आष्टी (बीड): देशभरातील नाथभक्तांची वाढत असलेली गर्दी पाहता भक्तांच्या सोयीसाठी आष्टी तालुक्यातील मायंबा व पाथर्डी (जि. नगर) तालुक्यातील मढी ही दोन शेजारी-शेजारी असणारी नाथ समाधीक्षेत्रे ‘रोप-वे’ने जोडण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यासंदर्भात दोन्ही देवस्थानांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक नुकतीच पार पडून त्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. आमदार सुरेश धस यांनी याकामी पुढाकार घेतला असून, सुमारे ४५ कोटी रुपये खर्चाच्या या कामासाठी केंद्र व राज्य सरकारची मदत घेण्यासाठी पाठपुरावा करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.

तालुक्यातील सावरगाव येथे नवनाथांपैकी एक आद्यनाथ मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी आहे. गर्भगिरीच्या उंच डोंगरावर हे देवस्थान वसलेले आहे. त्याशेजारीच मढी (ता. पाथर्डी) येथे चैतन्य कानिफनाथांची संजीवन समाधी आहे. याशिवाय श्रीक्षेत्र वृद्धेश्वर (म्हातारदेव) हे देवस्थानही जवळच असून, तेथेच नाथ संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवल्याचे मानले जाते. पाच-पाच किलोमीटरच्या अंतरावर ही देवस्थाने आहेत. नाथ संप्रदायात या तिन्ही देवस्थानांना मोठे महत्त्व आहे. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी मायंबा व मढी या दोन्ही ठिकाणी समाधी स्नानसोहळा होतो. यासाठी देशभरातून लाखो भाविक गर्दी करतात.

मायंबा देवस्थान

गेल्या काही वर्षांत ही तिन्ही देवस्थाने पक्क्या रस्त्याने जोडली गेली असली तरी डोंगरमाथ्यामुळे प्रवास कठीण ठरतो. अनेक भाविक या परिसरात पायी वारीने तिन्ही देवस्थानांचे दर्शन घेतात. धार्मिक पर्यटनाबरोबरच निसर्ग पर्यटनाला असलेला प्रचंड वाव लक्षात घेऊन दोन्ही देवस्थान समित्यांनी संयुक्त विकास कामांचा निर्णय घेतला आहे. आमदार सुरेश धस यांच्या पुढाकाराने दोन्ही देवस्थान समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. यावेळी मायंबा देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, सचिव बाबासाहेब म्हस्के, मढी देवस्थान समितीचे अध्यक्ष संजय मरकड, बबन मरकड, शिवजीत डोके आदींची उपस्थिती होती. बैठकीत शासनाच्या विविध योजनांची मदत घेऊन रोप-वे चे काम करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांसाठीचे प्रस्ताव सादर करून पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले.
बैठकीत वणी (जि. नाशिक), गिरनार पर्वत (गुजरात) या देवस्थानवर असलेल्या रोप-वे सुविधेचा आढावा घेण्यात आला. मायंबा देवस्थान तुलनेने अधिक उंचीवर आहे. त्यामुळे मढी ते मायंबा रोप-वे ने जोडण्यात येणार आहेत. दोन देवस्थाने रोप-वे ने जोडली जाणारा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प ठरणार आहे.

प्रकाशझोतातील मंदिराचे सुंदर दृष्य


रोप-वे बरोबरच संपूर्ण गर्भगिरी डोंगररांग परिसर निसर्ग पर्यटन क्षेत्र म्हणून ओळखला जावा यासाठी वृक्षारोपण करण्याचे ठरविण्यात आले आहे. मायंबा समाधी मंदिर परिसर व डोंगररांगांमध्ये वड, पिंपळ, कडुनिंब आदी प्रकारची ४४ हजार झाडे लावण्यासाठी देवस्थान समितीने जोरदार तयारी केली आहे. मढी देवस्थान व ग्रामपंचायतीच्या वतीने परिसरात वृक्षारोपण मोहीम हाती घेतली जाणार आहे.

मढी देवस्थान

मढी-मायंबा रोप-वे झाल्यास आष्टी तालुक्यातील डोंगराळ व दुर्गम भागाचे पाथर्डी, तिसगाव या बाजारपेठेच्या गावांबरोबर आर्थिक संबंध वाढतील. उपेक्षित गावे विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊन नगर तालुक्यातील आगडगाव, महाल, करंजी घाट, वृद्धेश्वर, मढी, मायंबा, तारकेश्वर, मोहटादेवीपासून येवलवाडी येथील सिद्ध जालिंदरनाथांच्या समाधी स्थानापर्यंत पर्यटन वाढण्यास चालना मिळू शकेल.
-राजेंद्र म्हस्के, सरपंच, सावरगाव, ता. आष्टी

दुर्लक्षित मायंबा देवस्थानचा आमदार सुरेश धस यांच्या पुढाकारातून कायापालट सुरू आहे. मायंबा येथे अनेक विकासकामे पूर्ण झाली असून, काही प्रगतिपथावर आहेत. रोप-वे मध्ये डोंगर परिसराच्या मूळ स्वरूपाला कुठेही हानी न पोचवता काम पूर्ण करण्यात येईल. परिसराच्या सर्वांगीण विकासाला मढी देवस्थानचे सहकार्य लाभणार असल्याने विकासाचा वेग वाढेल.
-दादासाहेब चितळे, अध्यक्ष, मायंबा देवस्थान, सावरगाव)

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here