Tokyo Olympic 2020 : जगातील मानाची स्पर्धा समजली जाणाऱ्या टोकियो ऑलम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धेची उत्सुकता आता शिगेला लागलीये. 23 ते 8 ऑगस्ट या कालावधीत जपानमधील टोकियो शहरात ही स्पर्धा पार पडणार आहे. यंदाच्या वर्षी 18 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारातून 126 खेळाडू भारताचे प्रतिनिधीत्व करताना पाहायला मिळणार आहेत. यात महाराष्ट्रातील आठ खेळाडूंचा समावेश आहे. जागतिक व्यासपीठावर देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या राज्यातील खेळाडूंमध्ये 6 खेळाडू 23 ते 8 ऑगस्ट दरम्यान मैदानात उतरतील. तर उर्वरित 2 खेळाडू पॅरा ऑलिम्पिकमध्ये देशासाठी प्रतिनिधीत्व करणार आहेत. जाणून घेऊयात जागतिक स्तरावरील सर्वोच्च स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंसदर्भातील खास माहिती (This 8 Players From Maharashtra State will Participate in Tokyo Olympic)

तेजस्विनी सावंत (Tejaswini Sawant) (50 मीटर रायफल थ्री पोजिशन )

भारताची अनुभवी नेमबाज असलेल्या तेजस्विनी सावंतने 14 व्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेची फायनल गाठत टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट पक्के केले होते. वयाच्या 40 व्या वर्षी तिचे ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न सत्यात अवतरले आहे. 2010 मध्ये म्युनिख येथे पार पडलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत तेजस्विनी सावंत हिने गोल्डन कामगिरी केली होती. 50 मीटर रायफल प्रोन प्रकारात तिने विश्वविक्रमाची बरोबरी करत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले होते. रूशियन नेमबाद मरीना बोबकोवा हिच्या 12 वर्षांच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी करण्याचा पराक्रम तेजस्विनीने केला होता. जागतिक स्पर्धेत भारताला सुवर्ण पदकाची कमाई करुन देणारी ती पहिली महिला खेळाडू आहे. यापूर्वी दोन वेळा तेजस्विनीचे ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न भंगले होते. 2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिक आणि त्यानंतर दुसऱ्यांदा 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिकसाठी तिचे प्रयत्न अपूरे पडले. ‘वय हा फक्त आकडा असतो’ याचा नमुना पेश करत तिने चाळीशीत ऑलिम्पिकचे स्वप्न सत्यात उतरवले. ऑलिम्पिकपूर्वी दिल्लीत झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत तेजस्विनीने 50 मीटर रायफल थ्री पोजिशन मिश्र प्रकारात गोल्डन कामगिरी केली होती. यंदाच्या स्पर्धेत तिच्याकडून लक्षवेधी कामगिरीची अपेक्षा आहे. ज्या कोल्हापूरला कुस्तीची पंढरी म्हणून ओळखले जाते त्या ठिकाणी जागतिक दर्जाचा नेमबाज ही जन्माला येऊ शकतो, हा विचार तेजस्विनीने कोल्हापूरच्या मातीत रुजवला.

राही सरनोबत (Rahi Sarnobat) ( खेळ 50 मीटर पिस्तूल)

तेजस्वीनी सावंतच्या प्रेरणेतून नेमबाजीची वाट धरलेली राही सरनोबत ही यंदाच्या वर्षी दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये भाग घेत आहे. 25 मीटर पिस्तूल प्रकारात सातत्याने तिच्याकडून दमदार कामगिरी पाहायला मिळते. वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला गोल्ड मिळवून देणारी ती पहिली भारतीय असून आशियाई क्रीडा प्रकारात गोल्डन कामगिरीची नोंद करणारी देशातील पहिली महिला हा मानही तिच्याच नावे आहे. 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिकवेळी भारतीय नेमबाजीच्या ताफ्यातील ती सर्वात कमी वयाची नेमबाज होती. यंदाच्या ऑलिम्पिकपूर्वी तिने गोल्डन धमाका केला. याशिवाय जागतिक नेमबाजीतील क्रमवारीत आपल्या गटात अव्वलस्थान मिळवत ती ऑलिम्पिक स्पर्धेतील पदकाची प्रबळ दावेदार बनली आहे.

