होता. पण दीड महिन्यांपूर्वी परिस्थिती सुधारू लागली असल्याचे सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ मोहन जोशी म्हणाले. सायन रुग्णालयात सध्या रुग्णसंख्या दहा पर्यंत कमी झाली आहे.त्यामुळे आम्ही कोविड बेड्स कमी केल्या आहेत. परिणामी नॉन कोविड रूग्णांच्या उपचारासाठी दाखल करुन घेण्याच्या अडचणी कमी झाल्या आहेत.
केईएम आणि सायन रुग्णालयात आता नियमीत 300-350 छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया सुरू झाल्या आहेत. तर पालिकेच्या नायर रुग्णालयात 150 ते 200 छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया सुरू असल्याची माहिती पालिकेच्या मुख्य रुग्णालयाचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी दिली.
Esakal