– प्रणीत पवार
वाहने सुस्थितीत चालवायचे असल्यास त्यांची सर्व ऋतूंमध्ये योग्य देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे आहे. काही जण याकडे दुर्लक्ष करतात आणि प्रवासादरम्यान धोका खातात. उन्हाळ्यात आपण वाहनांचे इंजिन, बॅटरी, टायर, वातानुकूलन यंत्रणा आदींची काळजी घेतो, तशीच पावसाळ्यातही घ्यावी लागते, अन्यथा वाहने भररस्त्यात कुरकूर करतात. पावसाळ्यात वाहनांची, वाहने चालवताना कशी काळजी घेतली पाहिजे, हल्ली ‘ऑन दी स्पॉट’ वाहने दुरुस्तीची सुविधा कशी उपलब्ध होते, याचा आढावा…

१] वायपर
रात्रीच्या वेळी लाइट जेवढा आवश्यक तेवढेच पावसाळ्यात गाडीचे वायपर. शक्यतो सहप्रवासी आणि चालकासमोरील दोन्ही वायपर चालू स्थितीत असायला हवे. वायपरमधील नाजूक रबर लवकर खराब होते. त्यामुळे वायपरच्या अतिरिक्त जोड्या गाडीत ठेवणे उत्तम.
२] टायर
पावसाळ्यात टायर चांगल्या स्थितीत असावे. चाके जितकी नक्षीदार तेवढा त्यांचा रस्त्याशी संपर्क जास्त. अशी चाके निसरड्या रस्त्यावरून घसरण्याची शक्यता कमी असते. पावसाळ्यात वाहनाचे व्हील व बॅलन्सिंग अलाइनमेंट तपासून घ्यावे.

Also Read: पुण्यासाठी 25 हजार डोस उपलब्ध; आज १९१ ठिकाणी लसीकरण
३] ब्रेक प्रणाली
वाहनांमधील ब्रेकची स्थिती उत्तम आहे की नाही हे प्रात्यक्षिक घेऊन तपासावे. वाहनाचे ब्रेक ड्रम, डिस्क, पॅड, ब्रेक कॅलिब्रेशन सर्व्हिसिंगवेळी तपासणी करून घ्यावे. एबीएस ब्रेकिंग प्रणालीमुळे वाहने घसरत नाहीत. त्यामुळे वाहनाच्या दिशेवर व वेगावर नियंत्रण राखता येते.
४] लाइट-इंडिकेटर
वाहनाचे हेडलाईट, दिशादर्शक, पार्किंग लाइट, टेल लॅम्प व्यवस्थित पेटतात ना, हे तपासायला हवे. इंडिकेटर लॅम्पवरील प्लॅस्टिकची आवरणे तुटलेली अथवा अपारदर्शक नाहीत ना हेही तपासून पाहावे.

५] वायरिंग
अनेकदा पार्क केलेल्या वाहनांमधील वायरिंग उंदीर कुरतडतात. त्यामुळे वाहनातील वायरिंग पावसाळ्यात तपासून घ्यावे, जेणेकरून शॉर्टसर्किट होणार नाही. बॅटरीचे टर्मिनल तपासून पहा. त्यावर अॅसिड व क्षार आले असतील तर विद्युतपुरवठा योग्यप्रकारे होत नाही.
६] वातानुकूलन यंत्रणा
पावसाळ्यात वाहनाच्या काचा बंद ठेवून प्रवास करताना काचेवर शेद आल्याने समोरील वाहन, रस्ता नीट दिसत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता असते. हा शेद घालवण्यासाठी वातानुकूलन यंत्रणा उपयोगी ठरते. पावसाळ्यापूर्वी या यंत्रणेची कार्यक्षमता तपासावी.
Also Read: पुणे महापालिकेने हट्ट सोडल्याने ‘जायका’ला मंजुरी

‘ऑन दी स्पॉट’ दुरुस्तीचा पर्याय
१] मुंबईसारख्या ठिकाणी तर धो-धो पावसात वाहने अनेकदा पाण्याखाली जातात आणि वाहनांमध्ये हमखास बिघाड उद्भवतात. एखादा बिघाड मेकॅनिकशिवाय दुरुस्त होत नाही. अशावेळी ‘ऑन दी स्पॉट’ वाहने दुरुस्तीचा पर्याय सोईस्कर ठरतो.
२] भारतात ऑटो आय केअर, क्रॉस रोड, पॉलिसी बझार, टीव्हीएस, रोडा रेडी असिस्ट यांसारख्या अनेक कंपन्या २४ तास ‘ऑन रोड साइड असिस्ट’ही सुविधा पुरवतात. वाहन दुरुस्ती, टोईंग, बॅटरी बदलणे, पर्यायी चावी, पर्यायी वाहतूक, इंधन पुरवठा, वैद्यकीय सहाय्यता आदी बाबींचा यामध्ये समावेश असतो.
३] महिना, वार्षिक असे पॅकेजनुसार ठराविक दर त्यासाठी आकारले जातात. या कंपन्यांनी मोबाईल ॲपही कार्यान्वित केले आहेत. त्यानुसार एका क्लिकवर किंवा फोन करून आपत्कालीन वेळी हवी ती मदत मागवू शकतो.
Also Read: समाविष्ट २३ गावांच्या आराखड्यास मंजुरीची शक्यता
काय करावे…
वाहनाचे टूलकिट सोबत असावे. गाडीचे लॉक पावसात गंजून घट्ट होतात. अशावेळी ॲन्टिरस्ट लुब्रिकंट स्प्रेचा वापर करावा. गाडी सुरू करण्यापूर्वी वायपर्स तपासावे. दुचाकी असल्यास पुढील आणि मागील ब्रेक तपासावे. ॲन्टी फॉग हेल्मेटचा वापर करावा. साचलेल्या पाण्यातून वाहन घेऊन जाताना एकसारख्या स्पीडने चालवावे.
काय करू नये…
पावसाळ्यात वाहनाचा वेग एकदम वाढवणे आणि एकदम ब्रेक दाबणे टाळावे. पावसाळ्यात क्रूझ कंट्रोलचा वापर शक्यतो टाळावा. यामुळे वाहनचालकाला वेगाचा, रस्त्यावरील ग्रीपचा अंदाज लावणे सोईस्कर होते. रस्त्यावर ओव्हरस्पिड किंवा ओव्हरटेक करू नये.
Esakal