‘खंडणी सरकारने खुलासा द्यावा’; भाजपच्या अतुल भातखळकरांची मागणी
मुंबई: कोरोनाकाळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवांवर बंधने घालण्यात आली आहेत. रेस्टॉरंट्स आणि बार्सवरदेखील बंधने आहेत. असे असताना ठाणे महापालिका हद्दीत मात्र सर्रास लेडीज बार सुरू होते. याबद्दलची माहिती काही प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्यानंतर ठाणे महापालिकेने कारवाई करत १५ लेडीज बार (Thane Ladies Bar) सील केले. महापालिकेच्या या कारवाईमुळे बार चालक आणि मालकांची चांगलीच धांदल उडाली. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी कारवाई सुरूच ठेवा असे आदेश दिले. या साऱ्या प्रकारानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मात्र महाविकास आघाडीवर सरकारवर हल्ला चढवला. (Thane Ladies Bar Seal BJP Atul Bhatkhalkar questions Mahavikas Aghadi Govt about Extortion)
Also Read: सहा महिन्यात किती टक्के मुंबईकर झाले ‘बाहुबली’? वाचा सविस्तर
ठाण्यातील लेडीज बार तुडुंब भरून दणक्यात सुरू आहेत हे माध्यमात उघड झाल्यावर आपली अब्रु झाकण्यासाठी आता १५ लेडीज बार सील करण्यात आल्याची नौटंकी केली जात आहे, अशी जहरी शब्दांत त्यांनी ठाणे महापालिका प्रशासनावर आणि सत्ताधारी शिवसेनेवर टीका केली. तसेच, एकीकडे कोरोनामुळे माणसांचा जीव जात असताना कोणाच्या आशीर्वादाने हे किळसवाणे प्रकार सुरू होते याचा खुलासा खंडणी सरकारने करावा, असा जळजळीत सवालही त्यांनी केला.

दरम्यान, कोरोनाचा प्रभाव वाढू नये यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये, मास्क वापरावे, नियमांचे पालन करावे अशी नियमावली देण्यात आली आहे. सर्व बार आणि रेस्टॉरंट व इतर आस्थापने सोमवार ते शुक्रवार ५० टक्के क्षमतेने सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे नियम लागू केले आहेत. तसेच, सायंकाळी ४ वाजल्यानंतर आणि शनिवार, रविवारी फक्त पार्सल सुविधा, होम डिलिव्हरी सेवा सुरु ठेवण्याविषयीचे आदेश देण्यात आले आहेत. असे असतानाही लेडीज बार सुरू कसे आणि कोणाच्या पाठिंब्याने? असे संतप्त सवाल नागरिकही विचारू लागले आहेत.
Esakal