अविनाश साबळे (Avinash Sable) (खेळ- स्टीपलचेस शर्यत)

महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील शेतकरी कुटुंबियातील अविनाश साबळे 3000 मीटर स्टीपलचेस शर्यतीत धावताना दिसणार आहे. यंदाच्या वर्षी त्याने या क्रीडा प्रकारात 8:20.21 वेळेत अंतर पार करुन राष्ट्रीय विक्रम नोंदवला आहे. शालेय शिक्षणासाठी बीड जिल्ह्यातील मांडवा या छोट्याशा गावातून जवळपास 6 किमी अंतर पार करण्याची त्याची धावपळ त्याला ऑलिम्पिक सारख्या मोठ्या व्यासपीठावरुन येऊन ठेपलीये. 12 वी पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर अविनाश आर्मीमध्ये भरती झाला. 2013-14 ला त्याची पहिली पोस्टिंग ही सियाचीन ग्लेशियर येथे होती. 2015 मध्ये त्याने आर्मी अंतर्गत क्रॉसकंट्री स्पर्धेत पहिल्यांदा सहभाग घेतला. क्रॉसकंट्रीतून स्टीपलचेस शर्यत निवडण्यासाठी त्याचे अधिक वजन आड आले. तीन महिन्यात त्याने 20 किलो वजन कमी करुन 2018 मध्ये त्याने राष्ट्रीय कॅम्प जॉईन केला.

प्रविण जाधव (Pravin Jadhav) (खेळ-तिरंदाजी)

सातारा जिल्हा हा सैन्याच माहेर घर आहे म्हटल्यास अतिशोक्ती ठरणार नाही. जिल्ह्यात घरटी एकतरी सैन्यात असतोच. प्रविण जाधवही इंडियन आर्मीतील एक शिपाई. यापूर्वीची त्याची ओळख मोल मजुरी करुन कसेबसे घर चालवणाऱ्या कष्टाळू आई-वडिलांचा मुलगा. फलटण तालुक्यातील सरडे गावातील रमेश जाधव आणि संगीता जाधव या दांपत्यांनी पोटाला चिमटा काढून लेकाला स्पोर्ट्समन करण्यात मोलाची जबाबदारी पार पाडलीये. 2016 मध्ये बँकॉकमध्ये पार पडलेल्या आशियाई स्पर्धेत प्रविणने आई-वडिलांचा विश्वास सार्थ ठरवला. त्याने कांस्य पदकाची कमाई केली. खेळातील दमदार कामगिरीच्या जोरावर 2017 मध्ये तो स्पोर्ट्स कोट्यातून आर्मीत भरती झाला. आता तो सातारा, महाराष्ट्र आणि देश आणि आपल्या इंडियन आर्मीच नाव अभिमानाने उंचावण्याच्या इराद्याने स्पर्धेत उतरणार आहे.

चिराग चंद्रशेखर शेट्टी (Chirag Shetty) (खेळ-बॅडमिंटन पुरुष दुहेरी)

बॅडमिंटनमधील पुरुष दुहेरीत मुंबईकर चिराग शेट्टी हा सात्त्विकसाईराज रंकीरेड्डीच्या साथीने कोर्टवर उतरणार आहे. थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत चीनी जोडीला पराभूत करुन दोघांनी सर्वांचे लक्ष वेधले होते. बीडब्ल्यूएफ 500 स्पर्धा जिंकणारी भारताची ही पहिली जोडी आहे. पुरुष आणि महिला एकेरीत बॅडमिंटनमध्ये आपल्याला अनेक चांगली नावे मिळाली. पुरुष दुहेरीत नवा इतिहास रचण्याच्या इराद्याने ही जोडी मैदानात उतरेल. मुंबईकर आणि हैदराबादकर मिळून ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

विष्णू सरवानन (Vishnu Saravanan) (खेळ-सेलिंग)

यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत पहिल्यांदाच सेलिंग इव्हेंटमध्ये तीन खेळाडू पात्र ठरले आहेत. लेसर स्टँडर्ड क्लास क्रीडा प्रकारात मुंबईकर विष्णू सरवानन भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. त्याला सेलरचा वारसाच लाभला आहे. त्याचे वडील रामचंद्रन सरवानन हे सुभेदार मेजर पदावरुन निवृत्त झाले आहेत. आपल्या वडिलांच्या पावलावर पाउल टाकत त्यानेही या क्षेत्रात करियर करायचे ठरवले. त्याने आपल्या वडिलांच्या छत्रछायेतेच ऑलिम्पिकची तयारी केलीये. विष्णूने 2014 मध्ये मद्रास इंजिनियर ग्रुप (MEG) बॉइज स्पोर्ट्समध्ये त्याने प्रवेश घेतला. विष्णूने ज्यूनियर आणि युथ नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये त्याने आपल्यातील कौशल्य दाखवून दिले. 2016 मध्ये त्याने हाँकाँगमध्ये झालेल्या सेलिंग स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली होती. सेलिंग स्पोर्ट्स हा रॉयल गेम आहे. विष्णू जी बोट वापरतो त्याची किंमत 9 लाख रुपये आहे. इंडियन नेव्हीने त्याला ही बोट दिली असून सरावासाठी त्याच्यावर महिना 50 हजार इतका खर्च इंडियन नेव्ही करते. देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करण्यासाठी तो प्रयत्नशील असेल.

स्वरुप उन्हाळकर (Swaroop Unhalkar) कोल्हापूर (खेळ-पॅरा शुटिंग-10 मीटर रायफल)

कोल्हापूरचा स्वरूप उन्हाळकर दिव्यांगावर मात करून टोकयो पॅरा-ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करताना दिसणार आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अशक्यप्राय लक्ष्यही साध्य करता येते, अशी प्रेरणा स्वरुपच्या प्रवासातून दिसून येते. लहानपणीच पोलिओमुळे त्याचे दोन्ही पाय निकामी झाले. त्याचे वडील आपल्या खांद्यावरुन त्याला शाळेत न्यायचे. पाय निकामी असताना स्वरुपने स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न पाहिले. स्पोर्ट्समध्ये करियर करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या खेळ प्रकारात हात आजमावल्यानंतर 2009 पासून तो नेमबाजीकडे वळला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्याने कोल्हापूरमधील दुधाळी शुटींग रेंजमध्ये आपल्या प्रवासाला सुरुवात केली. पॅरा-ऑलिम्पिक तो कोल्हापूरहून पुण्याला आला. प्रेरणादायी प्रवास आणखी बहरदार करुन मायदेशी परतण्याच्या इराद्यानेच तो जपानच्या मैदानात उतरेल. जागतिक क्रमवारीत स्वरुप पाचव्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये 10 पदकं आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्याने 20 पदकं जिंकली आहेत. 30 ऑगस्ट रोजी होणाऱ्या 10 मीटर एअर रायफल स्टॅंडिंग प्रकारात तो आपल्यातील कौशल्य दाखवणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील आठमध्ये सर्वाधिक तीन खेळाडू हे नेमबाजीतील आहेत.

सुयश जाधव (Suyash Jadhav) (खेळ-पॅरा स्विमर-50 मीटर बटर फ्लाय, 200 मीटर वैयक्तिक मिडले)

महाराष्ट्राचा आठवा आणि पॅरा ऑलिम्पिकमधील दुसरा खेळाडू म्हणजे सोलापूरचा सुयश जाधव. 50 मीटर बटर फ्लाय 200 मीटर वैयक्तिक मिडले स्विमिंगमध्ये यश मिळवण्याच्या इराद्याने तो पाण्याला भेदताना दिसणार आहे. वयाच्या दुसऱ्या वर्षी पोहायला शिकलेल्या सुयशला विजेचा धक्का बसला आणि तो दोन्ही हातांनी निकामी झाला. जलतरणाचा वारसा लाभलेल्या सुयशने आपल्या वडिलांच्या सानिध्याखाली या परिस्थितीतही ध्येय साध्य करायचे ठरवले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here