पृथ्वीचे हृदय म्हणजे समुद्र. शरीरात ज्याप्रमाणे हृदयाचे कार्य अविरत आणि नकळत सुरू असते. त्यावर आपलं जीवंत राहणं अवलंबून असते, त्याचप्रमाणे पृथ्वीचे आरोग्य समुद्रावर अवलंबून आहे. वातावरणाच्या संतुलनासाठी, जगातील लाखो लोकांसाठी पाण्याचा प्रमुख स्रोत असलेला समुद्र पृथ्वीसाठी प्राणवायूच्या निर्मितीची महत्त्वाची भूमिका बजावतो. प्लास्टिकचे प्रदूषण, कचरा, दूषित व गढूळ आणि केमिकल युक्त पाणी प्रदूषणाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढवत आहेत. विशेषत: समुद्राच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर मिसळल्या जाणाऱ्या या प्लास्टिकमुळे सागरी जीव, समुद्री प्राण्यांचे जीवनच धोक्यात आले आहे. (health-of-the-earth-depends-on-the-sea-information-sangli-news-marathi)
समुद्राचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक बनले. सन २००८ मध्ये त्यासाठी आठ जूनला महासागर दिन साजरा करण्यास सुरवात झाली. हा दिवस सुरुवातीला कॅनडामध्येच साजरा केला जाई. कॅनडाने ब्राझीलमधील रिओ दी जानेरिओ येथे झालेल्या पहिल्या पृथ्वीविषयक वसुंधरा शिखर परिषदेत प्रस्ताव मांडला.

महासागर दिन साजरा करण्याबाबत विचारमंथन झाले. ५ डिसेंबर २००८ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसामान्य सभेत आठ जून जागतिक महासागर (समुद्र) दिन म्हणून साजरा करण्याचा ठराव झाला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सागरीव्यवहार व समुद्री कायदेविषयक विभागातर्फे जगभरात कार्यक्रम आयोजित केले जातात. युनेस्कोच्या आंतरसरकारी समुद्र विज्ञान आयोगातर्फे ‘द ओशन प्रोजेक्ट’ या अमेरिकन संस्थेच्या जागतिक समुद्र नेटवर्कला प्रायोजकत्व देण्यात आले. त्यांच्या सहकार्याने हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर दरवर्षी साजरा होऊ लागला.
महासागर अर्थात समुद्र आपल्या पोटात आजूबाजूच्या अनेक छोट्या छोट्या जीवांना सामावून घेतो .त्यांचे पोषण करतो. किनाऱ्यावरील विविधप्रकारच्या वनस्पतींचे पोषण संरक्षण करतो. विशेषतः मानवजातीला जल, वायू, तेल, खनिज संपत्ती औषधांसारख्या अनेक मार्गांनी उपयोगी पडतो. रोजगार देतो. अशा समुद्राला स्वच्छ ठेवण्याचा त्याला संरक्षण देण्याचा संकल्प करूया. लोकांत जागरूकता पसरवूया. समुद्र शान, मान व अभिमान आहे. अनेकांना रोजगार देणारा, सागरी अन्न पुरवणारा व जल जीवांनी समृध्द अथांग महासागर आणि व त्याचा किनारा स्वच्छ ठेवणे ही नैतिक जवाबदारी आहे.
महासागराविषयी
दैनंदिन जीवनात समुद्राची महत्त्वाची भूमिका आहे.
मोठ्या प्रमाणावर प्राणवायू देण्याचे काम समुद्र करतो.
समुद्र बचावाची जगभरात एक चळवळ उभारली जावी.
शाश्वत विकास साधण्यासाठी जगातील लोकांना उद्युक्त करणे.
औषधी, अन्न, पाणी व प्राणवायूसाठी समुद्र मोठा स्रोत.
समुद्री संपत्तीचे जतन व संवर्धन करणे हा हेतू.

काही तथ्य आणि आकडेवारी …
पृथ्वीवरील ९७ टक्के जलसाठा समुद्रात आहे.
समुद्रावर तब्बल ३ अब्ज लोक अवलंबून आहेत
समुद्र व सागरी संसाधने, अवलंबून बाजारपेठांचे मूल्य प्रतिवर्षी तीन ट्रिलियन डॉलर(जागतिक सकल उत्पन्नाच्या ५ टक्के०.
३० टक्के कार्बन डायऑक्साईड समुद्र शोषून घेतो. प्रदूषणाचा परिणाम कमी करण्यास अप्रत्यक्षपणे मदत होते.
सागरी मासेमारीवर जगभरात तब्बल २०० दशलक्ष लोक
अवलंबून आहेत.
(सर्व माहिती संकलित)
समुद्रच बेपत्ता….
पर्यावरणाच्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या हानी व प्रदूषणामुळे पृथ्वीवरील एक अख्खा समुद्रच बेपत्ता झाला आहे. मध्य आशियातील कझाकिस्तान व उझबेकिस्तान दरम्यान असलेला अरल समुद्र वाळवंटातच रुपांतरित झाला आहे. ही धक्कादायक बाब एका वृत्तवाहिनीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उघड केली होती.

महासागर अर्थात समुद्र आपल्या पोटात आजूबाजूच्या अनेक छोट्या छोट्या जीवांना सामावून घेतो. त्यांचे पोषण करतो. किनाऱ्यावरील विविधप्रकारच्या वनस्पतींचे पोषण संरक्षण करतो. विशेषतः मानवजातीला जल, वायू, तेल, खनिज संपत्ती औषधांसारख्या अनेक मार्गांनी उपयोगी पडतो. रोजगार देतो.
-बाळासाहेब पाटोळे, समुद्री विद्युत अभियंता, टोकियो, जपान
Esakal