परिक्षेसाठी श्रुती चेंबूरच्या घरी आली अन् रात्रीच्या पावसात…
मुंबई: शहरात शनिवारी रात्रीपासून बरसणाऱ्या पावसाने सगळ्यांनाच धडकी भरवली. रविवारी अतिशय थोडा वेळ पावसाने विश्रांती घेतली होती. पण त्यानंतर पुन्हा पावसाने जोरदार आगमन केले. शनिवारच्या पावसामुळे चेंबूरमधील भारतनगर परिसरात एकाच कुटुंबातील चौघांवर काळाने घाला घातला. पारधे कुटुंबात गौतम पारधे, पंचशीला पारधे आणि मुलं श्रुती, शुभम आणि दिक्षा पारधे हे पाच जण होते. हे कुटुंब भारतनगरमध्ये वास्तव्यास होतं. पाच जणांचा परिवार सुखाने राहत होता, पण शनिवारी रात्री मुसळधार पावसाने या परिवाराला कायमचं एकमेकांपासून वेगळं केलं. (Chembur Wall Collapse Incident Shruti Pardhye Unfortunate Death mother 3 others dies vjb 91)

चेंबूरच्या वाशी नाका येथील भारतनगरमध्ये राहणाऱ्या कुटुंबात श्रुती आणि तिचं पाच जणांचं कुटुंब राहत होतं. पावसाच्या रुपात या कुटुंबावर निसर्गाने घाला घातला. संरक्षक भिंत घरावर कोसळली अन् फक्त 12 वर्षांची दिक्षा वाचली. बाकी सारं काही संपलं… श्रुती सोडून इतर लोक इथेच राहत होते. श्रुती मात्र कल्याणला आजीकडे राहत होती. काही कारणामुळे श्रुती काही दिवसांपूर्वीच भारतनगरला आली होती. श्रुतीला शिकून खूप मोठं व्हायचं होतं. ती ११ वी पास होऊन बारावीला गेली होती. इंजिनिअर होण्याचं श्रुतीचं स्वप्न होतं. पण एका रात्रीच्या पावसाने सगळी स्वप्न कायमची संपवून टाकली, अशी भावना श्रुतीची मावशी सविता यादव यांनी व्यक्त केली.

पंचशिला यांना सविता आणि वैशाली या दोन बहिणी. सविता यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला. सवितापेक्षा पंचशिला या लहान होत्या. ‘वाशीनाका येथे राहणाऱ्या पंचशिला तिथे राहत असताना कायम तिथल्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे भीतीच्या सावटाखाली जगायच्या. पंचशिलाने अनेकदा फोनवर बोलताना त्या परिसरात पाणी भरण्याचा अनुभव साांगितला होता. शिवाय, दरड आणि भिंत कोसळण्याबाबत ही सांगितले होते. पण असं कधी त्यांच्यासोबत होईल असं वाटलं नव्हतं’, असं सांगताना सविता यादव यांचे डोळे अक्षरश: पाणावले.

श्रुती काही दिवसांपूर्वीच कल्याणहून आजीच्या घरातून भारतनगरमध्ये परतली होती. पण कालच्या दुर्घटनेत कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. सुदैवाने या सर्व घटनेत १२ वर्षांची दिक्षा वाचली. पण, संपूर्ण कुटुंब या घटनेत मृत्यूमुखी पडल्यामुळे आता तिला काय आणि कसं समजवायचं? असा प्रश्न तिची मावशी सविता यादव यांना पडला असल्याचं त्या म्हणाल्या.
(संपादन- विराज भागवत)
Esakal