लोकसंगीताचा वारसा लाभलेल्या शिंदे परिवाराने महाराष्ट्रातच नाही तर सबंध देशभरात आपल्या गाण्यांचा चाहतावर्ग निर्माण केला आहे.
लोकसंगीताचा (Folk music) वारसा लाभलेल्या शिंदे परिवाराने महाराष्ट्रातच नाही तर सबंध देशभरात आपल्या गाण्यांचा चाहतावर्ग निर्माण केला आहे. भक्तिगीत (Devotional songs), कोळीगीत Koli songs, कव्वाली (Qawwali) आणि लोकगीत गायनात आपला ठसा उमटवल्यानंतर त्यांनी चित्रपटांसाठीही पार्श्वगायन केले. वडील प्रल्हाद शिंदे (Pralhad Shinde) यांचा लोकसंगीताचा वारसा जिवंत ठेवून आजच्या पिढीलाही त्यांनी लोकसंगीतावर ताल धरायला भाग पाडले आहे. “लोकगीतांतील या शिंदेशाही’वर खास सदर… (Anand Shinde life journey in Shindeshahi in folk music-ssd73)
Also Read: ‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार यांनीही भोगला होता तुरुंगवास
माझे वडील प्रल्हाद शिंदे त्यावेळचे आघाडीचे गायक होते. गाण्याच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रभर त्यांचा प्रवास होत असे. माझ्या जन्माच्या वेळी ते सोबत नव्हते, कारण तो महिना सण-उत्सवाचा होता. गावागावांत जत्रा-यात्रामध्ये वडील आणि आजोबा आपली कला सादर करून पैसे कमावत असत.
माझ्या बारश्याचा एक वेगळाच किस्सा आहे. माझ्या जन्माचा आबाला खूप आनंद झाला. जेव्हा ते मला पहिल्यांदा पाहायला आले तेव्हा त्यांनी सुपारीतून जेवढे पैसे कमावले, त्या पैशांवर मला झोपवले. त्यावर आईने वडिलांना महिनाभर कष्ट, धावपळ करून पैसे कमावले. मग त्या पैशांवर बाळाला का झोपवले, असा सवाल केला. तेव्हा वडील म्हणाले, माझे जीवन कष्टात गेले, मात्र माझा हा मुलगा असाच राजासारखा जगला पाहिजे. माझ्या वडिलांकडे कला होती. त्यांच्या कलेला लोकांकडून दाद असायची म्हणून राज्यभरात ते गायनासाठी जात. त्यांना पैसे चांगले मिळत होते; पण पैशाचे आर्थिक नियोजन कसे करायचे हे माहीत नसल्याने आमचं घर नेहमीच आर्थिक अडचणीशी झगडतच असायचं.

पावसाळा सुरू झाला की वडिलांचे दौरे नसायचे. त्यामुळे आईसह ते मला गावी पाठवायचे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा या गावी माझे बालपण गेले. घर शेणामातीचे होते. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश घेतला. वडील मोठे गायक होते, बहुतांश मुंबईत असायचे. त्यांच्याशी गाठीभेटीही कमी व्हायच्या. अधूनमधून आबांच्या भेटीसाठी मुंबईला येत असे; पण माझे वडील एवढे मोठे गायक आहेत, हे लहानपणी कळलेच नाही. वयाच्या पाचव्या वर्षापासून वडिलांची गाणी मंदिराच्या भोंग्यावर, रेडिओ आणि वाजंत्री पथकांच्या माध्यमातून माझ्या कानावर पडायची. त्यातून माझी संगीत, गायनाबद्दल गोडी निर्माण होत गेली.
Also Read: ‘आमचं बाळ काय ढगातून पडलंय का?’; म्हणणाऱ्यांना उर्मिलाचं सडेतोड उत्तर
आमच्या कुटुंबाला संगीत, गायनाचा वारसा आहे. आजी त्यावेळी तबला तर आजोबा हार्नोनियम वाजवायचे. ते कला सादर करून भिक्षा मागायचे. सोलापूर ही संतांची भूमी. आमचे कुटुंब संत चोखामेळा यांचे वंशज असल्याने भक्ती ही लहानपणापासून मनात उपजत होती. म्हणूनच शाळा सुटल्यावर किंवा शाळेला दांडी मारून मी संत चोखोबांच्या समाधीवर जाऊन बसायचो. माझे आजोबा केरप्पा माझे खूप लाड करायचे. समाधीवरून घरी येताना पेढा घेऊन देत. खूप गोष्टी सांगत. दररोज घर ते शाळा असे ते मला खांद्यावर घेऊन जायचे. शिक्षणात मला बऱ्यापैकी गती होती. मात्र मन शाळेत जास्त रमलं नाही. त्यामुळे नववीनंतर शिक्षण सुटले. मित्र गोपाळ शिवा याच्यासोबत मी गाई-बैलांसोबत शेतात जास्त रमत असे. शेणामातीचा मला खूप जिव्हाळा लागला.
शिक्षण सुरू असताना माझा कल मात्र गायनाकडे होता. मित्रांना घरी बोलावायचे. चिवडा आणून द्यायचो आणि त्यांच्याकडून गृहपाठ करून घ्यायचो. मी मंदिरात गाणी, अभंग ऐकायला जायचो. रात्रभर जागरण चालायचे, ते तल्लीन होऊन ऐकायचो. तिथून लोकसंगीताबद्दल गोडी निर्माण झाली. नकळत माझ्यावर संस्कार होत गेले. गावात वाघ्या मुरळी यायचा, वासुदेव गात यायचा, त्यांचे गाणे ऐकत ऐकत त्यांच्यामागे जायचो. अनेकदा मी दूर निघून जायचो, मग आजीच्या हातचा मार खायला लागायचा.
