शनिवारी मध्यारात्री झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईसह उपनगराला चांगलेच झोडपले. रात्रभर झालेल्या पावसामुळे सकल भागात पाणी साचले, अनेक ठिराणी तर तलावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मुंबईतील रस्त्यांना नद्या-नाल्यांचं स्वरुप प्राप्त झालं होतं.
मुंबईत संततधार पाऊस कोसळल्यामुळे अनेक ठिकाणी तर घरांमध्येही पाणी शिरलं होतं. अनेक मुंबईकरांसाठी शनिवारची रात्र काळरात्र ठरली आहे.
मुसळधार पावसामुळे घराचे छत कोसळून मुंबईमध्ये तीन घटनांमध्ये दुर्देवी 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चेंबूरमध्ये 17, विक्रोळीमध्ये सात आणि भांडूपमध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ आणि अग्निशामन दलाकडून बचावकार्य वेगानं सुरु आहे
जखमींना जवळील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या घटनेप्रति दु:ख व्यक्त केलं आहे.
मृताच्या कुटुंबीयांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकी दोन-दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर दुखापतग्रस्तांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
चेंबूरमधील डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या भारतनगरमध्ये भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. संततधार पावसामुळे दरड भिंतीवर कोसळली अन् भिंत घरावर कोसळल्यामुळे ही दुर्वेवी घटना घडली आहे.
एनडीआरफ पथक घटनास्थळी दाखल असून बचावकार्य वेगानं सुरु आहे. आत्तापर्यंत सहा जणांना वाचवण्यात यश आलं आहे. बचावकार्य अजूनही सुरू असून अजून काही नागरिक मलब्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मृताच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विक्रोळीमध्ये घडलेल्या दुसऱ्या एका घटनेमध्ये दुमजली इमारत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथकं घटनास्थळी दाखल झाली असून अजून कुणी मलब्याखाली दबलं आहे का? याचा शोध घेतला जात आहे. भांडुपमध्ये संरक्षक भिंत कोसळून एका 16 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. सोहम थोरात असं या मुलाचं नाव आहे. भांडुपच्या अमरकोट भागामध्ये वनविभागाची भिंत कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडली.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि नवाब मलिक यांनी घटनास्थळाला भेट दिली.
मुसळधार पावसामुळे चेंबूर, विक्रोळी येथे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त करण्यात आलाय. मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमींवर मोफत उपचार केले जाणार आहेत. मंत्री नवाब मलिक यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. अशाप्रकारच्या भागात राहणाऱ्या लोकांसाठी इतरत्र राहण्याची सोय करण्यासाठी एक प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचं ते म्हणाले.
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर गेली आहे. नदीची धोक्याची पातळी 3.3 मीटरवर गेली आहे. नदी ओव्हरप्लो झाली असून पाण्याची पातळी 4.2 मीटर झाली आहे. यामुळे पालिकेने आजूबाजूच्या वस्त्या खाली करण्यास सुरुवात केली .
शहर आणि उपनगरात रात्रभर पावसाचा जोर कायम राहिला. पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपून काढलं. मुंबईत 192.17 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या. आता पावसाने विश्रांती घेतली असली तरी पुढील 24 तासात देखील मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पुढील दोन दिवस मुंबईत पावासाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गरज नसल्यास घराबाहेर पडू नका अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here