नागपूर : शहराच्या इतिहासात महत्वाचे योगदान देणाऱ्या ‘हिरोज ऑफ नागपूर’ची माहिती आता नागपूरकरांना ‘स्मृतीं’च्या माध्यमातून होणार आहे. सामाजिक, राजकीय, साहित्य, वैद्यकीय क्षेत्रातील आठ व्यक्तींच्या स्मृती बोले पेट्रोल पंप ते जीपीओ चौक मार्गावर स्थापित करण्यात आले. यातून शहराच्या जडणघडणीत तसेच शहराला मान मिळवून देणाऱ्या व्यक्तिंचे चरीत्र ओळखणे तसेच समजून घेणे सहज शक्य झाले आहे. दीपक भगत यांनी या स्मृतींची निर्मिती केली तर ‘हिरोज ऑफ नागपूर’ची संकल्पना नगरसेवक ॲड. निशांत गांधी यांची आहे. (memorial of nagpur heroes from 8 different field)

ए. बी. बर्धन यांचा ब्रिटीशकालीन भारतातील बंगाल परगण्याच्या बरिसाल येथे जन्म झाला. वयाच्या १५ व्या वर्षी नागपुरात आल्यानंतर विद्यार्थी दशेत असतानाच ते साम्यवादी विचारांनी प्रभावित झाले होते. त्यानंतर त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य कामगारांच्या लढ्याला समर्पित केले.

‘मानवता हाच खरा धर्म’ असा संदेश देणारे विद्वान, लेखक, सामाजिक कार्यकर्ते, प्रवचनकार पद्मभूषण मौलाना अब्दुल करीम पारेख यांचा जन्म विदर्भातील अकोला जिल्ह्यातील कानसेवनी गावात १५ एप्रिल १९२८ ला झाला. गुजरातूनमधून स्थलांतरीत झालेले पारेख कुटुंब नोकरीच्या शोधात नागपुरात आले. वयाच्या १९ व्या वर्षी मौलाना पारेख यांनी ‘होली कुरान’ या सोप्य ऊर्दूत केलेला अनुवाद १९५२ साली ‘इझी डिक्शनरी ऑफ कुरान’ या नावाने प्रकाशित झाला.

विद्यार्थ्यांमध्ये प्रिय शिक्षक, वैद्यकीय क्षेत्रातील आदरणीय व्यक्ती आणि गरीबांचे डॉक्टर म्हणून ख्याती असलेले पद्मश्री डॉ. बालस्वरुप एस. चौबे यांचा जन्म २ जून १९३४ साली वाशिम येथे झाला. नागपुरातून शालेय शिक्षण घेत्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी वैद्यकशास्त्रात पदवी घेतली. डॉ. चौबे हे भारतातील नावाजलेले किडन विकार तज्ज्ञ होते.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात विदर्भातील ज्या नेत्यांनी महत्वाचे योगदान दिले, त्यात माधव अणे उपाख्य लोकनायक बापूजी अणे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ते वेगळ्या विदर्भ राज्याचे पुरस्कर्ते होते. त्यांचा जन्म २९ ऑगस्ट १९८० ला यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे झाला. त्यांनी नागपुरातील मॉरिस कॉलेजमधून पदवी घेतली. १९३३ साली ते काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांना सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘पद्मविभूषण’ तर ‘तिलकयशोर्णव’ या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

विदर्भाचा शेर म्हणून प्रख्यात असलेल्या जांबुवंतराव धोटे यांनी स्वतंत्र्य विदर्भासाठी अनेक वर्ष आंदोलने केली. धोटे हे पाच वेळा विधानसभेवर तर दोन वेळा लोकसभेवर निवडून आले होते. स्वतंत्र विदर्भाची मागणी लावून धरल्याने त्यांना ‘विदर्भवीर’ असेही संबोधले जात होते.

माणिक सीताराम गोडघाटे उर्फ कवी ग्रेस यांचा जन्म १० मे १९३७ रोजी नागपुरात झाला. ग्रेस हे त्यांचे टोपणेनाव होते. मराठी काव्यप्रांतात आपल्या वेगळ्या शैलीचा ठसा उमटविणाऱ्या ग्रेस यांची मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुसऱ्या पिढीतील प्रमुख कवींमध्ये गणना होते. त्यांना इ. स. १९७१ ते १९७६ या काळात भारत सरकारच्या साहित्य अकदमीच्या मराठी सल्लागार समितीचे सदस्य होते. त्यांना २०१२ साली साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील तरोडा येथे ११ मार्च १९२३ साली झाला. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चालतेबोलते विद्यापीठ समजले जात होते. त्यांनी स्वयंसेवक, शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार, शेतकरी, समाजेवन, कुटुंबप्रमुख या सर्व भूमिका अत्यंत आत्मविश्वासाने निभावल्या होत्या.

सुमतीताई सुकळीकर यांचे पूर्ण नाव सुमती बाळकृष्ण सुकळीकर असून विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर या गावात २४ डिसेंबर १९२३ ला त्यांचा जन्म झाला. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांचा बालकृष्ण सुकळीकरांशी विवाह झाला आणि त्या नागपुरातील रामदासपेठेत स्थायिक झाल्या. त्यांना महिलांना एकत्र करण्याचे काम केले. १९४६ मध्ये निवडणुकीत सहभागी होऊन त्यांनी राजकीय जीवनाला प्रारंभ केला. त्या गोवा मुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अग्रणी होत्या.
Esakal