– बेलाजी पात्रे
वाकड : टोकियो (जपान) येथे होणाऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी होणारा भारताचा जलतरणपटू सुयश जाधव महाळुंगे-बालेवाडी क्रीडा संकुलात कठोर मेहनत घेत आहे. तो सलग दुसऱ्यांदा देशाचे प्रतिनिधित्व करत आहे. ५० मिटर बटरफ्लाय व २०० मीटर वैयक्तिक मिडले या प्रकारात तो खेळणार आहे. तिकडील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी २० ऑगस्टला तो रवाना होत आहे. तिथे तो आणखी सराव करणार आहे.
सुयशचा सध्या बालेवाडीतील दिनक्रम पहाटे सहा ते नऊ सराव, सकाळी ११ ते दुपारी १२.३०पर्यंत जिम, सायंकाळी पाच ते सात पुन्हा सराव असा आहे. त्याने आजवर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेत १२३ पदके मिळविली आहेत. ब्राझिल येथे २०१६ला झालेल्या पॅरालिम्पिकसाठी पहिल्यांदा निवड झाली होती. त्यामध्ये त्याला अपयश आले. मात्र, प्रशिक्षक तपन पाणीग्रही यांच्या मार्गदर्शनाखाली बालेवाडी येथे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली. याचा लाभ त्याला २०१८ला इंडोनेशिया येथे झालेल्या एशियन पॅरा स्पर्धेत झाला. एक सुवर्ण व दोन ब्राँझ पदके मिळवून त्याने इतिहास रचला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटून या कामगिरीबद्दल कौतुक केले.

भवितव्य घडविण्याचा निश्चय
वडील नारायण जाधव हे राष्ट्रीय जलतरणपटू आहेत. त्यामुळे त्यांनी सुयशला अगदी लहान असताना पोहायला शिकविले. तो उत्तम पोहू लागला. बारा वर्षांचा असताना विजेच्या धक्क्याने त्याला दोन्ही हात कोपरापासून गमवावे लागले, तरीही खचून न जाता त्याने याच क्षेत्रात भवितव्य घडविण्याचा निश्चय केला. २००७ ला नाशिक येथे राज्यस्तरीय सुवर्णपदक पटकावीत पॅरालिम्पिकच्या दिशेने त्याचा प्रवास सुरू झाला. क्रीडा कोट्यातून तो क्रीडा अधिकारीवर्ग-१ झाला असून, बालेवाडी क्रीडा संकुलात जिल्हा क्रीडाधिकारी म्हणून नवख्या खेळाडूंना तो धडेही देत आहे.

ठळक कामगिरी
२०१६ रिओ पॅरालिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व, अर्जुन व एकलव्य पुरस्कार प्राप्त, एशियन पॅरा स्पर्धेत एक सुवर्ण व दोन ब्राँझ, २०१७ व २०१९ ला विश्व विजेतेपद स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व.
‘‘मला आता केवळ सुवर्णपदक दिसत आहे. त्यासाठी सर्वस्व पणाला लावून मी अफाट मेहनत घेत आहे. काहीही झाले, तरी देशासाठी किमान दोन सुवर्णपदक आणण्याचे माझे स्वप्न असून, ते मी सत्यात उतरविणार.’’
– सुयश जाधव, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू
‘‘लॉकडाउनमुळे दीड वर्ष सरावावर मर्यादा आल्या, तरीही त्याने फिटनेसवर काम केले. आगामी पॅरालिम्पिक डोळ्यांसमोर ठेवून आम्ही तयारी करीत आहोत. देशासाठी मेडल आणणे हेच आमचे लक्ष्य आहे.’’
– तपन पाणीग्रही, प्रशिक्षक
Esakal