इगतपुरी (जि.नाशिक) : इगतपुरीत गेल्या तीन दिवसांपासुन संततधार पाऊस सुरु आहे. पावसाचा जोर कायम असून, पावसामुळे पुन्हा एकदा रेल्वे वाहतुकीला फटका बसला आहे. या पावसामुळे कसारा घाटात (ता.२२) रेल्वे रुळावर दरड कोसळली. यावेळी रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवरही झाड पडल्याने मध्य रेल्वेची १२ तास वाहतुक ठप्प झाली होती. अशातच भला मोठा दगड येऊन रेल्वे रुळापाशी थांबला. त्यामुळे आणखीनच अडचणीत वाढ झाली.(lanslide-at-kasara-railway-route-marathi-news-jpd93)
….अन् रेल्वे रुळाजवळ आला मोठा दगड
कसारा घाटातील मध्य रेल्वेच्या जव्हार फाटा जवळील डाउन मार्गावर दरड कोसळली असून त्याच्याच पुढे ओव्हरहेड वायरवरही झाड पडले आहे. तसेच कथरुवंगण वाडी येथील पोल मिडल लाईनच्या रुळावर मातीचा खच पडला. तसेच मानस हॉटेल मागील अप लाईनच्या रेल्वे रूळाखालील खडी वाहून गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक १२ तास ठप्प झाली होती. रात्रभर रेल्वे प्रशासन व कर्मचारी कसारा घाटात रेल्वे मार्ग सुरळीत करण्यासाठी युध्द पातळीवर काम करत होते. यावेळी ओव्हरहेड वायरवरचे झाड काढण्यात कर्मचाऱ्यांना यश आले. मात्र रुळाजवळ पडलेला भला मोठा दगड काढण्यासाठी जेसीबी रुळाजवळ नेता येत नव्हते. यामुळे हा दगड काढण्यास मोठी अडचण निर्माण झाली होती. त्याचप्रमाणे कसारा स्थानकापुढील उंबरमाळी, वाशिंद स्थानकात रेल्वे प्लॅटफार्म पर्यंत पावसाचे पाणी साठल्याने दोन्ही मार्गावरची रेल्वे वाहतुक पुर्णत: ठप्प झाली.

२८ बसेस कल्याणच्या दिशेने रवाना
मध्य रेल्वेची दोन्ही मार्गाची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे गोरखपूर, हावडा, पवन एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या असून राज्यराणी, पंचवटी, सेवाग्राम एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस या रेल्वे रद्द करण्यात आल्या होत्या. इगतपुरी रेल्वे स्थानकावर गाड्या उभ्या केल्याने प्रवाशांची प्रचंड गर्दी असून रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना कल्याण व मुंबईला जाण्यासाठी बसेसची सोय केली. त्यामुळे आतापर्यंत २८ बसेस कल्याणच्या दिशेने रवाना करण्यात आल्या. प्रवाशांची गर्दी पाहुन ४० बस रेल्वे प्रशासनाने मागविल्या. तर मुंबईहुन नाशिककडे येणाऱ्या गाड्या वसई विरार मार्गे वळविण्यात आल्या असून भुसावळहुन मुंबईकडे येणाऱ्या गाड्या जळगाव मनमाड मार्गे वळविण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

मध्य रेल्वेची सेवा चालू होण्यास विलंब
कसारा घाटात मध्य रेल्वेच्या डाउन व मिडल लाईन कोसळलेल्या दरडी व माती हटविण्याचे काम सुरू असुन अप लाईन खालील वाहून गेलेल्या खडीचे पुन्हा भराव करण्याचे कामयुद्ध पातळीवर सुरू आहे. एनडीआरएफ व आरपीएफ तसेच रेल्वे कर्मचाऱ्याची टीम घटनास्थळी दाखल असून अजून मध्य रेल्वेची सेवा चालू होण्यास दुपार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Esakal