२६ वर्षीय तरूणीने लोकल ट्रेनमध्ये बघितली जाहिरात अन्…
पनवेल: काळी जादू व तंत्रमंत्र करुन प्रियकराला वश करुन देण्याच्या बहाण्याने एका बाबा बंगालीने तरूणीला लुटल्याची घटना घडली. नवी मुंबईतील खारघरमध्ये राहणाऱ्या 26 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणीकडून बाबा बंगालीने तब्बल 4 लाख 57 हजार रुपये उकळले. वसिम रईस खान उर्फ बाबा कबीर खान बंगाली (33) असे या तरूणाने नाव असून त्याला गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने मिरा रोड येथून अटक केली. आरोपी बाबा बंगाली याने अशाच पद्धतीने अनेक लोकांची फसवणूक केली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तसेच, त्याची कसून चौकशीदेखील केली जात आहे. (Software Engineer Girl Love Relationship Failure Baba Bangali fraud 4.5 Lakh looted)

२६ वर्षीय तरूणी खारघरमध्ये राहते. ती सॉफ्टवेअर इंजिनियर असून तिचा प्रेमभंग झाल्याने ती तरुणी मागील काही महिन्यांपासून प्रंचड मानसिक तणावाखाली आली होती. या दरम्यान तरुणीने लोकलमधून प्रवास करताना, बाबा कबीर खान बंगाली याची प्रेम संबधातील, घरगुती तसेच नोकरी व्यवसायातील अडचणी सोडविण्यावर उपाय करुन देण्याबाबतची जाहिरात वाचली. त्यामुळे तरुणीने सदर जाहिरातीत दिलेल्या मोबाईल नंबरवर बाबा कबीर खान याला संपर्क साधला होता. त्यावेळी बाबा कबीर खान याने मेरठ येथील दर्ग्यामध्ये काही पुजा विधी केल्यास तिच्या प्रियकरावर काळी जादु तसेच मंत्र विधी केल्यास तिचा प्रियकर दुसऱया मुलीकडे न जाता तिच्याकडे ओढला जाईल असे सांगितले होते.
Also Read: “तर त्याच मशालीने विमानतळ जाळून टाकू”; उद्धव ठाकरेंना इशारा
तसेच या बाबा बंगालीने प्रियकराचे लग्न ठरले तर ते लग्न मोडण्यासाठी पुजा करावी लागेल, देवासाठी घुबड, बकरी अशा प्राण्यांचा बळी द्यावा लागेल. प्रियकराचे व तरुणीचे कुटुंब एकत्र येण्यासाठी वेगळी पुजा करावी लागेल, अशी वेगवेगळी कारणे सांगुन तरुणीकडून एकुण 4 लाख 57 हजार रुपये उकळले होते. त्यानंतर फसवणूक झाल्याचे तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तीने खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

त्यानुसार बाबा बंगाली विरोधात फसवणुकिसह महाराष्ट्र नरबळी, व इतर अमानुष व अनिष्ट,अघोरी कृत्य प्रतिबंध व निर्मुलन व काळी जादु या कलमाखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट-2 चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गिरिधर गोरे व त्यांच्या पथकाकडून या गुह्याचा समांतर तपास सुरु होता. या तपासादरम्यान गुन्हे शाखेने बंगाली बाबाच्या वेगवेगळ्या गुगुल पे क्रमांक, बँक खात्याची व केवायसी कागपत्रांची माहीती घेऊन त्यावरुन बाबाचा मोबाईल क्रमांक मिळविला. त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक वैभव रोंगे व त्यांच्या पथकाने सी.डी.आर. विश्लेषण करुन बाबा बंगाली याला मिरा रोड येथील गोविंदनगरमधील समर्थ अपार्टमेंटमधुन ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, त्याने गुह्याची कबुली दिली. यावेळी गुन्हे शाखेने केलेल्या तपासात आरोपी बाबाच्या मोबाईलवर गुगल पे अकाउंटवर पिडीत मुलीने पाठविलेल्या रक्कमेची एंट्री आढळून आली.
Also Read: “लोकलने प्रवास करू द्या किंवा मुंबईकरांना ५ हजार भत्ता द्या”
पिडीत तरुणीने या गंभीर गुह्यातील आरोपी बंगाली बाबाला प्रत्यक्षात पाहिलेले नसताना, तसेच तो कसा दिसतो याबाबत तीला काहीच माहिती नव्हती. तसेच आरोपी बंगाली बाबा हा वारंवार मोबाईल व राहाण्याचे ठिकाण बदलत असतांना देखील गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने बाबा बंगालीचा मोबाईल क्रमांक, बँक अकाउंट तसेच बातमिदारांकडुन माहीती मिळवून सदरचा गंभीर गुन्हा उघडकीस आणला आहे. सदर बाबा बंगाली याने अशाच पद्धतीने अनेक लोकांना फसवले असण्याची शक्यता असल्याने या बाबा बंगाली कडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या बाबा बंगालीकडून कुणाची फसवणुक झाली असल्यास त्यांनी गुन्हे शाखा अथवा खारघर पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन नवी मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.
(संपादन- विराज भागवत)
Esakal