Also Read: ‘माफ करा, तुम्ही जास्तच सडपातळ आहात’, थट्टेनं छवीचा संताप
“उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे’ हे वडिलांचे गाजलेले गाणे. त्यावेळी सर्वत्र लोकप्रिय होते. या गाण्यामुळे मला बाबासाहेबांची पहिली ओळख निर्माण झाली. त्यांचा प्रभाव माझ्यावर होत गेला. लहाणपणी जलसे, आंबेडकर जंयतीमध्ये रमायचो. तिथून सामाजिक जाणीव निर्माण झाली. मंगळवेढा म्हणजे गायक, लेखकांची खाण. दीपशाम मंगळवेढेकर (आता तरी देवा मला पावशील का), हरेंद्र जाधव (उद्धारली कोटी कुळे), दत्ता पाटील (पाउले चालती पंढरीची वाट), बुआ जगताप यांच्यासारखे लेखक, गीतकार वडिलांचे मित्र होते. प्रल्हाद शिंदे यांचा मुलगा म्हणून मला जवळ घ्यायचे. त्यांच्या सहवासातून गाणे, लिखाणाचे वजन, गाण्यामधील बोल याचे काय महत्त्व आहे, ते शिकायला मिळाले.
लहानपणी मला वडिलांसोबत विठ्ठल उमप (Vitthal Umap) यांचे गाणे खूप आवडायचे. त्यावेळी आपण विठ्ठल उमप यांच्यासारखे गायक व्हायचे, असे ठरवले होते. मात्र हळूहळू वडिलांच्या आवाजाचे, स्वराचे महत्त्व कळायला लागले. बाबांचे महत्त्व, त्यांच्या गायकीचा स्तर समजायला लागला. सोबत गोविंद म्हशीलकर, विठ्ठल उमप यांच्यापासून खूप शिकायला मिळाले.

घरची परिस्थिती बेताची असल्याने नवीन ड्रेस घेणे शक्य नसायचे म्हणून शाळेचा ड्रेस कायम अंगावर असायचा. एकदा गावातल्या गणपती मंडळाच्या कार्यक्रमात गाण्याची स्पर्धा ठेवली होती. कवी मनोहर लोकरे यांनी मला एक गाणं गायला दिलं. “घेऊनी सुगंधी फुला, आलो शरण गणराया तुला’ मंडईच्या स्टेजवर हे गाणे मी आयुष्यात पहिल्यांदा गायले. तिथून खऱ्या अर्थाने माझ्या गायनाच्या प्रवासाला सुरुवात झाली.
मी नंतर मुंबईला आलो. तेव्हा आबा म्हणाले, “तू गायक होशील तेव्हा होशील, मात्र पहिले तबला शिक, गायक झाला तर तुला कार्यक्रम मिळेल, मात्र तो नशिबाचा भाग असेल. वादक झालास तर सर्वत्र कार्यक्रम करायला मिळेल.’ आबा स्वत: “हमे तो लूट लिया मिल के हुस्न वालोने’ त्या काळातले सर्वात मोठे कव्वाल इस्माईल आझाद यांच्याकडे तबला वाजवायचे. तबला वाजवता वाजवता ते कोरस करायला लागले. त्यानंतर वडील खऱ्या अर्थाने गायनाच्या मुख्य प्रवाहात आले. वडिलांनी मला क्सासिकल (Classical) तबला शिकवला. ते कमालीचे शिस्तप्रिय होते. चुकले तर तबल्याच्या हातोडीने माझ्या गुडघ्यावर मारायचे. खूप वेदना व्हायच्या. मात्र त्याचा मला फायदाच झाला. त्यामुळे आज कुठलाही वादक आजारी पडला, कुठल्या कारणाने येऊ शकला नाही तर मी स्वत:च वादन करतो.
एकदा शाळेतील स्नेहसंमेलनात ट्रॅंगल नीट न वाजवल्याने मास्तरांनी मला शाळेबाहेर उभं ठेवून, “तू प्रल्हाद शिंदेचा मुलगा आहेस. तुला हे वाजवता आलं पाहिजे’, असं ठणकावून सांगितलं. त्यानंतर मी खूप प्रॅक्टिस केली आणि अखेर स्नेहसंमेलनात ट्रॅंगल वाजवलं. त्याच्यासाठी दादही मिळवली.
घरासमोर राहात असणाऱ्या मुलीसोबत आजीने माझे लग्न ठरवले होते. मी आणि विजया (पत्नी) आम्ही दोघेही एकाच शाळेत होतो. एकत्र खेळायचो. विजया शाळेत लेझीम छान खेळायची. घरातील सर्व कामे आवडीने करायची. त्यामुळे आजीला ती खूप आवडायची. एकदा शाळेतील स्नेहसंमेलनामध्ये मास्तरांनी मला आणि मिलिंदला एक गाणे गायला लावले. ते गाणे होते “येऊ कशी कशी मी नांदायला…’ तबला वाजवला, तर भाऊ मिलिंदने गाणे गायले व विजया यांनी त्यावर नृत्य केले. तेव्हापासूनचा आमचा ताल असा जुळला आहे. असे आयुष्यातील अनेक प्रसंग आहेत, ते या सदराच्या निमित्ताने सांगणार आहे. आजच्यापुरते इथे थांबू, तोवर पुढची गोष्ट लिहून काढतो.
– आनंद शिंदे
Esakal