जळगाव: जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या (Political Leader) दौऱ्यांच्या मालिकेत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Urban Development Minister Eknath Shinde) यांच्या दौऱ्याची भर पडली. मात्र, श्री. राऊत यांच्यासमोर शिवसेनेतील ज्या गटबाजीचे दर्शन घडले, त्याच गटबाजीने शिंदेंचेही स्वागत झाले. एकीकडे पक्षातील गटबाजी आणि दुसरीकडे पालिकांसह जळगाव महापालिकेच्या (Jalgaon Municipal Corporation) अनेक प्रश्‍नांची शिंदेंपुढे उजळणी झाली. पण या अनेक प्रश्‍नांवर ‘मुंबईत (Mumbai) या, मार्ग काढू’ या बोळवणीपलीकडे शिंदेंच्या दौऱ्यातून काही पदरी पडले नाही. (shiv sena ministers visit saw factionalism in shiv sena)

Also Read: भडगाव येथील जवान लेह-लडाखमध्ये ‘हुतात्मा’

राज्यातील शहरीकरणाचा वेग राजधानी एक्स्प्रेससारखा मानला, तर ‘नगरविकास’मधील कमाईचा वेग म्हणजे ‘बुलेट ट्रेन’. त्यामुळे या खात्याचा मोह आवरणे केवळ अशक्य. गेल्या दोन- तीन दशकांत जे- जे मुख्यमंत्री राज्यात होऊन गेले, त्या प्रत्येकानेच हे खातं आपल्याकडे ठेवले. यातून ‘नगरविकास’ची महती लक्षात यावी आणि म्हणूनच महाविकास आघाडीचे सरकार साकार होत असताना मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेल्या एकनाथ शिंदेंना या खात्याची मनसबदारी बहाल करण्यात आली, इतकं हे ‘खास’ आहे.

Urban Development Minister Eknath Shinde

स्वाभाविकत: प्रत्येक पालिका, महापालिकेसाठी हा विभाग म्हणजे निधी उपलब्ध करून देणारा ‘कुबेर’च. त्यामुळे या खात्याचे मंत्री येणार म्हटल्यावर जिल्ह्यातील पालिकांसह जळगाव महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांचे डोळे या दौऱ्याकडे लागणे अपेक्षितच होते. आपल्या शहराच्या विकासासाठी नगरविकासमंत्र्यांचे दौरे घडवून आणणेही त्यामुळेच गैर नाही. पाचोऱ्यात पालिकेच्या कार्यक्रमानिमित्त शिंदेंनी हजेरी लावली. त्यामुळे या- ना- त्या स्वरूपात पाचोऱ्याच्या पदरी काहीतरी पडणारच होते.

Also Read: जिल्हा रुग्णालयात महिला, युवकावर ‘बायोप्सी’ ची शस्त्रक्रिया!

अपेक्षा..मात्र साध्य काहीच झाले नाही
मुख्य प्रश्‍न होता तो, जळगाव महापालिकेशी संबंधित अनेक प्रश्‍नांचा. मनपाच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलांतील गाळेधारकांचा प्रश्‍न, अमृत योजनेच्या रखडलेल्या कामाचा त्रास, रस्ते आणि गटारांची दुरवस्था, वॉटरग्रेसमधील कथित गैरव्यवहार व त्यामुळे स्वच्छतेची समस्या, त्यापेक्षाही कठीण बनलेली मनपाची आर्थिक स्थिती, अशा समस्यांची उजळणी शिंदेंपुढे होणे गरजेचे होते. ती या दौऱ्यानिमित्त कदाचित झाली असेलही, पण त्यातून फार मोठे निष्पन्न निघाले, काहीतरी साध्य झाले, असे मात्र नाही.

रुसवे फुगवे..पून्हा दिसून आले
खरेतर गेल्या मार्च महिन्यात जळगाव महापालिकेत घडलेल्या सत्तांतराचे सूत्रधार एकनाथ शिंदेच होते. त्यांनी मनावर घेतले म्हणून बहुमत असलेल्या भाजपतील नगरसेवक फुटून शिवसेनेचा महापौर झाला. त्यामुळे त्यांच्या योगदानाने सेनेची सत्ता आली असेल, तर जळगाव महापालिकेच्या प्रश्‍नांची व ते सोडविण्यासाठी लागणाऱ्या व्यवस्थेची जबाबदारी स्वाभाविकतः शिंदेंवर येते. मात्र, शनिवारच्या दौऱ्यात असे काही घडल्याचे दिसलेच नाही. उलटपक्षी, शिंदेंचे स्वागत शिवसेनेतील गटबाजीनेच अधिक झाले. संपूर्ण दौऱ्यात एकत्र असून पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चिमणराव पाटील यांच्यातील ‘रुसवा’ कॅमेऱ्यांपासून लपून राहिला नाही, तर नगरविकासमंत्री महापालिकेत कसे येणार नाहीत, अशी तजवीज एका गटाने केल्याचे दिसून आले. स्वाभाविकत: अशा राजकीय कुरघोड्यांचा निपटारा करण्याच्या नादात शिंदेही जळगाव जिल्ह्यातील ‘नगर’विकासाच्या प्रश्‍नांपासून दूरच राहिल्याचे चित्र दिसून आले. मंत्री अन्‌ तेही नगरविकास खात्याचे दारी येऊन त्या घरातील एकही प्रश्‍न सुटू नये, हा दुर्दैवी अनुभव जळगावकरांच्या नशिबी आला.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here