नागपूर : हेची दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ।। गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व जोडी ।। तुकाराम महाराजांच्या या अभंगाप्रमाणे वारकरी संप्रदायाचे एकच मागणे असते की ‘देवा तुझा विसर पडू नये’. उपराजधानीतील काही वारकरीसुद्धा आपला प्रपंच सांभाळत हीच प्रार्थना करीत आहेत. पेशाने मेकॅनिक, शिक्षक आणि कपांउंडर असलेले हे वारकरी दैनंदिन काम चोख बजावत विठू माऊलीचे नामस्मरण (ashadhi ekadashi 2021) करीत आहेत. (people worshiped vitthal even completing their daily work)

Also Read: यवतमाळ : कळंबच्या कन्येला विठ्ठल पूजेत सहभागी होण्याचा मान

ह. भ. प. कुणाल महाराज यांचे शारदा चौक परिसरात गॅरेज आहे. आजोबा (आईचे वडील) दौलतराव गुंडे लहानपणापासून त्यांना काकड आरतीला नेत. यामुळे त्यांना १५ व्या वर्षापासून भजन, कीर्तनाची गोडी लागली. अगदी लहान वयापासून कुणाल महाराज वारीला जात असून ३ हजार कि. मि. पायदळ चालत त्यांनी नर्मदा परिक्रमासुद्धा केली आहे. सहसा भजन, कीर्तनापासून दूर असणारा तरुण वर्ग त्यांनी स्थापन केलेल्या हरिपाठ मंडळात हिरिरीने सामील झाला आहे.

ह. भ. प. कुणाल महाराज

ह. भ. प. सुनील महाराज येरखेडे (गुरुजी) हे उमरेड तालुक्यातील सावंगी येथील आश्रमशाळेत प्राचार्य आहेत. घरची हलाखीची परिस्थिती असल्याने बहिणीच्या घरी राहून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांचे जावई बाळाजी वऱ्हाडे वारकरी संप्रदायातील म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध. त्यांच्याकडून त्यांनी धडे घेत तेराव्या वर्षापासून भजन, कीर्तनाला सुरुवात केली. याचाच उपयोग त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणात करून घेत मराठी आणि इतिहास या विषयात एम. ए. पर्यंतचे शिक्षण घेतले.

ह. भ. प. सुनील महाराज येरखेडे

ह. भ. प. अनिल महाराज अहेर यांचे आई-वडील ते लहान असताना वारले. सांभाळ करायला कोणीही नातेवाइक नव्हते. नैराश्‍यामुळे ते आत्महत्या करण्याच्या विचारात असताना ज्ञानेश्‍वरीतील एका अध्यायामुळे त्यांनी निर्णय बदलत परमार्थाला जीवन अर्पण करण्याचा निर्णय घेतला. आपला चरितार्थ भागवायला डॉ. गोपाल बेले यांच्याकडे कंपाउंडर म्हणून काम करण्यास सुरवात केली. हलाखीच्या परिस्थितीत विज्ञान विषयात पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. दहावीचे परीक्षा शुल्क भरण्यासाठीही पैसे नसल्याने त्यांचे वर्ग मित्र, अभिनेते डॉ. विलास उजवणे यांनी त्यांचे शुल्क भरले. तीस वर्षे कंपाउंडर म्हणून नोकरी केल्यानंतर माऊलीच्या सेवेसाठी त्यांनी झोकून दिले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here