सडावाघापूर (ता. पाटण) येथील उलटा धबधबा पावसाच्या पुनरागमनाने पुन्हा सुरू झाला आहे. पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने उलट्या धबधब्याचे मनमोहक रूप डोळ्यांचे पारणे फेडीत आहे.
तारळे (सातारा) : सडावाघापूर (ता. पाटण) येथील उलटा धबधबा (Sadawaghapur Reverse Waterfall) पावसाच्या (Heavy Rain) पुनरागमनाने पुन्हा सुरू झाला आहे. पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने उलट्या धबधब्याचे मनमोहक रूप डोळ्यांचे पारणे फेडीत आहे. त्यामुळे तरुणाईची पावले पठारावर वळू लागली आहेत.कोरोना महामारी, होणारी हुल्लडबाजी व दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पाटण व उंब्रज पोलिसांची करडी नजर तेथे आहे. पावसाळा सुरू झाला, की पावसाळी पर्यटनाचे वेध लागतात. त्यात सडावाघापूरचा उलटा धबधबा अग्रक्रमावर आहे. जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील पर्यटकांना या स्थळाने भुरळ पाडली आहे. याचे लोण पुण्या-मुंबईच्या पर्यटकांपर्यंत पोचले असून, तेथील लोकांची देखील पठारावर वर्दळ पाहायला मिळते. कोरोनाने सर्व जण घरात बंद झाले आहेत. लॉकडाउनमुळे (Coronavirus Lockdown) लोक कंटाळले आहेत. त्यामुळे निर्बंध असतानाही संधी साधून अनेक जण पर्यटनस्थळांना भेटी देत आहेत. पावसाळी पर्यटनाचे माहेरघर असलेला पाटण तालुका (Patan Taluka) यात आघाडीवर आहे. इतर गर्दीच्या ठिकाणांपेक्षा पठारावरील उलटा धबधबा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. येथील गालिचायुक्त विस्तीर्ण पठार, दाट धुके, थंडगार वारा, सोबत रिमझिम पाऊस, भिरभिरणाऱ्या गगनचुंबी पवनचक्क्यांची पर्यटकांना भुरळ पडली आहे. पावसाने हजेरी लावल्याने येथील नैसर्गिक रुपडे पालटले आहे. सडावाघापूर पठाराने (Sadawaghapur Plateau) हिरवाईची शाल लपेटली आहे, तर दाट धुक्याची दुलई पांघरलेली आहे. डोंगरांनी हिरवा शालू परिधान केला आहे. कड्याकपारीतून छोटेमोठे धबधबे फेसाळत आहेत.धुक्यात हरवलेल्या खोल दऱ्या, पठारावरील कौलारू घरे, पवनचक्क्या, डोंगरावर उतरलेल्या आभाळामुळे स्वर्ग अवतरल्याचा निर्माण होणारा भास, डोळ्यांचे पारणे फेडणारा उलटा धबधबा पाहण्यासाठी गर्दी होत आहे. मात्र, कोरोनामुळे बऱ्यापैकी निर्बंध आहेत. शिवाय पठारावर दुर्घटनेचीही भीती असते. त्यातच उत्साही पर्यटकांना पठारावर हुल्लडबाजीला उधाण येते. अशांना चाप लावण्यासाठी पाटण व उंब्रज पोलिसांनी (Umbraj Police) करडी नजर ठेवली आहे.