आज आषाढी एकादशी आहे. उपवास म्हटलं की, तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो, बरोबर ना. एकादशी आणि दुप्पट खाशी अशी आपल्याकडे खरं तर म्हण आहे. काही जणांना मूळ पदार्थांमध्ये वेगळं काहीतरी करून बघण्याचीही आवड असते. तर काहींना वेगवेगळे उपवासाचे पदार्थ करण्याची आवड असते. चला तर मग उपवासाच्या खमंग पदार्थांबद्दल अधिक जाणून घेऊयात.

उपवासाचा बटाटावडा: आधी उकडलेले बटाटे मॅश करुन त्यात हिरव्या मिरचीची पेस्ट मिक्स करा. तेलावर हे परतून बटाट्यामध्ये घाला आणि तुम्हाला हवं असेल तर दाण्याचे कूटही घालू शकता. त्यात मीठ घाला. वड्याचा आकार करून घ्या. वरीचे पीठ, साबुदाणा पीठ, मीठ, तिखट आणि सोडा मिक्स करून पाणी घालून भिजवून सारण करा. गोळे यात बुडवून वडे तळा. खोबऱ्याच्या चटणीसह हे वडे चविष्ट लागतात.
इडली सांबार:
बाऊलमध्ये भगर अर्थात वरीचे तांदूळ आणि साबुदाणा पीठ दोन तास भिजवून ठेवा. त्यानंतर मिक्सरमधून त्याची पेस्ट करून घ्या. त्यात मीठ, जिरे आणि हिरव्या मिरच्या घाला. त्यामध्ये थोडेसे इनो मिक्स करा. जेणेकरून इडल्या फुगायला मदत मिळेल. हे सारण इडली भांड्यामध्ये भरा. त्यानंतर साधारण 10-15 मिनिट्स वाफ द्या आणि इडल्या शिजवा. नंतर झाकण उघडून इडल्या काढून घ्या. उपवासाच्या सांबारसोबत याचा आस्वाद घ्या.
उपवासाचे पॅटीस: शेंगदाणे रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी त्याला कुकरमध्ये 5 शिट्ट्या द्या. थंड झाल्यावर त्याची पेस्ट करून घ्या. कढईत तूप, जिरे, खोबरे, उकडलेले बटाट, आले – मिरची पेस्ट आणि मीठ, दाण्याचे कूट घालून नीट शिजवून घ्या. याचे पॅटीस तयार करा आणि ते तेलावर अथवा तूपावर शेकून घ्या. शेंगदाण्याच्या पेस्टमध्ये पाणी घालून त्यात आमसूल, मीठ, गूळ आणि वरून जिऱ्याची तूपाची फोडणी घालून रगडा तयार करून घ्या. पॅटीसवर हा रगडा आणि तुम्हाला हवं असल्यास, चिंचगूळाची चटणी आणि हिरवी चटणी घालून या पॅटीसची चव चाखा.
राजगिरा थालीपीठ:
उकडलेल्या बटाट्याची साले काढून ते कुस्करून घ्या. त्यामध्ये राजगिऱ्याचे पीठ, हिरवी मिरची, मीठ, चिमूटभर साखर, थोडेसे तूप घालून मीठ व्यवस्थित मळून घ्या. त्यानंतर त्याने गोळे करा. बटर पेपरला तूप लावा आणि त्यावर हे थालीपीठाप्रमाणे थापा. तवा मध्यम आचेवर ठेवावा. त्यावर तूप सोडा आणि वरून थालिपीठ लावा. मंद गॅसवर हे थालीपीठ खमंग भाजा. तयार झाल्यावर दही अथवा शेंगदाण्याच्या उपवासाच्या चटणीसह खा.
साबुदाणा वडे: साबुदाणा भिजला की त्यात दाण्याचे कूट, तिखट, मीठ, जिरे मिसळून एकजीव करा. त्याचे एक एक वडे तयार करा आणि तेलात तळून घ्या. गरमागरम वडे चटणी सोबत खा.
साबुदाण्याची खिचडी: साबुदाणा दोन तास भिजल्यानंतर त्यात दाण्याचे कूट व मीठ कालवून ठेवावा. नंतर तूपात जिरे घालून फोडणी करा. त्यात मिरच्यांचे तुकडे व बटाटयाच्या फोडी घालून ढवळा. बटाटे शिजले की त्यात साबूदाणा घाला. साबुदाणा शिजला की खाली उतरा.
