नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा पुन्हा पेटला…

पनवेल: नवी मुंबई येथे असलेल्या प्रस्तावित विमानतळाच्या नामकरणावरून सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेचे नेतेमंडळी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर ठाम आहेत तर रायगडमधील भूमिपुत्र आणि नेतेमंडळी दि बा पाटील यांचेच नाव द्यावे या मागणीसाठी आक्रमक व आग्रही आहेत. १० जूनला झालेली मानवी साखळी आणि २४ जूनला सिडको कार्यालयाला घेराव या दोनही आंदोलनात रायगड, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, अलिबाग, पेण, डोंबिवली, कल्याण अशा विविध ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर भूमिपुत्र सहभागी झाले होते. त्यावेळी १५ तारखेपर्यंत सरकारने निर्णय घ्यावा, असा अल्टिमेटम ठाकरे सरकारला देण्यात आला. तरीही ठाकरे सरकारकडून दिबांच्या नावाबाबत सकारात्मक चर्चा होताना दिसलेली नाही. याच मुद्द्यावर पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी अत्यंत आक्रमक अशी मतं मांडली. (Navi Mumbai Airport Issue Di Ba Patil Balasaheb Thackeray Panvel deputy Mayor warning CM Uddhav Thackeray to burn Airport)

Also Read: ममताची हत्या की, आत्महत्या? वसईत समुद्र किनाऱ्यावर मृतदेह सापडल्याने खळबळ

“महाराष्ट्रात आतापर्यंत १७ मुख्यमंत्री होऊन गेले. त्यापैकी एकाही मुख्यमंत्र्याने आपल्या आई-वडिलांचे किंवा इतर नातेवाईकांचे नाव एखाद्या मोठ्या प्रकल्पाला देण्याचा हट्ट धरला नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील मुख्यमंत्री होते, केंद्रात कृषिमंत्री होते… पण ते स्वत: शेतकऱ्यांची भावना जाणतात. त्यामुळेच त्यांनीही त्यांच्या कारकिर्दीत कधीच सरकारच्या मोठ्या प्रकल्पांना आपल्या नातेवाईकांची नावे देण्याचा हट्ट धरला नाही. पण, उद्धव ठाकरे मात्र अशा पद्धतीने वागत आहेत. त्यांना ही आडमुठी भूमिका खूपच त्रासदायक ठरू शकते. आंदोलनाची मशाल आता भूमिपुत्रांनी पेटवली आहे. जर दिबांचे नाव दिले गेले नाही, तर त्याच मशालीने आम्ही ते विमानतळ पेटवून टाकू”, असा थेट इशारा आवाज टुडेशी बोलताना जगदीश गायकवाड यांनी ठाकरे सरकारला दिला.

Deputy Mayor Jagdish Gaikwad, PMC

Also Read: लोकल तातडीने सुरु करा, प्रवीण दरेकरांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र

“दि बा पाटील हयात असताना त्यांनी भूमिपुत्रांसाठी आंदोलन उभं केलं. त्यावेळी त्यांच्याकडे स्वत:चंसुद्धा पक्क मोठं घर नव्हतं. आपलं घर पक्क नसतानाही दुसऱ्यांच्या हक्कांसाठी लढणारा नेता कोणीही पाहिलेला नसेल पण तो आम्ही पाहिलाय. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी नक्कीच आदर आहे. त्यांच्या कुटुंबात कोणाच्याही नावाने घर नाही असं कोणी आहे का ते ठाकरे कुटुंबाने सांगावं. आम्ही त्या माणसाचं नाव विमानतळाला द्यायला तयार आहोत. भूमिपुत्रांचा विरोध स्वीकारून नाव द्यायला लावू. पण जर तुमच्याकडे सगळं काही आहे तर मग मुद्दाम अशाप्रकारचा नाव देण्याचा अट्टहास कशासाठी? उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवावं की आगरी आणि कोळी समाजाचे लोक जितके भोळे असतात तितकेच रागीटही असू शकतात. दिबा पाटील यांची ताकद उद्धवजींना माहिती नसावी. देशातील बडे नेते बाळासाहेबांना भेटण्यासाठी मातोश्रीवर यायचे. पंतप्रधान मोदीजीही मातोश्रीवर आले होते. पण दिबांना भेटण्यासाठी खुद्द बाळासाहेबांना जासई गावात यावं लागलं होतं, ही त्यांची ताकद होती. त्यामुळे ठाकरे सरकारने हट्ट सोडावा, नाहीतर त्यांना सत्तेत असताना खूप काही त्रास सोसावा लागेल”, असंही रोखठोकपणे जगदीश गायकवाड यांनी सांगितलं.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here