आळंदी : रांगोळ्याच्या पायघड्या….फुलांची आकर्षक तोरणे….माउली नामाचा अखंड गजर…..आकाशातून पुष्पांचा वर्षाव….अशा उत्साही वातावरणात आजोळघरातील माऊलींच्या चांदिच्या चल पादुका पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांनी हातात उचलून घेतल्या अन् उपस्थित भाविकांनी ”पुंडलिका वरदे हरि विठ्ठल” असा जयघोष केला. माऊलींच्या चल पादुका आजोळघरातून बाहेर आणल्यानंतर फुलांची सजावट असलेल्या शिवशाहीत स्थानापन्न केल्या. शिवशाही आजोळघरापासून पंढरीकडे मार्गस्थ होताच आळंदीकरांनी जड अंतकणाने हात उंचावत ”माऊली माऊली”चा गजर करून भावपूर्ण निरोप दिला.
प्रतिवर्षी लाखोंच्या सोहळ्यातील पायी चालताना येणा-या वारीच्या आनंदास सलग दुस-यांदा मुकावे लागले.परिणामी गाडीने वारी करावी लागत असल्याने शिवशाहीतील वारकऱ्यांनीही डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
संत ज्ञानेश्वर माऊलीचा पालखी सोहळा तब्बल सतरा दिवसांचा आजोळघरातील मुक्काम उरकून आज आषाढ शुद्ध दशमीला चल पादुकांसह मोजक्या वारक-यांच्यासमवेत सकाळी पंढरीकडे मार्गस्थ झाला. ”जीवनावेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी”अशीच अवस्था आज वारक-यांची होती. गेली सतरा दिवस माऊलींच्या पादुका आजोळघरात आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर्शनाला तसेच पायी वारीलाही बंदी केली.

आज आषाढ शुद्द दशमी आणि उद्या आषाढी एकादशी असल्याने पंढरपूरात जाण्यासाठी लगबग होती. अवघ्या चाळिस लोकांना वारीसाठी परवानगी दिली. पहाटे माउलींच्या पादुकांवर पवमान पुजा आणि दुधारती,अभिषेक केला. त्यानंतर मानाचे किर्तन झाले. किर्तनानंतर लगेचच पंढरीला जाण्याची तयारी सुरू झाली. पादुका घेवून जाण्यासाठीची शिवशाही बस आळंदीतील गरूड कुटूंबियांनी आकर्षक फुलांनी सजविली. मार्गावर आळंदीकरांनी रांगोळ्याच्या पायघड्या केल्या. दुतर्फा घऱातून तसेच गॅलरीतून आळंदीकर माउलींच्या दर्शनासाठी उभे होते.

ठिक नऊ वाजता कर्णा वाजल्यानंतर पालखी सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर माउलींच्या पादुका घेत बसचे दिशेने निघाले. आणि उपस्थीतांनी माउलीनामाचा गजर केला. यावेळी पालखी सोहळा प्रमुख अॅड विकास ढगे, प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक, योगेश देसाई,जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे, तहसिलदार डॉ.वैशाली वाघमारे,वरिष्ठ पोलिस निरिक्षक ज्ञानेश्वर साबळे, राजाभाऊ चोपदार,बाळासाहेब चोपदार, नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर यांची उपस्थीती होती. आजोळघरातून माउलींच्या पादुका बाहेर आणल्यानंतर उपस्थीत ग्रामस्थ आणि वारक-यांनी पुंडलिका वरदे हरि विठ्ठलचा गजर केला. आणि माऊलींच्या पादुका बसमधे स्थानापन्न करून बस पंढरीच्या दिशेने ठिक सव्वानऊ वाजता मार्गस्थ झाली. यावेळी हेलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
दरम्यान पुणे सासवड जेजुरी मार्गे पालखी सोहळा वाखरी येथे जाणार आहे. त्यानंतर संतांच्या क्रमवारीनुसार परंपरेने पंढरपूरात प्रवेश करतील.

१] आकाशातून हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी…
२] चाळिस वारकऱयांसाठी दोन शिवशाही बस.
३] शिवशाही चालविण्याचा मान यंदा लक्ष्मण शिरसाठ,रामचंद्र ईधारे.
४] पालखी मार्गावर दर्शनासाठी भावविकांची गर्दी.
५] पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त.
Esakal