coronavirus in india, covid-19, latest updates : देशातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा कमी होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या महितीनुसार, सोमवारी 118 दिवसांतील सर्वात कमी कोरोना रुग्णवाढ झाली आहे. सोमवारी देशात 31 हजार 443 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. देशातील उपचाराधीन रुग्णाची संख्या चार लाख 31 हजार 315 इतकी झाली आहे. 109 दिवसानंतरची ही सर्वात कमी उपचाराधीन रुग्णसंख्या आहे. भारताचा रिकव्हरी रेट 97.28 टक्के इतका झाला आहे.
देशाचा आठवड्याचा आणि दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्केंपेक्षा कमी आहे. भारताचा आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट 2.32 टक्के इतका आहे. तर दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट 2.59 टक्के इतका आहे. मागील 21 दिवसांपासून भारताचा दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट तीन टक्केंपेक्षा कमी आहे.
India reports 31,443 new #COVID19 cases in the last 24 hours; the lowest in 118 days. Recovery rate increases to 97.28%. India's active caseload currently at 4,31,315; lowest in 109 days. pic.twitter.com/TXqEgq1eNs
— ANI (@ANI) July 13, 2021
कोरोनावर मात करण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहीम सुरु करण्यात आली आहे. 18 वर्षांपुढील नागरिकांसाठी मोदी सरकारने मोफत लसीकरण मोहिम राबवली आहे. कोरोना विषाणूला हरवायचं असेल तर लसीकरण हाच प्रभावी पर्याय असल्याचं तज्ज्ञाचं मत आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत 38 कोटी 14 लाख 67 हजार 646 कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. मागील 24 तासांत देशात 40 लाख 65 हजार 862 डोस देण्यात आले आहेत. 18 ते 44 वयोगटातील जवळपास 12 कोटी लोंकाचं लसीकरण झालं आहे.

आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, 12 जुलै 2021 पर्यंत देशात 43 कोटी 40 लाख 58 हजार 138 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. रविवारी देशात 17 लाख 40 हजार 325 चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

21 जूनपासून 13 जुलै 2021, मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 39.46 कोटींपेक्षा जास्त लशीचे डोस केंद्राकडून राज्यांना दिले आहेत. एक कोटी 91 लाख डोस राज्य आणि खासगी रुग्णालयाकडे शिल्लक आहेत. आतापर्यंत वेस्ट झालेले आणि वापरलेल्या लशीच्या डोसची संख्या 37 कोटी 55 लाख 38 हजार इतकी आहे. 12 लाख डोस लवकरच राज्यांना दिले जाणार आहेत.

मागील चोवीस तासांत राज्यात ७,६०३ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर १५,२७७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. नव्या रुग्णांपेक्षा दुप्पट रुग्ण बरे झाल्यानं राज्यासाठी सोमवार दिलासादायक ठरला. तसेच दिवसभरात ५३ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे राज्यात एकूण ६१,६५,४०२ रुग्ण आढळून आले तर आजवर ५९,२७,७५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच राज्यात आजवर १,२६,०२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्यात सध्या १,०८,३४३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.15 % झाले आहे.

देशातील 8 राज्यांमध्ये कडक लॉकडाउन लावण्यात आला आहे. यामध्ये पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिसा, तामिळनाडू, मिजोरम, गोवा आणि पुडुचेरी या राज्यांचा समावेश आहे. या राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
देशातील 23 राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आंशिक लॉकडाउन लावण्यात आलेला आहे. येथे निर्बंधासोबत सूट देण्यात आली आहे. काही ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्यामुळे निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत. छत्तीसगढ, कर्नाटक, केरळ, बिहार, दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, हरियाणा, पंजाब, जम्मू-कश्मीर, लडाख, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, सिक्किम, मेघालय, नगालँड, आसम, मणिपूर, त्रिपुरा, आंध्रप्रदेश आणि गुजरात या राज्यात आंशिक लॉकडाउन लावण्यात आलेला आहे.
Esakal