तारळे (सातारा) : दिवसभर सुरु असलेल्या मुसळधार पावसाने तारळे विभागाला झोडपून काढले. मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला दिलासा मिळाला असला, तरी अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत.

तारळे (सातारा) : दिवसभर सुरु असलेल्या मुसळधार पावसाने तारळे विभागाला झोडपून काढले. मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला दिलासा मिळाला असला, तरी अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. तारळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 24 तासात तब्बल 233 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तारळी नदीची पाणी पातळी वाढली असून केव्हाही धरणातून पाणी नदीपात्रात सोडणार असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मुंबई व कोकणात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने माहेरघरात दडी मारली होती. मोठ्या पावसाअभावी भात लागणी रखडल्या होत्या. मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला कालच्या पावसाने दिलासा दिला आहे. तर अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. ओढे-नाले, नदी दुथडी भरून वाहिले. अनेक ठिकाणी ओढे-नाले उलटून शेतीचे नुकसान झाले आहे. वजरोशी फाट्यावर अनील डफळे यांच्या रानात रस्त्याचे पाणी जाऊन शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. आंबळे येथील संदीप पाटणकर यांच्या उसाचेही नुकसान झाले आहे.
जळव, कळंबे, जुगाईवडी, बोरगेवाडी, डफळवाडी, वजरोशी, धनगरवाडी आदी ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे. खडकवाडी येथे प्रल्हाद साळुंखे यांच्या घराची भिंत पडून नुकसान झाले. ढोरोशी व भुडकेवाडी ओढा काहीवेळ पाण्याखाली गेला होता. तारळे गावाला पाणी पुरवठा करणारी धनगरवाडी येथील विहीर पाण्याखाली गेली आहे. अनेक सखल भागात पाणी साठले होते. काल रात्रभर पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते. शिवाय सोबतीला जोरदार वारे ही असल्याने भीती पसरली होती.
जळव व बोर्गेवाडी घाटात रस्त्याने पाणी वाहिल्याने रस्त्यावर माती दगड व चिखलाचा राडारोडा पसरल्याने वाहतूक धोकादायक झाली आहे. बोर्गेवाडी घाटात पुन्हा पडझड झाली असून घोट शिवारात सर्व माती वाहून शेतीचे नुकसान झाले आहे. पाल (ता. कराड) येथे सकाळी पूरसदृश परिस्थिती होती. ग्रामपंचायत दारात पाणी आले होते. नदीपात्रातील पार्किंग पूल पाण्याखाली होता.
तारळी धरणाच्या (Tarli Dam) पाणलोट क्षेत्रात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. एका दिवसात 233 मिलीमीटर पाऊस कोसळला असून पाणी पातळी 3.90 मीटरने वाढली आहे. सध्या धरणात 80 टक्के पाणी साठा झाला आहे. सध्या 4.67 टीएमसी पाणी साठा असून पावसाचा जोर असाच राहिल्यास सायंकाळी पाण्याचा विसर्ग करण्याची शक्यता वर्तवली आहे.
साताऱ्यासह केळघर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर (Heavy Rain In Satara) वाढल्यामुळे केळघरातील ओढ्याला पूर आला असून पाणी पातळीत वाढ झाली आहे. येथील ओढ्यावरच्या पुलाचे बांधकाम सध्या सुरू आहे, त्यामुळे वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता बनवला आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here