आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात गगनबावडा तालुक्यात २७४ मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.

असळज (कोल्हापूर): मुसळधार पाऊस व जोराच्या वाऱ्याने गगनबावडा तालुक्यास अक्षरशः झोडपून काढले. आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात गगनबावडा तालुक्यात २७४ मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. तालुक्याच्या पाणलोट क्षेत्रात देखील मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असून कुंभी धरण क्षेत्रात ३०४ मिलिमीटर तर कोदे धरण क्षेत्रात २५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

गेले चार दिवस तालुक्यात कोसळणाऱ्या पावसाने कुंभी नदीला पूर आला असून पुराचे पाणी कोल्हापूर गगनबावडा मार्गावर मांडुकली, खोकुर्ले, शेणवडे, मार्गेवाडी, साळवण व किरवे या ठिकाणी आले आहे. त्यामुळे कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील वाहतूक बुधवारी रात्रीपासून बंद आहे. तालुक्यातील टेकवाडी गावाला पुराचा वेढा पडला आहे. गगनबावडा तालुक्‍यात बुधवारी पावसाने थैमान घातले. तालुक्यातील कुंभी, सरस्वती, धामणी व रुपणी नद्यांना पूर आला आहे. कुंभी नदीवरील अणदुर, मांडुकली, वेतवडे, पळसंबे व रेव्याचीवाडी हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

Also Read: Konkan Rain: रत्नागिरी जिल्ह्यात कुठे काय घडलंय; वाचा सविस्तर

लखमापूर येथील कुंभी मध्यम प्रकल्प ८०.५३ टक्के भरला आहे. कुंभी धरणातील पाणीसाठा नियंत्रणात ठेवण्यासाठी बुधवारी सायंकाळपासून कुंभी धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. विद्युत निर्मिती साठी ३०० क्युसेक्स तर पाणीसाठा नियंत्रणात ठेवण्यासाठी सांडव्यावरून ४८० क्युसेक्स असा एकूण ७८० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कुंभी नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा पाटबंधारे विभागाकडून देण्यात आला आहे.

Also Read: Rain Update – कोल्हापूर – गगनबावडा रस्त्यावर पाणी, वाहतूक ठप्प

कोदे लघु प्रकल्प यापूर्वीच भरला असून धरणाच्या सांडव्यावरून २३७० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सरस्वती नदीपात्रात होत आहे. कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील वाहतूक बंद असल्यामुळे तालुक्यात आज बहुतांशी गावाचे दूध संकलन झाले नाही. तालुक्यातील टेकवाडी गावाला पुराचा वेढा पडल्यामुळे बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here