रताळ्याचा किस: रताळ्याची साले काढून किसून पाण्यात ठेवा. कढईत तूप घाला त्यात जिरे तडतडू द्या. वरून मिरच्या आणि रताळ्याचा किस घालून परता, त्यात दाण्याचे कूट, ओले खोबरे आणि साखर, मीठ घालून नीट वाफवून घ्या. रताळ्याचा किस वाफवला आणि शिजला की त्याची टेस्ट करा.
उपवासाचे पोटॅटो वेजेस: बटाटे साल काढून त्याचे उभे जाडसर तुकडे करा. तुपात वा तेलात तळून घ्या. त्यावर लिंबाचा रस, जिरे पावडर, तिखट,मीठ आणि कोथिंबीर घालून गरम गरम खा.
केळीचा रायता: वाळलेले खोबरे तांबुस होईपर्यंत भाजा. केळ्यांचे काप करा. त्या कापांना लिंबाचा रस लावा. त्या कापांमधे दही, खोबरे आणि बदाम टाकून चांगले एकत्र करा. तुमचा रायता तयार झाला.
फोडणीचे भगर:
वरीचे तांदूळ धुवून परतून घ्या. त्यानंतर एका पातेल्यात तूप गरम करत ठेवा. त्यात जिरे आणि मिरचीचे तुकडे घाला. त्यावर वरीचे तांदूळ घालून परत एकदा परतून घ्या. पाणी घालून फोडणीचे भगर शिजवून घ्या. त्यात दाण्याचे कूट घाला. वरून तूप सोडा म्हणजे भात मोकळा होईल. गरम गरम फोडणीचे भगर खा.
बटाट्याचा कीस: सुरवातीला बटाटे किसून घ्या. त्यानंतर एका पातेल्यात तूप घाला. तूप गरम झाल्यावर जिरे घाला. आता हिरव्या मिरच्यांचे तुकडे घाला. मिरच्याचा रंग पांढरा झाल्यावर त्यावर बटाट्याचा कीस घाला. आता झाकण टाकून बटाट्याचा कीस शिजवा. झाकण काढून त्यात मीठ, साखर, दाण्याचे कूट घाला. व परत एक वाफ काढा. त्यानंतर गॅस बंद करा. अशाप्रकारे बटाट्याचा कीस तयार आहे. ओला नारळ व कोथिंबीर घालून गरम गरमच खायला द्या.
रताळ्याची कचोरी: रताळे व बटाटे उकडून घ्या. ते सोलून बारीक करा. त्यात थोडे मीठ घाला. १/२ चमचा तुपावर मिरच्यांचे तुकडे परतून घ्या. नंतर गॅसवरुन खाली उतरवून, त्यात इतर सर्व वस्तू घालुन सारण करा. रताळ्याची पारी करून त्यात थोडे सारण करून कचोर्‍या ठेवा. पिठात घोळवून तुपात तळून गरमागरम खा.
सफरचंदाची रबडी: सफरचंदाचे साल काढून किसून घ्या. दूध आटवून घ्या. दूध घट्ट झाल्यावर किसलेले सफरचंद आणि साखर मिक्स करा आणि उकळी करून घ्या. त्यात वेलची पावडर आणि बदाम तुकडे घाला आणि पुन्हा मंद आचेवर उकळी येऊ द्या. तुमची सफरचंद रबडी तयार. हवी असल्यास, गरम खा अथवा फ्रिजमध्ये ठेऊन नंतर खाऊ शकता
साबुदाण्याची लापशी:
साबुदाणा धुऊन त्यात १/२ कप पाण्यात शिजवून घ्या. नंतर त्यात दूध व साखर घालून थोडा वेळ शिजवा. तयार लापशी गार किंवा गरम तुमच्या आवडी प्रमाणे खावा.
उपवासाचे धिरडे:
भगर आणि साबुदाणा साधारण दोन तास भिजवा. त्यानंतर पाणी काढून त्यात हिरव्या मिरच्या, जिरे, मीठ, शेंगदाणे कूट एकत्र करून वाटून घ्या. बाऊलमध्ये घट्ट कालवा. चवीनुसार त्यात मीठ घाला. पॅनवर तेल घालून बॅटर पसरवा. मंद आचेवर धिरडे शिजू द्या. वाफेवर शिजले की परता आणि मग खोबऱ्याच्या चटणीसह खा.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here