देहू :v टाळ मृदंगाच्या गजरात,ज्ञानोबा तुकाराम आणि पुंडलिकावरदे हरी विठ्ठलाच्या नामघोषात आषाढी एकादशी साठी संत तुकाराम महाराजांच्या पादूका देहूतून पंढरपूरकडे सोमवारी(ता.19) सकाळी आठ वाजता मार्गस्थ झाल्या. फुलांनी सजविलेल्या दोन एसटी बसमध्ये तुकोबांच्या पादूका संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष,विश्वस्त आणि सेवेकरी अशा चाळीस जणांबरोबर पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. देहूकरांनी रस्त्याच्याकडेला उभे राहून या सोहळ्याला भावपूर्ण निरोप दिला.एसटी बसच्या मागे पुढे चोख पोलिस बंदोबस्त होता.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने पालखी सोहळ्यातील यंदाही पायी वारी रद्द केली. त्यामुळे 1 जुलैला प्रस्थान झाल्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या पादूका देऊळवाड्यातच मुक्कामी होत्या.पालखी सोहळ्यातील परंपरेनुसार होणारी नित्य पुजा, आरती,किर्तन आणि जागर गेले 19 दिवस देऊळवाड्यातच संस्थानने घेतले. मंगळवारी(ता.20) जुलैला आषाढी एकादशी आहे. शासनाने चाळीस जणांच्या उपस्थितीत संस्थानला पंढरपूरकडे जाण्यास परवानगी दिली.त्यातही कोरोनाची टेस्ट आणि विविध अटी होत्या.शासनाच्या पत्रानुसार संस्थानने सर्व तयारी केली.

मुख्य देऊळवाड्यात सोमवारी पहाटे काकडा झाला.संत तुकाराम शिळा मंदिरात संस्थानच्या विश्वस्तांच्या वतीने आरती झाली.भजनी मंडपात संत तुकाराम महाराजांच्या पादूकांची पुजा संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे,विश्वस्त यांच्याहस्ते पुजा झाली. तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही नितीन महाराज मोरे यांनी सपत्निक महापूजा आरती केली.संपूर्ण देऊळवाड्याला पुणे येथील ताम्हाणे कुटुंबियांनी आकर्षक फुलांची सजावट केली होती.दुपारी बारा वाजता भजनी मंडपात पंचपदी झाली. त्यानंतर डोक्यावर तुकोबांच्या पादूका घेवून मंदिर प्रदक्षिणा झाली.

प्रदक्षिणे दरम्यान देहूकर दिंडीकरांनी सुंदर ते ध्यान,सदा माझे जडो तुझे मुर्ती, श्री संताचिया माथा चरणी,उजळले भाग्य आता हे अभंग झाले. प्रदक्षिणा झाल्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या पादूका डोक्यावर घेवून इनामदारवाड्यात आणण्यात आल्या. इनामदारवाड्यात बारामती टेक्सटाईल मिल्सच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, आमदार सुनिल शेळके यांच्याहस्ते आरती झाली. त्यानंतर फुलांनी सजविलेल्या एसटीबस मध्ये पादूका ठेवण्यात आल्या. यावेळी संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे,पालखी सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे,अजित महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे,विश्वस्त माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, प्रांताधिकारी मधुसुदन बर्गे, तहसिलदार गीता गायकवाड व इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूने ग्रामस्थ उभे होते. भाविकांनी एसटी बसवर फुलांचा वर्षाव केला. पालखी मार्गावर परंडवाल चौकातील अनगडशावली दर्गा येथे आरती झाली.

माळवाडी येथील परंडवाल,बिरदवडे कुटुंबियांनी पादूकांचे स्वागत केले.त्यानंतर चिंचोली येथील शनिमंदिरात पालखीचा पहिला विसावा असतो.या ठिकाणीही आरती होवून पालखी सोहळा पुणेकडे मार्गस्थ झाला. “सुख पंढरिये आले | पुंडलिकें साठविले || घ्यारे घ्यारे माझे बाप| जिव्हा घेऊनि खरे माप|| करा एक खेप | मग नलगे हिंडणे||” खरे सुख पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनात आहे.त्यामुळे वर्षातून एकदा आषाढी एकादशीला जावे अशी भावना वारकऱ्याच्या मनात असते.त्यानुसार तो वारीत येत असतो. मात्र यंदा कोरोनामुळे संपूर्ण विश्वालाच त्रास होत आहे.त्यामुळे वारी रद्द झाल्याचे दुःख न दाखवता वारकरी आपल्या मनातून सावळ्या विठोबाचे दर्शन घेत आहे,याची प्रचिती देहूत येत होती.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here