अभिनेता शशांक केतकरनं आजवर विविध मालिकांमध्ये नायक म्हणून लोकप्रियता मिळवली. पण सध्या झी मराठीवरील ‘पाहिले न मी तुला’ या मालिकेतील त्याने साकारलेल्या समर जहागीरदार या खलनायकाच्या भूमिकेला देखील प्रेक्षकांची तितकीच पसंती मिळतेय.

‘पाहिले न मी तुला’ या मालिकेत पहिल्यांदा खलनायक साकारण्याविषयी शशांक म्हणाला, “मला आधीपासूनच खलनायक साकारायचा होता. माझ्यासारख्या आखीव रेखीव चेहरा असणाऱ्याला अभिनेत्याला नायक म्हणूनच काम करावं लागतं की काय; अशी मला भीती वाटू लागली होती. माझ्यातला अभिनेत्याला वाव मिळण्यासाठी मला काहीतरी वेगळं करायचं होतंच. मला समर या भूमिकेसाठी विचारलं तेव्हा मी त्वरीत होकार कळवला.”
या भूमिकेच्या आव्हानाविषयी तो पुढे म्हणाला, “खलनायक किंवा वाईट वागणारी माणसं ही शरीरानेच अवाढव्य वगैरे असतात असं नाही. वाईट वागणं ही एक वृत्ती असते. ही वृत्ती मला साकारायची आहे असा मी विचार केला, त्यामुळे गोष्टी माझ्यासाठी सोप्या झाल्या.”
“या भूमिकेनंतर मला पुन्हा नायक साकारण्याची संधी मिळाली तर मी ती नक्की विचार करणार. प्रेक्षकांच्या मनात मी नायक म्हणून कसा आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे तेव्हा ते मला नायक म्हणून निश्चितच स्वीकारतील,” असा विश्वास त्याने व्यक्त केला.
सोशल मीडियावरील पोस्टविषयी शशांकने त्याचं मत मांडलं. “मी कोणतंही पांघरुण न घालता, गोड गोड न बोलता थेट व्यक्त होतो याचा मला अभिमान आहे. मला उगाचंच कौतुक करणं वगैरे आवडत नाही. सोशल मीडिया हे खूप चांगलं माध्यम आहे. तुम्ही योग्य पद्धतीनं, मर्यादित राहून तिथे व्यक्त होऊ शकता. आपल्या सभोवताली वाईट जगसुद्धा आहे. त्यामुळे जाता जाता माझ्यामुळे एक टक्का जरी सकारात्मकता मी पसरवू शकलो, तर मला ते आवडेल. माझ्या विरोधाभासांचा अर्थ ज्यांना समजतो त्यांना त्यामागचा उद्देशही कळतो”, असं तो म्हणाला.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here