सांगली : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना हिचा आज वाढदिवस… सांगलीची स्मृती आज जागतिक क्रिकेट विश्वातील एक अफलातून खेळाडू म्हणून पुढे आली आहे. तिचा भाऊ श्रवण मानधना याला वडील श्रीनिवास मानधना क्रिकेट सरावासाठी मैदानावर न्यायचे. त्यावेळी स्मृती सोबत असायची. ती लहान होती. कंटाळायची, रडायची, म्हणून वडील तिला एका कोपऱ्यात जावून बॉलिंग करायचे. तिने क्रिकेटचा श्रीगणेशा तिथेच केला आणि आज ती भारतीय महिला क्रिकेटचा कणा आहे.(indian-women-cricket-player-smriti-mandhana-birthday-life-memory-sangli-sport-news-akb84)
सहा वर्षांपूर्वी विश्रामबाग येथील एका सोसायटीत मानधना कुटुंब भाड्याच्या फ्लॅटमध्ये रहायचे. त्या वर्षीच्या दिवाळी अंकासाठी तिची मुलाखत घ्यायची होती. नुकतीच भारतीय क्रिकेट संघात तिने जागा बनवली होती. ज्या दिवशी मुलाखत घ्यायची होती, त्याच दिवशी तिने आपल्या कमाईतून कुटुंबासाठी नवा फ्लॅट खरेदी केला होता. आई-बाबांना तिने दिलेली दिवाळीची ती खास भेट होती. त्याच्या करारावर सह्या करून ती आली होती. तिच्या कर्तृत्वाने तिचे पालक भारावून गेले होते. या मुलाखतीच्या निमित्ताने तिने तिचा भन्नाट प्रवास उलगडून दाखवला.

स्मृती क्रिकेटचा सरावाला जाते, हे तिच्या कुटुंबाने पाहुण्यांपासून लपवून ठेवले होते. मुलींनी क्रिकेट खेळावे, हे अनेक पाहुण्यांना मान्यच नव्हते. काहीजण टिंगल टवाळी करायचे. ती भारतीय संघात निवडली गेली, तेंव्हा तेच लोक ‘स्मृती आमची पाहुणी आहे’, हे अभिमानाने सांगतात, हे वेगळे सांगायला नको. वडिलांसोबत भावाच्या क्रिकेट सरावाला जाणे, तिथे वडिलांनी क्रिकेटची गोडी लावणे आणि एक अफलातून डावखुरी भारतीय सलामीवीर जन्माला येणे हा सारा प्रवास भन्नाटच.

सांगलीसारख्या छोट्या शहरात एका मुलीला सरावाच्या फार कमी संधी मिळतात. त्यातून तिने धडक दिली. प्रसंगी इचलकरंजी येथे सराव केला. आजही ती सांगलीतील एका शाळेच्या मैदानावर सराव करते. तीच लॉर्डस्, इडन गार्डन, वानखेडे गाजवते.तिला स्वयंपाक करायचा खूप कंटाळा, मात्र आता तिला थोडे थोडे शिकवते आहे, असे तिच्या आईने आम्हाला सांगितले होते. ती पोहे बनवत असतानाचे फोटोही आम्ही घेतले होते. स्मृतीला भेळ खूप आवडते आणि सांगलीची संभा भेळ तिची खूपच आवडती आहे.
Also Read: ‘माझी मैना गावाकडं राहिली! लावणीतून सीमाप्रश्नाची खदखद

मला शक्य झाले तर मी जगभरातील क्रिकेट मैदानांच्या बाहेर या संभा भेळच्या शाखा सुरु करायला लावीन, असं ती सांगते. स्मृतीने सांगलीत छोटेसे ‘स्मृती १८’ हा कॉफी शॉप सुरु केला आहे. तिला गाणी ऐकायला खूप आवडतात. जाहिरात क्षेत्रातही ती झळकते आहे. ५९ एकदिवशीय सामान्यांत स्मृतीने २ हजार २५३ धावा केल्या आहेत. ४१.७ च्या सरासरीने तिने धावा केल्या आहेत. ट्वेंटी-२० करिअरमध्ये तिने ८१ सामन्यांत १ हजार ९०१ धावा केल्या असून सरासरी २६ आणि स्ट्राईक रेट १२१.३ इतका राहिला आहे.
Esakal